‘वार वार वारी’ हा कुमार शाहनींनी १९८७ मध्ये दिग्दर्शित केलेला कथापट अवघ्या २५ मिनिटांचा. नायिका शास्त्रज्ञ- पण स्त्री म्हणून संवेदनशील. अभिनेत्री मीता वशिष्ठ यांची पहिलीवहिली भूमिका म्हणून या चित्रपटाचे नाव घेतले जाते आणि पडद्यावर मीता यांचा वावर २० मिनिटे आहे. पण ही कुणा एका स्त्रीची गोष्ट नाहीच. धरणावर काम करणारी, त्या वेळचा संगणक सहज हाताळणारी, रेडिओबद्दल ‘हा मीच, माझ्या हातांनी जुळवून बनवलाय’ म्हणणारी नायिका खासगी स्त्री-पुरुष नात्यांच्या अबोधपणामुळे, मैत्रिणीशी दुराव्यामुळे मात्र विद्ध होते, युगानुयुगांचा मनुष्यस्वभाव काही जात नाही..  या चित्रपटाची कथा जर काही असलीच तर ती ‘भौतिक गोष्टींवर आणलेलं नियंत्रण माणसाला स्वत:वर आणता येत नाही,’ याची गोष्ट! चित्रपट हे केवळ गोष्ट सांगण्याचे माध्यम नसून प्रेक्षकांना आपापली गोष्ट रचू देण्याचे स्वातंत्र्य त्यात आहे, हे कुमार शाहनी यांनी ओळखले, म्हणून त्यांना ‘ दिग्दर्शकांचे दिग्दर्शक’ वगैरे म्हटले गेले. अनेकांसाठी त्यांचे काम मूकपणे मार्गदर्शक ठरले. त्यांच्या निधनाने भारतीय कला-चित्रपटांच्या १९७० ते ९० या दशकांचा महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

‘मायदर्पण’ (१९७२) हा शाहनींचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. त्यातही स्त्री-संवेदनाच कथेच्या वाहक होत्या, पण चित्रपटाची अखेर ज्या मयूरभंज छाऊ शैलीतल्या नृत्याने होते, त्यातून या संवेदना सशक्त करू पाहाणारी स्त्री दिसली. बऱ्याच नंतरच्या ‘कसबा’ (१९९१) आणि ‘चार अध्याय’(१९९७) मध्ये पुन्हा या सशक्ततेच्या शक्यतांचा पट दिसला. स्त्रीतत्त्वाचे कोडे म्हणजे काय, याची व्याप्ती या तीन पूर्ण लांबीच्या चित्रपटांतून शोधता आली तरी त्यांना कुणी ‘त्रयी’ म्हणालेले नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh indian art film director kumar sohni passes away amy
First published on: 26-02-2024 at 00:12 IST