वाहन नोंदणीसाठी नागरिकांचे हेलपाटे; कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी
वसईमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सदैव गजबजलेले असले तरी तिथे कर्मचाऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा आहे. केवळ ५० टक्केच मुनष्यबळ असल्याने तेथील उपलब्ध कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागते. याचा फटका वाहन नोंदणी करण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बसत असून त्यांना सातत्याने या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
सप्टेंबर २०११ रोजी वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती. एमएच ४८ या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. आतापर्यंत तब्बल २ लाख ५८ हजार वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. विरारच्या चंदनासार येथे हे कार्यालय आहे. दररोज शकडो लोक विविध कामांसाठी तेथे जात असतात; परंतु या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. वाहनांची नोंदणी, हस्तांतर, परवानेवाटप, त्यांचे नूतनीकरण, तपासणी, कर्ज चढवणे आदी विविध प्रकारची कार्यालयीन कामे करावी लागतात. याशिवाय भरारी पथक स्थापन करून वाहनांची तपासणी, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, जप्ती आदी कामे करावी लागतात. कर्मचारी कमी असल्याने या कामावर परिणाम होत असतो. त्यामुळे अनेकदा नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. वेळेत नागरिकांची कामे होत नसल्याने नागरिकही त्रस्त असून त्यांनी परिवहन खात्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.
आमच्याकडे कर्मचारी नाहीत ही वस्थुस्थिती आहे. पण आम्ही रात्री उशिरा थांबून काम करीत असतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले. लोकांची कामे वेळेत करून देण्यासाठी सुटीच्या दिवशी- शनिवार- रविवारीसुद्धा कर्मचारी येथे कार्यालयात येऊन काम करीत असतात, असे त्यांनी सांगितले. कर्मचारी कमी असूनही या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांत १६१ कोटी रुपयांची महसूल वसुली केली होती हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार येथील कार्यालयातही अनेक गैरसोयी असून त्याचा त्रास तेथे येणाऱ्या नागरिकांना होत असतो. या कार्यालयात रिक्त पदांवरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भरती करावी.
– आनंद ठाकूर, आमदार.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 percent staff in vasai rto office
Show comments