ठाणे : शहरातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासन आणि माजी नगरसेवकांची एकत्रित बैठक बुधवारी सायंकाळी आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला भाजपाचे माजी नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने शहरात वेगवेगळय़ा चर्चेला रंगल्या आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असून त्याच्या नियोजनासाठी भाजपा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे भाजपाचे नगरसेवक अनुपस्थित असल्याचा दावा पक्षा नेत्यांकडून करण्यात आला आहे

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित केली होती.

हेही वाचा >>> पदवी प्रवेशाची पहिली यादी आज; २ लाख ५० हजारांवर विद्यार्थ्यांची नावनोंदणी

सर्व प्रभागातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण व्हावीत तसेच पावसाळय़ात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा निरोप म्हस्के यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीतील सर्व माजी नगरसेवकांना दिला होता. या बैठकीला भाजपाचे माजी नगरसेवक अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली असून या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १६ जूनला ठाण्यात येणार आहेत.  त्याच्या नियोजनासाठी भाजपा कार्यालयात अचानकपणे बुधवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार म्हस्के यांनी आयोजित केलेल्या वैठकीच्या वेळेतच भाजपने बैठक आयोजित केली होती. तसेच भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या बैठकीला उपस्थितीत राहण्याचे आदेश दिले होते. यामुळे खासदार म्हस्के यांच्या बैठकीला भाजपाचे नगरसेवक अनुपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेल्या माजी नगरसेवकांनी म्हस्के यांच्या बैठकीबाबत विचारणा केली असता, आम्हाला पक्षाच्या गट कार्यालयातून फोन आलेले नाहीत, त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे नेत्यांकडून सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp absent in meeting of new mps in thane zws
Show comments