एकाच छापाच्या ५० रिसॉर्ट्सपैकी एखाद्या रिसॉर्टला जायचं आणि नवा म्हणावा असा कोणताही अनुभव न घेता परत यायचं. अशी कधी सहल असते का? साधारण २० वर्षांपूर्वीपर्यंत शाळेच्या सहली शहराबाहेरची एखादी टेकडी, जवळपासचं धरण, समुद्र किंवा खाडी, एखादा कारखाना… अशा ठिकाणी नेल्या जात. एनसीसी किंवा स्काऊटचे कॅम्प भरविण्यासाठी जवळच्या गावांत कॅम्प साईट असत. तीन दिवस गावात राहणं, स्वतःची सगळी कामं स्वतः करणं, तिथले लोक कसे राहतात, आपला परिसर कसा आहे हे जाणून घेणं, नवं काही शिकणं… शाळेच्या सहली असं बरंच काही देऊन जात. आजची रिसॉर्टमधली सहल मुलांना यातलं काय देऊ शकते? मुलांचं अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या सहली कधी आणि का बंद झाल्या, त्या बंद करून काय साध्य झालं आणि वर्षातला हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम केवळ उरकला जाऊ लागल्याने मुलांच्या विकासातली एक पायरी पूर्णपणे गाळली जातेय का, यावर विचार होणं गरजेचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी पालक अगदी डोळे झाकून मुलांना शिक्षकांबरोबर कुठेही पाठवत. मग ती एखादी क्रीडा, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा असो, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन असो, सहली – कॅम्प असोत किंवा अन्य कोणताही उपक्रम. मुलांना शक्यतो घराजवळच्या शाळेत घातलं जातं असे. परिसरातली सगळी मुलं त्याच ठरलेल्या दोन – तीन शाळांपैकी एका शाळेत जात. रोज आई – बाबांपैकीच कोणी मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जात असे. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांपासून, शिपयांपर्यंत आणि अन्य विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत प्रत्येकाला प्रत्येकजण वैयक्तिकरित्या ओळखत असे. अनेकदा तर दोन पिढ्या एकच शाळेत शिकलेल्या असतं. त्यामुळे सगळे शिक्षक अख्ख्या कुटुंबाच्या ओळखीचे असत. काही तक्रारी असल्यास लगेच भेटून त्या दूर करता येत. आपण केलेल्या खोड्या घरी कळणार याचं दडपण जसं विद्यार्थ्यांवर होतं तसंच आपल्या हातून काही गैर घडलं तर ताबडतोब अख्ख्या शहराला समजणार हे शिक्षक आणि अन्य कर्मचारीही जाणून होते. आता हा वचक राहिलेला नाही. आणि त्यात कोणा एकाची काही चूकही नाही.

हेही वाचा – उद्योगांवर कृपादृष्टी… सामान्यांवर वक्रदृष्टी!

वेगवेगळी बोर्डं, त्यातलं अधिकाधिक चांगलं कोणतं, त्या बोर्डाची सर्वोत्तम शाळा कोणती असा सगळा अभ्यास करून, झालंच तर ती शाळा आपल्या प्रतिष्ठेला शोभणारी आहे ना, हे पडताळून मुलांना तिथे प्रवेश मिळवून दिला जातो. अशा सर्व निकषांत बसणारी शाळा घरापासून अर्धा – पाऊण तासाच्या अंतरावर असली तरीही चालते. मग बहुतेक मुलं स्कूल बसने शाळेत जातात. साधारणपणे वर्षाच्या सुरुवातीला सर्व विषयांच्या शिक्षकांशी तोंडओळख करून दिली जाते आणि मग महिन्याकाठी अर्धा तास वर्गशिक्षक भेटतात. बहुतेक पालकांची एकमेकांशी ओळख केवळ शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंतच मर्यादित असते. आपल्या मुलाच्या भोवतालाचा पालकांना फारसा अंदाज येतच नाही.

