सुहास किर्लोस्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘मासिकांच्या गाडय़ांची चाके’ असा टीकात्मक सूर साठच्या दशकाच्या आसपास प्रकाशित झालेल्या कथांबाबत समीक्षकांनी लावला असला, तरी मराठी वाचकमनांनी मात्र या कथांनाच पसंती दिली. कुठल्याही इतर साहित्यिक आविष्काराऐवजी हयातभर फक्त गोष्टच लिहून दिग्गज ठरलेल्यांच्या अगणित कथा विभिन्न निकषांवर वेगळय़ा काढता येतील. जागतिकीकरणाच्या रेटय़ात बदलत्या शहरगावांतील अ-मराठी आणि स्थलांतरित मराठी समुदायाला आपल्या भवतालाशी जोडणाऱ्या मराठी कथा वाचायला मिळाव्यात, यासाठी लेखक-रंगकर्मी आशुतोष पोतदार यांनी २८ निवडक मराठी कथांचे अनुवाद इंग्रजीमध्ये संकलित आणि संपादित केले आहेत. ‘द ग्रेटेस्ट मराठी स्टोरीज एव्हर टोल्ड’ असे या कथासंग्रहाचे नाव. यात अण्णा भाऊ साठे, चिं. वि. जोशी, जयंत नारळीकर, सानिया, रत्नाकर मतकरी, श्याम मनोहर, आशा बगे, हमीद दलवाई, व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी आदींच्या अनुवादित कथा ‘रूपा पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केल्या आहेत.

मराठी साहित्यिकांच्या कालहत न झालेल्या कथांचा आस्वाद इतर भाषिक जगताला घेता यावा, यासाठी आशुतोष पोतदार यांनी केलेला हा कथाखटाटोप कौतुकास्पद आहे. जयंत पवार, राजन गवस, मिलिंद बोकील यांच्याप्रमाणेच भारत सासणे, भाऊ पाध्ये, गंगाधर गाडगीळ यांच्या कथा महाराष्ट्राच्या भिन्न भागांमध्ये घडतात. कथासंग्रह वाचताना बदलत्या काळातील महाराष्ट्र संस्कृती अनुभवता येते. मुंबईच्या भूगोलात मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय माणसांच्या दैनंदिन जीवनातली हिंसा, वैफल्य, त्यांच्या भविष्यात लिहिलेला विध्वंस भाऊ पाध्ये यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये आला. शहरी कष्टकरी कारकुनापासून ते अग्रेसर कलाजगतात वावरणाऱ्यांपर्यंत आणि नाकासंस्कृतीतून व्यक्त होणाऱ्यापर्यंतच्या संवेदनांना साहित्यात आणण्यात भाऊ पाध्ये यांचे योगदान मोलाचे आहे. एखाद्या पात्राच्या दृष्टिकोनातून कथा सांगण्याची त्यांची वैशिष्टय़पूर्ण शैली त्याकाळी अनोखी होती. त्याचेच प्रतिबिंब दाखवणारी ‘नवरा’ ही कथा उत्तमरीत्या अनुवादामध्ये उतरली आहे. एका मुलाच्या दृष्टिकोनातून त्याच्या काकूचे व्यक्तिचित्र रेखाटताना तिच्या आयुष्यातील काही घटनांकडे तो कसा बघतो आणि त्याचा त्या युवकाच्या मानसिकतेवर होणारा परिणाम भाऊ पाध्ये यांच्या कथेत उतरला होता. जेरी पिंटो यांनी केलेला हा अनुवाद भाऊ पाध्ये यांच्या लेखनशैलीस अनुसरून आहे. तरीही अमराठी वाचकाला काका- काकू- मुंडावळय़ा- गजरा या शब्दांचे अर्थ समजतील का, याबद्दल संभ्रम वाटतो. सुरुवातीला त्या शब्दांचे इंग्रजी अर्थ कंसामध्ये देणे योग्य ठरले असते असे वाटते.

पोतदार यांनी पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये मराठी साहित्याची ओळख करून देताना इथली कथा कशी बहरत गेली आणि त्यामध्ये कोणकोणत्या साहित्यिकांनी कसे योगदान दिले, याबद्दल केलेले विवेचन वाचनीय आहे. गंगाधर गाडगीळ यांच्या कथांमधून किडलेले शहरी जीवन दिसले. द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, शंकर पाटील, राजन गवस यांच्या कथांना गावाकडच्या मातीचा सुगंध होता, चिं. वि. जोशी यांच्या कथांमधील सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याला दिलेली विनोदाची डूब त्या काळच्या वाचकांना अनोखी होती. जयंत नारळीकर यांच्या वैज्ञानिक कथा आणि रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा रोजच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या होत्या परंतु त्यांनी मराठी वाचकांना अनोळखी विश्वामध्ये संचार करण्यास प्रवृत्त केले.

अण्णा भाऊ साठे यांनी तळागाळातील लोकांच्या आयुष्याला कथेत आणत कथामाध्यमाच्या कक्षा रुंदावल्या. पोतदार यांनी अण्णा भाऊंच्या कथासंग्रहामधील गावाकडच्या ‘भीमा’ची कथा या संग्रहात समाविष्ट केली आहे. अण्णा भाऊंनी खेडेगावातील व्यवस्था वाचकांना ‘दाखवताना’ तिथल्या वाडय़ा-वस्त्यांमध्ये माणसा-माणसांत भेदभाव कसा होता, याचे बारकाईने वर्णन केले होते. हातावर पोट असणाऱ्या भिमाची परिस्थिती आणि अडचणींतून मार्ग काढणाऱ्या भिमाच्या पत्नीचे मराठी वाचकांनी ५० वर्षांपूर्वी फार कौतुक केले होते. आजही ही कथा अनुवादात ताजीच वाटते.

