गेल्या तीन वर्षांत भारतात दाखल झालेल्या काही चिनी कंपन्यांपैकी एक म्हणजे विवो. या कंपनीने स्वस्त फोनपासून ते महागडय़ा फोनपर्यंत सर्वच पर्याय बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी मध्यम किमतीच्या फोनमध्ये विवो व्ही १ मॅक्स या फोनचा समावेश होतो. हा फोन विवोच्या चिनी अ‍ॅपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागडय़ा एक्स ५ मॅक्स या फोनच्या तोडीस तोड आहे. या दोन्ही फोनच्या दिसण्यात एकच मोठा फरक आहे तो म्हणजे दोन्ही फोनच्या स्पीकरची जागा. चिनी स्पर्धक जीओनी, ओप्पो, शिओमी आणि वनप्लसला टक्कर देण्याच्या दृष्टीने या फोनची रचना सर्वोत्तम देण्यात आली आहे.

काय चांगले
विवो व्ही १ मॅक्स हा फोन जेव्हा तुम्ही हातात घेता तेव्हा एखादा महागडा फोन हातात घेतल्याचा भास तुम्हाला होतो. धातू आणि प्लास्टिकच्या मदतीने तयार केलेला हा फोन इतर चिनी स्पर्धकांच्या तुलनेत काही प्रमाणात उजवा ठरतो. या फोनचा डिस्प्ले ५.५ इंचाचा असून त्यावर ७२० पिक्सेलचे आयपीएस एलसीडी पॅनल बसविण्यात आले आहे. यामुळे फोनमध्ये रंगसंगती खूप चांगल्याप्रकारे अनुभवता येते. यामध्ये देण्यात आलेल्या ऑटो ब्राइटनेस सुविधेमुळे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणच्या प्रकाशानुसार मोबाइलचा प्रकाश काम करतो. याशिवाय यातील नाइट मोडमध्ये आपल्याला एकाचवेळी नोटिफिकेशन आणि वेळ पाहता येते. हा प्रकार स्मार्टफोनमध्ये फारच कमी पाहावयास मिळतो.
या फोनमध्ये देण्यात आलेला कॅमेरा ही या फोनची वेगळीच खासियत आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे, तर फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या विशेष सुविधांमुळे कॅमेरा उजवा ठरतो. अशाच प्रकारचा कॅमेरा कंपनीच्या एक्स ५ प्रोमध्येही देण्यात आला आहे. म्हणजे महागडय़ा फोनमधील कॅमेऱ्याचे फिचर्स मध्यम किमतीच्या फोनमध्ये देण्याचे धाडसच कंपनीने केल्याचे म्हणण्यास हरकत नाही. या कॅमेराचा वापर लँडस्केप, प्राणी, पक्षी, गाडय़ा अशा विविध गोष्टींची दर्जेदार छायाचित्रे घेण्यासाठी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये २७२० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही या फोनची आणखी एक जमेची बाजू आहे. याचबरोबर यात दोन जीबी रॅम देण्यात आल्याने फोनची काम करण्याची क्षमता अधिक चांगली होते. तसेच ऑक्टा कोर १.३६ गीगाहर्टझ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये आपल्याला १६ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. ही क्षमता आपण एसडी कार्डच्या साह्याने ३२ जीबीने वाढवू शकतो.

काही त्रुटी
या फोनमध्ये प्रत्यक्षात दोन स्पीकर्स देण्यात आले आहेत. मात्र त्या स्पीकर्सची जागा चुकल्यासारखी वाटते. आपण सामान्यत: फोन पकडण्यासाठी जेथे हात पकडतो तेथेच हे स्पीकर आल्यामुळे त्याच्या आवाजावर परिणाम होतो. मुळात दोन स्पीकर्स असूनही त्याचा आवाज तुलनेत कमी वाटतो. यामुळे जर स्पीकर्सवर हात आले तर आवाज आणखीच कमी होतो. या फोनमध्ये ज्या तोडीचा कॅमेरा देण्यात आला आहे त्याला पूरक असे सॉफ्टवेअर देण्यात मात्र कंपनीने थोडी कुचराई केल्यासारखे वाटते. आयएसओसारख्या सेटिंग्ज वापरकर्त्यांला सहज उपलब्ध होताना दिसत नाहीत. याशिवाय नाइट मोडमध्ये कमी प्रकाशात तर फोटोचा दर्जा आणखीनच खालावतो. याशिवाय फोनच्या रचनेत आणखी एक अडचण अशी जाणवते ती म्हणजे कॅमेरा हा तुलनेत वरच्या बाजूस देण्यात आला आहे. यामुळे फोटो काढताना आपण जेव्हा फोन नीट पकडतो, त्या वेळेस अनेकदा आपला हात लेन्सवर येत असल्यासारखे भासते.

थोडक्यात
या फोनचा कॅमेरा आणि हार्डवेअरची क्षमता लक्षात घेता फोन इतर स्पर्धकांच्या तुलनेत उजवा ठरतो. मात्र काही सुविधांच्या सॉफ्टवेअरच्याबाबतीत हा फोन काही प्रमाणात मागे पडतो. यामुळे कॅमेरा, बॅटरी आणि काम करण्याचे सातत्य हवे असेल तर या फोनचा पर्याय तुम्हाला योग्य ठरू शकतो.
किंमत – २१,९८० रुपये.