शाहू पाटोळे
श्रावण महिन्यात इंडिया आघाडीतील काही नेते मांसाहारावर ताव मारून त्याच्या चित्रफिती तयार करून बहुसंख्याकांच्या भावनांशी खेळत आहेत, अशा आशयाची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. पण भारतातील ‘बहुसंख्य’ खरोखरच शाकाहारी आहेत का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील उधमपूर येथील एका प्रचारसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षावर टीका करताना म्हणाले की, ‘‘इंडिया आघाडीतील पक्षांना भारतातील बहुसंख्याकांची पर्वा नसून त्यांच्या भावनांचा अपमान करण्यात त्यांना धन्यता वाटते. श्रावण महिन्यात काही नेते मांसाहारावर ताव मारत असून त्याच्या चित्रफिती तयार करून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत.’’ वगैरे. पंतप्रधानांनी विरोधी पक्षातील काही नेत्यांची तुलना मुघलांशी केली. पुढे त्यांनी असाही आरोप केला की, ‘‘श्रावण महिना सुरू असताना मटण खाऊन या नेत्यांनी देशातील जनतेला चिडवण्याचा प्रयत्न केला,’’ वगैरे. 

हेही वाचा >>>‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…

या पुढील लेखन हे एतद्देशीय (फक्त) हिंदूंच्या खाद्यसंस्कृतीबद्दल आहे. मुस्लीम खाद्यसंस्कृतीचा प्रभाव एतद्देशीय खाद्यसंस्कृतीवर पडला असेल, तर तो इतिहास जेमतेम हजार वर्षांच्या मागे जाणार नाही; कारण भारतात मुस्लीम आक्रमक येऊन जेमतेम हजार वर्षे होत आहेत. साधारणपणे हजार वर्षांपूर्वी, भारताला इस्लामची ओळख होण्यापूर्वी या भारतभूवर वा जम्बुद्विपात लोक राहत होते की नव्हते? अनेक राजवटी आणि त्यांचे राज्य होते की नव्हते? असे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत की, इस्लामपूर्व काळात या देशात मोठय़ा प्रमाणावर मांसाहार केला जात होता. याचे पुरावे जसे ग्रंथांमधून सापडतात, तसेच त्याचे दाखले वेगळय़ा अंगाने नकळतपणे आजही भगवद्गीता, भागवत पुराण सांगणारे महाराज, शाकाहाराचा पुरस्कार करणारे आणि कथावाचक देतात. अगदी ज्ञानेश्वरीमध्येसुद्धा त्रवर्णिक आहार सांगितलेला आहे. ‘जसा आहार तशी वृत्ती,’ याचे निरूपण करताना सांगितले जाते की, धर्मानुसार सात्त्विक, राजस आणि तामस आहार सांगितलेले आहेत. त्यात सात्त्विक वगळता राजस आणि तामस हे आहार तर मांसाहारीच आहेत. आता राजस आणि तामस यापैकी कोणता मांसाहार धर्ममान्य आणि कोणता धर्मासाठी निषिद्ध हे कोण ठरवणार? हे कथावाचक या धार्मिक ग्रंथांचा जो कालखंड सांगतात त्यावरून असे सिद्ध होते की, मुस्लीमपूर्व काळातील भारतातील बहुसंख्य लोक हे मांसाहारी होते. अर्थात आजही ज्या हिंदूंचे पूर्वज जो पारंपरिक मांसाहार करत तोच मांसाहार आजचे हिंदूही करतात; त्यांच्या मांसाहाराचा, त्यांचा आणि इस्लामचा वा मुस्लिमांचा याच्याशी संबंध नाही.

मुळात हिंदू हा विशिष्ट ओळख असलेला धर्म नसून ‘हिंदू ही एक जीवनशैली आहे,’ हे सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलेले आहे. या देशात पूर्वापार वैदिक, ब्राह्मण, सनातन, हिंदू हे धर्म आणि हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, शाक्त या मुख्य तीन शाखा; असे ठळक भेद होते की नव्हते? आज ज्यांना एकूण सकळ हिंदू धर्मीय समजतात त्यात प्रामुख्याने निरीश्वरवाद, सर्वेश्वरवाद, अनेकेश्वरवाद आणि नास्तिकता पूर्वापार चालत आलेली आहे की नाही? यज्ञांमध्ये वैदिक आहुती म्हणून अन्नासोबतच पशूंचे बळी देत होते की नव्हते? यज्ञप्रसंगी बळी दिलेल्या प्राण्यांच्या कलेवराचे पुढे काय केले जात असे? वैदिक काळात बळी देताना पशूंचे गळे कापणारे मुस्लीम खाटीक तर नक्कीच नसतील! कारण तेव्हा मुस्लीम धर्म अस्तित्वात नव्हता. बळी दिलेल्या प्राण्यांच्या मांसाचे पुढचे सोपस्कार कोण करीत असतील? मांसाचे पुढे काय होत असेल? जैन आणि बौद्ध धर्मीयांच्या प्रभावाखाली आलेल्या वैदिकांनी आणि ब्राह्मणांनी शाकाहाराचा (अिहसेचा नव्हे, अिहसा फक्त मांसाहारापुरती सीमित ठेवली) पुरस्कार हिरिरीने सुरू केला; ती मोहीम आजतागायत सुरू आहे. इसवी सन पूर्व सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने आपल्या आज्ञापत्राद्वारे पहिल्यांदा त्याच्या साम्राज्यात खाण्यासाठी आणि बळी देण्यासाठीच्या प्राणीहत्येवर बंदी घातली. असो.

