गेले वर्षभर मनाच्या श्लोकांतील ७६ श्लोकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण केला. आता या सदराचं हे मध्यांतर आहे! हे मध्यांतर म्हणजे मध्येच सोडून जाणं नव्हे, तर आपल्या मनाचा मध्य किती पालटला, याची थोडी चाचपणी करण्याची ही संधी आहे. मनाचे श्लोक हे तसे अत्यंत सर्वपरिचित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे श्लोक वाचताना प्रथम वाटे की एकदा खरं ज्ञान काय, ते सांगून झाल्यावर मग अचानक वेगळाच विषय का सुरू होतो? म्हणजे दहावीपर्यंत शिकत गेल्यावर एकदम चौथीचं पुस्तक शिकवायला कोणी सुरुवात केली, तर काय होईल? तसं वाटायचं. माझ्या ज्येष्ठ गुरूबंधूंनी मात्र मनाच्या पहिल्या काही श्लोकांचा क्रम किती अचूक आहे, हे मला सर्वप्रथम समजावलं. त्याआधी एक गोष्ट घडली. एकदा सद्गुरूंकडे उत्तर भारतातल्या घरी असताना त्यांनी सहज मनाच्या श्लोकांचा विषय काढला. मी म्हणालो, ‘‘या श्लोकांतला ११वा श्लोक आहे.. ‘‘जनीं सर्वसूखीं असा कोण आहे। विचारें मना तूंचि शोधूनि पाहें।’’ म्हणजे यातच एक प्रश्नही आहे आणि यातच त्याचं उत्तरही आहे. जगात सर्वात सुखी कोण, हा तो प्रश्न आहे आणि हे विचारी मना, तूच सुखी आहेस, हे उत्तर! कारण जे मन विचार करतं तेच सुखी असतं!’’ गुरूजी हसले आणि म्हणाले, ‘‘विचार तर काय वेडाही करतो, कैदीही करतो.. एवढय़ानं ते सुखी असतात का?’’ मलाही वाटलं खरंच आहे की! माणूस आधी आपल्या वेडेपणातून चुका करतो आणि त्या चुकांपायी दु:ख वाटय़ाला आलं की विचार करतो, आपण असं करायला नको होतं! बरेचदा माणूस अर्धवट विचारच करत असतो आणि त्यातून सुख नव्हे तर दु:खच वाटय़ाला येत असतं. माझ्या मनात हे विचार सुरू असतानाच गुरूजी म्हणाले,

‘‘तेव्हा खरा विचार कोणता हे कळलं पाहिजे. केवळ भगवंताचा विचार हाच खरा विचार आहे. बाकी सगळा अविचारच आहे!’’ आणि अगदी पूर्णसत्य आहे हे.. माणूस जो जो विचार करत जातो तो तो अविचारातच परावर्तित होत असतो. भगवंताच्या या विचाराची कास कशी धरायची, ते समर्थानी मनाच्या श्लोकांतून सांगितलं आहे, हे सद्गुरूंमुळे मनावर बिंबलं. पण पहिल्या श्लोकापासूनच सद्गुरूचा विचार हाच सद्विचार समर्थानी मांडला आहे, हे माझ्या ज्येष्ठ गुरूबंधूंनीच समजावलं. ‘‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा..’’

हे स्तवन इंद्रियगणांचा अधिपती, त्रिगुणातीत अशा सद्गुरूंचंच, हा दृष्टिपालट त्यांनी घडवला आणि मग कित्येक दिवस त्यांच्या पायाशी बसून सद्गुरूंच्याच इच्छेनं प्रवाहित होत असलेला मनाच्या श्लोकांचा गूढार्थ मी ऐकला.. त्यातलं जेवढं स्मरणात राहीलं आणि आताही सद्गुरू जेवढं अंतरंगात प्रकाशित करीत आहेत त्यातलं जेवढं म्हणून उमगलं तेवढं तुमच्यासमोर मांडण्याचा एक मर्यादित प्रयत्न मी करीत आहे. मुळात सज्जनगडावर उत्सवासाठी दरबारातून वेळेवर धनधान्य न आल्यानं खचलेल्या शिष्यांना सद्गुरू आधाराची जाणीव करून देण्यासाठी जे श्लोक अवतरले त्यांचा हेतू दुसरा असूच कसा शकेल? तेव्हा या श्लोका श्लोकांतून सद्गुरूंच्या आधाराचंच दर्शन घडत असलं पाहिजे, हे मनानं घेतलं आणि त्यादृष्टीनं वारंवार हे श्लोक वाचले गेले. ‘‘मनाचे श्लोक म्हणजे मनाची इंजेक्शन आहेत,’’ हे श्रीगोंदवलेकर महाराज यांचं वचन मी अनुभवलंही आहे.  मनातले विकल्प, मनातली अस्थिरता, मनाचं खचलेपण या श्लोकांनी अनेकदा दूर झालं आणि सद्गुरूंची जाणीव अधिक पक्व झाली. नकळत्या वयात वाचत वाचत हे श्लोक पाठ होत गेले तेव्हाही मनाचं खचलेपण ओसरत होतं. ते आता कळत आहेत, असं नाही, पण कळल्यासारखे वाटतात तेव्हाही सद्गुरूकृपेची जाणीव मन व्यापून टाकते!

चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
Show comments