आपण जेव्हा स्मार्टफोन खरेदीसाठी जातो तेव्हा प्रामुख्याने त्या फोनचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे याचा विचार करताना दिसतो. मात्र हा कॅमेरा नेमका किती चांगला फोटो देऊ शकतो याचा विचार फारसा करताना दिसत नाही. यामुळे अनेकदा दोन-पाच मेगापिक्सेल कॅमेराच्या फोनमधून काढलेल्या छायाचित्रांच्या स्पष्टतेतही खूप फरक जाणवतो. यामुळे मोबाइल कॅमेरा घेताना केवळ मेगापिक्सेलकडेच न पाहता आणखी काही बाबींचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

सध्या बाजारात ५ मेगापिक्सेलपासून ते ५० मेगापिक्सेलपर्यंत मोबाइल फोन्स उपलब्ध आहेत. अनेकदा लोक चांगला मेगापिक्सेल आहे म्हणून फोन खरेदी करतात. मात्र त्या फोनमधून काढलेले फोटो फारसे स्पष्ट येत नाहीत. मग इतके चांगले मेगापिक्सेल असले तरी फोटो चांगला येत नसल्यामुळे लोक कॅमेरा खराब आहे असे म्हणतात आणि शांत राहतात. केवळ कॅमेरा खराब आहे म्हणून पूर्ण फोन बाद करणारे फारच कमी आहेत. अनेक कमी मोबाइल असे आहेत की जे आपल्याला चांगल्या दर्जाचे कॅमेरा उपलब्ध करून देतात. यामुळे मोबाइल कॅमेराची निवड करतानाही केवळ मेगापिक्सेलवर आधारित न करता त्यातील इतर गोष्टींचाही विचार करावा. जेणेकरून तुम्हाला चांगला कॅमेरा उपलब्ध होऊ शकतो.
रिझोल्युशन आणि इमेज सेन्सर : सामान्य कॅमेराप्रमाणेच यामध्येही लेन्सद्वारेच प्रकाश पडतो. यामुळे फोटोचा चांगला दर्जा अपेक्षित असेल तर इमेज सेन्सर महत्त्वाचा आहे. कॅमेरासोबत देण्यात येणारे रिझोल्युशनही महत्त्वाची भूमिका बजावतो. रिझोल्युशनमुळे तुम्ही काढलेला फोटो किती लहान व मोठा होऊ शकतो हे अवलंबून आहे.
फ्लॅश – फ्लॅशमुळे तुम्हाला कमी उजेडातील फोटोही चांगल्या प्रकारे काढता येतात. यामुळे मोबाइल व कॅमेरालाही फ्लॅश महत्त्वाचा ठरतो. यामध्ये सध्या बाजारात एलईडी, डय़ुएल एलईडी, एक्सीनॉन फ्लॅश असे पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे तुमचा मोबाइलचा फ्लॅशलाइट किती प्रखर आहे हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. अन्यथा रात्री किंवा कमी उजेडाच्या ठिकाणी काढलेले फोटो फारसे चांगले येत नाहीत.
व्हिडीओ रेकॉर्डिग : व्हिडीओ रेकॉर्डिगसाठी तुमच्या कॅमेरामध्ये किमान ३०-१२० फ्रेम्स प्रतिसेकंद हा दर असणे अपेक्षित आहे. सध्या बाजारात एचडी किंवा फूलएचडी असे व्हिडीओजचे पर्याय आहेत. यामध्ये केलेले व्हिडीओ अधिक सखोल आणि स्वच्छ दिसतात. पण यामध्येही रिझोल्युशन महत्त्वाची भूमिका बजावतो. जर कमी रिझोल्युशन असेल तर एचडी टीव्ही किंवा मॉनिटरवर व्हिडीओ चांगला दिसणार नाही.
फ्रंट कॅमेरा : फ्रंट कॅमेराचा उपयोग हा व्हिडीओ कॉल्स किंवा सेल्फीसाठी मोठय़ा प्रमाणावर उपयोग होतो. याचेही रिझोल्युशन तितकेच महत्त्वाचे होते. यासाठी हा कॅमेरा किमान १.३ मेगापिक्सेलचा असणे आवश्यक आहे.
झूम : मोबाइल कॅमेराला ऑप्टिकल झूमचा वापर केल्यास फोटोचा दर्जा चांगल्या प्रकारे येतो. मात्र डिजिटल झूम असेल तर फोटोचा दर्जा कमी होऊ शकतो.
इमेज स्टॅबिलायझेशन : सामान्यत: मोबाइल कॅमेरांमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझरचा वापर होतो. यामुळे फोटो काढताना हात हलला तर तो ब्लर होण्याची शक्यता खूप जास्त असते. मात्र हीच शक्यता ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन खूप कमी असते. म्हणजे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करताना हात हलला तर ब्लर होण्याची शक्यता कमी होते.
सॉफ्टवेअर : मोबाइल कॅमेराच्या हार्डवेअर सोबतच सॉफ्टवेअरही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. यात ऑटो फोकस, टच फोकस आणि एचडीआर हे सॉफ्टवेअर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एखाद्या वस्तूचे छायाचित्र काढायचे असेल तर ऑटोफोकस मोटर आणि सेन्सर मदत करते. टचफोकसमध्ये आपण कॅमेऱ्यात दिसणाऱ्या अनेक वस्तूंपैकी आपल्याला पाहिजे त्या वस्तूची निवड करून छायाचित्र काढू शकतो. तर एचडीआरमुळे फोटोचा दर्जा चांगलाच वाढतो.
niraj.pandit@expressindia.com