हेही वाचा >>>मतदान राजा, तुकडोजी महाराज म्हणतात, नीट विचार करून मत दे…!

शाकाहाराचा पुरस्कर्ता असलेल्या बौद्ध धर्माची भारतात पीछेहाट झाली पण तो जगभरात पसरत गेला आणि जैन धर्म इथल्याच मातीत आक्रसत गेला. नवव्या शतकानंतर वैष्णवपंथाची पकड घट्ट होत गेली तसतशी येथील धर्म, वर्ण, जाती आणि सामाजिकव्यवस्था अधिक कप्पेबंद आणि बळकट होत गेली. भारतीय सामाजिक व्यवस्थेत चार वर्णाबाहेरच्या अनेक जाती होत्या, ज्यांना पुढे हिंदू धर्म चिकटविण्यात आला. इथल्या आदिम जमाती व आदिवासी मात्र या धार्मिक चौकटीतून वा संकटातून तेव्हा सुटला होता, आता त्यांचेही वैदिकीकरण करण्याची मोहीम सुरू आहे. हे वर्णीय किंवा सामाजिक भेदाभेद फक्त तेवढय़ापुरते मर्यादित वा कप्पेबंद नव्हते तर जन्मापासून मृत्यूपर्यंत, स्वतंत्र आणि वेगवेगळे होते. जशी विवाहव्यवस्था बळकट होती तशीच त्या त्या जाती समूहाची खाद्यसंस्कृतीसुद्धा कप्पेबंद होती. चुकून कधी अगदी वरच्या जातीकडून काही अन्न वाढून दिले गेले तर खालच्या जातींना वरची जात काय खाते हे कळत असे. तसे एकदम खालच्या जातीतील माणसे काय खातात हे वरच्या जातींना कधीही कळले नाही. तामसी आहार असणाऱ्यांच्या अन्नात कशाकशाचा समावेश होतो, हे आजही कोणी नीटसे सांगू शकणार नाही, कारण शूद्र, शुद्रातीशूद्र, वर्णबाह्य माणसे काय खातात याच्याशी उच्चवर्णीयांना देणे-घेणे नव्हते. त्यांना फक्त धर्माच्या आणि कर्माच्या नावावर गुलाम केलेले सेवेकरी हवे होते. तोंडदेखले तुम्ही आम्ही एकाच धर्माचे म्हणत असताना उच्चवर्णीयांचे देव, त्यांची देवळे, पूजाअर्चना, प्रथा, परंपरा, वैदिक मंत्र हे तथाकथित खालच्या, अस्पृश्य जातींच्या देवांपेक्षा आणि प्रथापरंपरांपेक्षा तेव्हाही भिन्न होत्या आणि आजही भिन्न आहेत. तथाकथित खालच्या जातींना एक तर उच्चवर्णीयांच्या मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. तर तथाकथित खालच्या जातींना देवळांची, पुजारीनामक मध्यस्थांची गरज नव्हती, आजही नाही. महत्त्वाचे म्हणजे तथाकथित खालच्या लोकांच्या देवांना कोंबडं, बकरं, मेंढा, रेडा वा कुठे डुक्कर बळी दिले की, देव समाधान पावायचे. जे भक्त खातात, तेच त्यांचे देवही खातात. या देवांना बळी देण्याबद्दल वरच्या जातींनी आक्षेप घेतल्याचे दिसत नाही, अपवाद वारकरी संप्रदायातील संतांचा. त्यांनी आक्षेप नोंदविलेले किंवा (शाब्दिक) प्रबोधन केलेले तेवढे आढळते.

जे चातुर्मास पाळत किंवा पाळतात, जे श्रावण पाळतात ते कोणत्या वर्णाचे, जातीचे असतात? पूर्वाश्रमीच्या तथाकथित खालच्या जातींवर श्रावण पाळण्याची कोणी सक्ती केल्याची उदाहरणे आहेत का? त्यांनी श्रावण पाळला असता तर या श्रमिकांनी घरी बसल्यावर काय खायचे होते? शेतीतील कामे कुणी केली असती? या धर्मातील काही अस्पृश्य जातींना तर मेलेली ढोरे ओढून नेण्याचे काम सक्तीने करावे लागे. अन्नधान्याची आबाळ असल्याने त्याच मेलेल्या ढोराचे मांस खाण्याची वेळ त्या जातींवर आली होती, तेव्हा त्यांना कोणी ते खाऊ नका म्हणून सांगितले का? कोणी सात्त्विक किंवा राजस आहाराचा पर्याय दिला का? असो.