अनिल झणकर, जयंत कर्वे, जेरी पिंटो, कीर्ती रामचंद्र, शांता गोखले, सुहास परांजपे, दिपाली अवकाळे अशा जाणकारांनी अनुवाद केल्यामुळे प्रत्येक कथेतून भाषिक वकुब व्यक्त होतो. हेच या कथासंग्रहाचे वेगळेपण आहे. हमीद दलवाई यांच्या कथेचा दीपाली अवकाळे यांनी केलेला अनुवाद मूळ कथेइतकाच वठला आहे. हमीद यांच्या चित्रदर्शी शैलीतील गावातील वाडीचे वर्णन इंग्रजीत नेताना बिलकूल धक्का पोहोचवला जात नाही. त्याचबरोबर ‘वाडी’ म्हणजे काय, याचा अर्थबोध वाचकांना व्हावा यासाठी अनुवादिकेने स्वतंत्र तळटीप दिली आहे. परंतु काही कथांची भाषांतरे करताना इंग्रजीपेक्षा मराठी लहेजा सांभाळण्यात आला आहे, ज्याचा अ-मराठी वाचकांना संदर्भ न लागण्याची भीती आहे. उदाहरणार्थ, ‘हो रे बुवा, मी आताच घरी आले आहे ना’ याचे भाषांतर ‘येस रे बुवा, बट आय हॅव जस्ट कम होम ना’ असे केले आहे. ‘तिच्या अंगात त्राण उरले नव्हते’ याचे भाषांतर ‘देअर वॉज नो एनर्जी लेफ्ट इन हर बॉडी’ असे करण्यापेक्षा इंग्रजीतील त्या अर्थाचे वाक्प्रचार वापरणे सयुक्तिक झाले असते.

जी. ए. कुलकर्णी यांच्या लघुकथेचे सचिन केतकर यांनी केलेले भाषांतर उत्तम झाले आहे. रत्नाकर मतकरी यांची ‘व्हेकन्सी’ ही गुढकथा इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना जयंत कर्वे यांनी मूळ लेखकाची लेखनशैली आणि इंग्रजीचा लहेजा यांचा उत्तम मेळ घातला आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘मारुतराया’ या कथेचा शांता गोखले यांनी केलेला अनुवाद वाचताना माणूस कोण आणि माकड कोण असा प्रश्न पडतो. कथा वाचता वाचता ते पूर्ण चित्र डोळय़ासमोर उभे राहणे आणि कथा संपल्यावर काही काळ स्तिमित होऊन पुढच्या कथेचे वाचन करण्यापूर्वी थोडा दमसास घ्यावा लागणे, हे उत्तम कथेचे वैशिष्टय़ हा अनुवाद वाचताना जाणवत राहते. गौरी देशपांडे यांची ‘पाऊस आला मोठा’, रंगनाथ पाठारे यांची ‘वैकुंठाची धूळ’, सानिया यांची ‘युद्ध’ या कथा इंग्रजीत सहजरीत्या ‘स्थलां’तरित झाल्या आहेत. मूळ लेखकांची शैली अबाधित राखून काही अवघड वाटू शकणाऱ्या इथल्या संस्कृतीमधील शब्दांचे अर्थ तळटीप स्वरूपात देण्यात आले आहेत. आशा बगे, सानिया या लेखिकांनी मराठी कथा लेखनाला नवे आयाम दिले. त्यामुळे त्यांच्या कथांचा समावेश या कथासंग्रहात होणे उचित आहे.

एकूणच मराठी कथा लेखनाचे साठपूर्व, साठोत्तरी आणि नव्वदीतील वैविध्य या पुस्तकाच्या निमिताने इंग्रजीमध्ये अवतरले आहे. मराठी वाचकांनीही त्या कथा इंग्रजीमध्ये वाचल्यास भाषिक स्थलांतराचा आनंद या संग्रहामधून होईल. मराठीप्रमाणेच बंगाली, उर्दू, उडिया, हिंदी, तमिळ, आसामी, गुजराती, काश्मिरी, तेलुगु, कोंकणी भाषेतील कथांची भाषांतरे रूपा पब्लिकेशनने या मालिकेमध्ये प्रसिद्ध केली आहेत. भारतातील भाषा विविधतेचे दर्शन या भाषांतरांच्या निमिताने होईलच त्याचप्रमाणे विविध राज्यांतील संस्कृती, त्या भाषांमधील उत्तम साहित्याचा परिचय अशी भाषांतरे वाचल्यामुळे होऊ शकेल. मराठी भाषेमधील दर्जेदार साहित्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर व्हावे आणि त्याचा प्रसार महाराष्ट्राप्रमाणेच भारतभर आणि भारताबाहेर व्हावा असे, हे पुस्तक वाचताना वाटत राहते.

द ग्रेटेस्ट मराठी स्टोरीज एव्हर टोल्ड

संकलन : आशुतोष पोतदार

प्रकाशन : रूपा पब्लिकेशन्स

पृष्ठे : ३१२; किंमत : ७९९  

suhass.kirloskar@gmail. com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Linguistic migration of marathi stories amy
Show comments