स्थळ : ईडीचे कार्यालय – केजरीवालांचे प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू होताच साहेब बोलू लागले. ‘तुमच्यापैकी ज्या कुणाला आरोपीच्या घरच्या जेवणाचा डबा तपासण्याची कल्पना सुचली त्याचे अभिनंदन. या आंबे व आलुपुडीच्या प्रकरणामुळे आरोपींच्या चलाखीचा नवाच आयाम जगासमोर आला. त्यामुळे आता जगभरातील तपास संस्था आरोपींच्या आहार व रक्तातील साखरेकडे लक्ष ठेवतील. विश्वगुरूंचे मार्गदर्शन लाभणे सुरू झाल्यापासून प्रत्येक प्रकरणातील आरोपीला जास्तीतजास्त दिवस कोठडीत ठेवणे हेच आपले सर्वोच्च धोरण आहे. न्यायिक व्यवस्थेचा काही भरवसा नसल्यामुळे कोठडी हीच आरोपीसाठी खरी शिक्षा असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..

केजरीवालांनासुद्धा ती पूर्णपणे मिळेल हे या आंबा प्रकरणावरून आता साऱ्यांच्या लक्षात आलेले आहे. ज्या कुणाच्या लक्षात हा आंबेप्रकार आला असेल त्याने नक्कीच विश्वगुरूंची या विषयावरची मुलाखत लक्षात ठेवली असेल. इतर राजकीय आरोपींच्या तुलनेत हे आपवाले जरा जास्तच हुशार व चतुर आहेत. पण या कृत्रिम साखरवाढ प्रकरणामुळे ते चांगलेच तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे आता पुढील युक्तिवादाच्या वेळी आंबा कापून खाल्ल्याने व चोखून खाल्ल्याने नेमकी किती साखर शरीरात वाढते याचे शास्त्रीय विवेचन तुम्हाला सादर करायचे आहे.   स्थळ : तिहारचा तुरुंग – कोठडीत येरझरा घालत केजरीवालांचे विचारचक्र वेगाने सुरू आहे. ‘अरे, वीस वर्षांपासून साखरेचा जाच सहन करतोय. कशाने ती वाढते व कशाने नाही ते माझ्याएवढे एखाद्या डॉक्टरलासुद्धा कळणार नाही. आधी कोठडीत टाकले व आता खाण्यापिण्यावरही बंधने? ही हुकूमशाही नाही तर आणखी काय? रक्तातली साखर तीन आंबे खाल्ल्याने कधीच वाढत नाही हे अनुभवावरून सांगतो. हे मान्य की मधुमेहग्रस्तांना आंबे खाऊ नका असे डॉक्टर सांगतात. पण प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते हे या ईडीवाल्यांना व त्यांना नियंत्रित करणाऱ्यांना कसे कळणार? निघाले तिथे माझे खाणे काढायला! होय, आम्हाला सुचतात नवनव्या कल्पना. म्हणून काय रक्तातील साखर वाढवून मीच माझा जीव धोक्यात घालू? अशा लबाडया करून मला बाहेर यायचे नाही हे लक्षात घ्या. थांबा, एक ना एक दिवस विजयी वीरासारखा बाहेर पडेल. बाहेर आलो की आंबा काय चीज आहे ते जगाला सांगेन. वेळ आली तर त्याला दिल्ली व पंजाबचे राज्य फळ म्हणून घोषित करेल. याच आंब्याचा मुद्दा मोठा करून निवडणुकांमध्ये तुम्हाला जेरीस आणेल. केजरीवाल काय चीज आहे ते ठाऊकच नाही तुम्हाला. आता पुढल्या तारखेला आंबा व साखरेचा काही संबंध नाही असा युक्तिवाद ऐकाच.’ तेवढयात जेवणाची घंटा वाजते तसे ते घरच्या डब्याची वाट बघू लागतात व साखर वाढावी यासाठी त्यात काय असेल यावर विचार करू लागतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on arvind kejriwal mango eating controversy zws