परवा पंतप्रधान जे म्हणाले की, ‘विरोधी पक्षातील लोक श्रावणातील मांसाहाराचे फोटो टाकून बहुसंख्याकांच्या भावनांचा अपमान करतात,’ तेव्हा हे सांगावेसे वाटते की, या निमित्ताने सकळ भारतातील सकळ हिंदूंमधील शाकाहारी आणि मांसाहारी हिंदूंची जनगणना करायला काय हरकत आहे? आहारानुसार हिंदूंमधील अल्पसंख्याक कोण आणि बहुसंख्याक कोण याचाही कायमचा निवाडा होईल. उत्तर भारतातील श्रावण हा दक्षिण भारतातील श्रावणाच्या १५ दिवस आधी संपलेला असतो. मग उत्तर भारतातील अर्धशाकाहारी धार्मिक हिंदूंनी दीड महिना श्रावण पाळायचा की दक्षिण भारतातील अर्धशाकाहारी धार्मिक हिंदूंनी दीड महिना श्रावण पाळायचा? जर हिंदू धर्माचे पालनच करायला भाग पाडायचे आहे तर मग हिंदूंसाठी चातुर्मास पाळण्याचा आग्रह का धरू नये?

भारतात अनुसूचित जातींसंबंधीची आहारविषयक निश्चित आकडेवारी गोळा करण्यात आली होती. इ.स. १८०६ नंतर ब्रिटिशांनी भारतातील जातींच्या नोंदी करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी ब्रिटिशांनी ‘अँथ्रोपॉलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ची (एएसआय) स्थापना केली. त्यांनी १८८१ ते १९४१ पर्यंतच्या जनगणनेत जातनिहाय नोंदी केल्या. स्वातंत्र्योत्तर काळातही अशा नोंदी घेतल्या गेल्या. एएसआयने पुन्हा १९८५ पासून जातींच्या नोंदींचा नव्याने आढावा घेतला, त्याशिवाय राज्यनिहाय ‘बॅकवर्ड क्लास कमिशन’ची स्थापना करून अनुसूचित जाती, जमातींची आकडेवारी संकलित करण्यात आली. त्याच नोंदी पुढे मंडल आयोगाकडे देण्यात आल्या.

मंडल आयोगाला दिलेल्या अहवालानुसार भारतात ६,७४८ जातीसमूह होते, त्यापैकी ४,६३५ जाती निश्चित करून त्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार भारतातील सर्वच अनुसूचित जाती-जमाती मांसाहार करत. पैकी काही जातींनी भक्तिसंप्रदायाच्या प्रभावाखाली मांसाहार बंद केला असेल; पण ते मुळात मांसाहारी होते. शाकाहाराकडे वळलेल्या या जाती उच्चवर्णीय हिंदूंच्या प्रभावाखाली आल्या होत्या, असा निष्कर्ष काढला गेला. ज्या जातींचा सविस्तर अभ्यास केला होता त्यापैकी १०४ जाती गाय, बैल, म्हशींचे मांस खाणाऱ्या होत्या, ११७ जाती फक्त बैलाचे, ३५८ जाती डुकराचे, तर २७ जाती मेलेल्या ढोरांचे मांस खाणाऱ्या होत्या. १०१ जातींनी पारंपरिकरीत्या खाल्ले जाणारे गाई-बैलांचे मांस (बीफ) खाणे सोडले. त्या अन्य मांसाहारांकडे वळल्या, तर काही शाकाहाराकडे वळल्या. या जातसमूहांची मद्यपाना-बद्दलची आकडेवारीही याच प्रकारची आहे, त्यात महिलांचाही काही प्रमाणात समावेश होतो.

विशेष म्हणजे (पूर्वी) मेलेले आणि हलाल गोवंशमांस, म्हशींचे, रेडय़ांचे, डुकरांचे मांस भक्षण करणाऱ्या या सर्व जाती हिंदू म्हणूनच ओळखल्या जात. किती उच्चवर्णीय हिंदूंना हिंदूंमधीलच काही जाती परंपरेने गोमांस भक्षण करतात, हे माहीत आहे? आहारांचे निकष लावून हिंदूंमध्ये कोण बहुसंख्याक आहेत आणि कोण अल्पसंख्याक आहेत याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा! बहुतेक सर्वसामान्य हिंदू कोणत्याही धार्मिक मतप्रणालीविषयी अनभिज्ञ असतात. त्यांना वैदिक, ब्राह्मण, सनातनी आणि हिंदू अशी धर्मविभागणी माहीत नसते. त्यांच्या परिसरात गावात शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक परंपरांशिवाय काहीही माहीत नसे. धर्माची किंवा प्रथा, परंपरांची चिकित्सा करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. एकुणात काय तर, हिंदू हिंदू म्हणून सर्वसामान्य हिंदूंचे वैदिकीकरण करण्याचा अजेंडा राबवला जात आहे, याचे सर्वसामान्य हिंदूंना काहीच देणे-घेणे नाही! त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या पंतप्रधानांचे हे श्रावण पाळण्याबद्दलचे जाहीर भाष्य होय.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi criticism of the non vegetarian video in the india alliance amy
First published on: 18-04-2024 at 04:32 IST