पूर्वी शाळेच्या आणि शाळाबाह्यही प्रत्येक उपक्रमाची तयारी शिक्षक स्वतः मुलांकडून करून घेत. वह्या – पुस्तकं आणि गणवेश घेऊन दिले की पालकांची जबाबदारी संपत असे. स्नेहसंमेलनासाठी कोरिओग्राफर नेमा, प्रोजेक्ट्ससाठी पालक नेमा, चित्रकला – शिष्यवृत्ती परीक्षांसाठी क्लास लावा आणि सहलीसाठी इव्हेंट कंपनी नेमा असले प्रकार तेव्हा नव्हते… मुलांना जास्त वेळ वर्गात बसवून, शनिवार – रविवारी शाळेत बोलावून सराव करून घेतला जात असे. स्नेहसंमेलनासाठी भाड्याने पोशाख आणण्याचं प्रमाणही तुरळक होतं. शिक्षक स्वतःच किंवा माजी विद्यार्थी, हौशी पालकांच्या मदतीने नृत्य नाटक बसवण्यापासून, पोशाख, प्रॉप्स तयार करण्यापर्यंत सर्व कामं करत. यातून जे बाँडींग होत असे, ते आता शोधूनही सापडत नाही. या सगळ्या कामांचं आऊटसोर्सिंग झालं आहे. त्यामुळे शाळेतली मुलं ही आपली मुलं आहेत, अशी जिव्हाळ्याची भावना निर्माण होत नाही. सिलॅबस संपला की माझी जबाबदारी संपली असा अलिप्तपणा अधिक दिसतो. ही अलिप्तताच घातक ठरते.

कुटुंबाबरोबर टूरला जाणं ही संकल्पना मध्यमवर्गात आताशी रुळू लागली आहे. आधीच्या पिढ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाशिवय पर्याय नसे. शाळेची एक किंवा तीन दिवसांची सहल किंवा कॅम्प हीच वर्षाकाठी एकमेव टूर असे. आता पालक भरमसाठ पैसे भरून मुलांना दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत कॅम्पला पाठवायलाही तयार असतात. पण अर्थात आता हे सगळे शाळाबाह्य उपक्रम असतात. कारण शाळांत आता तेवढी उसंतही नाही आणि उत्साहही नाही. २०-२२ वर्षांपूर्वीपर्यंत सहली खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या असत.

उद्या पहाटे निघायच्या उत्साहात रात्रभर झोपच न लागणं, आपण झोपून राहिलो आणि बस निघून गेली तर… या भीतीने बेजार होणं, सर्वांत आधी धावत जाऊन शेवटची सीट पकडणं, नवा भोवताल हरखून जाऊन पाहणं, वर्तुळात बसून एकमेकांच्या डब्यातले पाच पन्नास पदार्थ हादडणं, कॅम्प असेल तर मोकळ्या हवेतल्या मोठल्या कॅम्प साईटवर राहणं, मिळून मिसळून सगळी कामं करणं, शाळेच्या मैदानात जे खेळ शक्य नाहीत ते तिथल्या अवाढव्य जागेत खेळणं, निसर्गात राहताना तिथल्याच घटकांचा वापर करून आपलं आयुष्य किती सोपं होऊ शकतं हे जाणून घेणं, शरीराच्या क्षमतांना आव्हान देणं, रात्री खुल्या आभाळखाली शेकोटीभोवती मनमुराद गाणी गाणं, रात्री उशिरापर्यंत खोड्या काढून दमल्यावर झोपून पुन्हा पहाटे उठणं, पुन्हा नवं काही शिकणं, शेवटच्या दिवशी बसलेला घसा आणि धडपडून फुटलेली ढोपरं घेऊन घरी येणं आणि पुढची वर्षानुवर्ष त्या एका दिवसाचे किस्से सांगून खुश होणं हे सारं माणूस म्हणून घडवणारं असे.

हेही वाचा – जर्मनीत लोकशाहीवादी विरुद्ध फासिस्ट शक्ती!

पण अधे-मध्ये शालेय सहलीच्या बसचा अपघात होणं, सहलीला गेलेले विद्यार्थी समुद्रात बुडणं अशा घटना घडत गेल्या आणि सहलीचं रूप पालटत गेलं. काही काळ तर शाळांनी सहली पूर्ण बंदच केल्या होत्या. नंतर शाळांनी या जबाबदारीतून अंग काढून घेतलं आणि थर्ड पार्टीचा उदय झाला. आता परिस्थिती अशी आहे की मुलं दर दोन – तीन महिन्यांनी पलकांबरोबर कोणत्या तरी नव्या रिसॉर्टला जातच असतात. त्यात शाळेच्या सहलीही तशाच एखाद्या रिसॉर्टला नेतात. कॅम्पसुद्धा आता रिसॉर्टच्याच आवारात होऊ लागले आहेत. मग त्याच राईड्स, तोच स्विमिंग पूल आणि तेच जेवण. सहलीच्या दिवशी मुलं शाळेत आल्यापासून एखाद्या पर्यटन किंवा इव्हेंट कंपनीची स्मार्ट गणवेश घातलेली तरुण मुलं त्यांचा ताबा घेतात. त्या कंपनीची आणि त्यांनी तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची पूर्ण माहिती मिळवणं कितपत शक्य असतं? मुलांना रांगेत नेऊन बसमध्ये बसवण्यापासून, मुलं स्विमिंग पूल आणि राईड्समध्ये असताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यापर्यंत सगळी जबाबदारी त्यांचीच असते. मुलाला वर्षभर किंवा वर्षानुवर्ष ओळखणारे शिक्षक त्याची जास्त चांगली काळजी घेऊ शकतात की असा कोणीतरी बाहेरून आलेला, ज्याची काही पार्श्वभूमी माहीत नाही असा कर्मचारी? शिक्षकांवर जास्त ताण येऊ नये म्हणून सोयीसाठी असे कर्मचारी नेमणं ठीक आहे, पण अंतिम जबदारी शिक्षकांचीच आहे. थर्ड पार्टीवर जबाबदारी टाकून शाळेला मोकळं होता येणार नाही.

शाळेच्या बसमध्ये किंवा आवारात कर्मचाऱ्याने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची वृत्तं अनेकदा येतात. बालकांच्या सुरक्षिततेचं मोल पैशांत मोजता येणार नाही, पण तरीही लाखो रुपये फी आकारण्यात येणाऱ्या शाळांत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची अशी हेळसांड कशी होऊ शकते? तरी एक गोष्ट बरी की अलीकडे पालक आणि बालहक्कंसाठी काम करणाऱ्या संस्था मुलांना शोषक प्रवृत्तींविरोधात जागरूक करू लागल्या आहेत. तुम्हाला एखादा स्पर्श योग्य वाटत नसेल तर तो योग्य नसतोच, तुम्ही लगेच मदत मागा, मोठ्या आवाजात बोलून इतरांपर्यंत तुमचं म्हणणं पोहोचवा… ही शिकवण दिली जाऊ लागली आहे. त्यामुळे किमान मुलं न घाबरता बोलू लागली आहेत. अशी जागरूकता त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हातभार तरी लावू शकेल…

पूर्वी असं काही घडतंच नव्हतं असा दावा करता येणार नाही, पण आता हे प्रमाण वाढलं आहे. कदाचित मुलं आणि पालक या विषयावर खुलेपणाने बोलू लागल्यामुळे, आवाज उठवू लागल्यामुळेही असेल… पण ज्या समाजात मुलांसारखी निरागस गोष्ट सुरक्षित नसेल त्या समाजात नक्कीच बरंच काही बिघडलं आहे हे मात्र निश्चित.

vijaya.jangle@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The nature of school trip has changed school trip work is now being outsourced the issue of childrens safety has become important ssb
First published on: 24-02-2024 at 09:22 IST