तृप्ती शेटय़े
मेट्रोचालक (मेट्रो पायलट), एमएमएमओसीएल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी, मेट्रो २ अ (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) या मार्गिकेतील दहिसर ते आरे असा एकत्रित २०.७३ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. त्यानंतर आरे स्थानकावरील मेट्रो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवरांना घेऊन निघाली. या मेट्रोचे सारथ्यही महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या (एमएमएमओसीएल) महिला मेट्रोचालक तृप्ती शेटय़े यांनी केले. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत-
मेट्रोचे सार्थ करण्याची संधी मिळाली याबद्दल काय सांगाल?
गेली दोन वर्षे मी आणि माझे सर्व सहकारी या एकाच दिवसाची वाट पाहत होतो. तो दिवस म्हणजे मेट्रो मार्गिका सुरू होण्याची आणि प्रवाशांसह मेट्रो चालविण्याची. मेट्रो २ आणि ७ मधील पहिल्या टप्प्यावर मेट्रो गाडी आम्ही मागील कित्येक दिवसांपासून चालवत होतो. मात्र प्रवाशांना घेऊन गाडी चालविण्याची प्रतीक्षा होती. अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही प्रतीक्षा संपली. त्यातही लोकार्पणानंतर पहिली मेट्रो चालविण्याचा मान मला मिळाला याचा आनंद वेगळाच होता. मागील दोन वर्षांपासून गाडी चालवीत असल्याने एक आत्मविश्वास आला आहे. त्यामुळे ही संधी मिळाल्यानंतर कोणतीही भीती वा दडपण नव्हते. गाडी चालवीत असतानाच मुख्यमंत्री आमच्या केबिनमध्ये आले. त्यांनी मला नाव, गाव विचारले. मुख्यमंत्री इतक्या आपुलकीने बोलत होते की आपल्याशी मुख्यमंत्री बोलत आहेत याचे कुठेही दडपण नव्हते. त्यांनी मला गाडीबाबत आणि गाडीतील यंत्रणांबाबत काही गोष्टी विचारल्या. एकूणच हा अनुभव आयुष्यभर माझ्या लक्षात राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रोचालक व्हायचे असे काही ठरविले होते का? या संधीबाबत कशी माहिती मिळाली?
शाळा, महाविद्यालयात असताना पुढे काय करायचे असे काही ठरविले नव्हते. मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते आणि शेवटच्या वर्षांला असताना आपण सरकारी नोकरी करायची हे मात्र पक्के ठरविले. त्यानुसार अभ्यासाची तयारी सुरू केली. शिक्षण पूर्ण झाले त्याच वर्षी २०२० मध्ये एमएमएमओसीएलची जाहिरात वाचली. शैक्षणिक आणि इतर पात्रता पाहता मेट्रोचालक पदासाठी अर्ज केला. मेट्रोचालक या क्षेत्राबाबत थोडी फार माहिती होती. या क्षेत्रात महिला खूप कमी आहेत, पण हे क्षेत्र वेगळे आणि व्यापक असल्याने या पदासाठी अर्ज केला. या पदासाठी सुमारे १५ हजार अर्ज आले होते. त्यासाठी पहिली एक परीक्षा झाली. त्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढे साइकोमेट्रिक टेस्ट झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाली. या सर्व पायऱ्या पार करत अखेर माझी मेट्रोचालक म्हणून निवड झाली. १५ हजारांमधून केवळ १२ जणांची मेट्रोचालक पदासाठी निवड झाली.

मेट्रोचालक म्हणून काम करण्यासाठी शैक्षणिक आणि इतर कोणत्या पात्रतेची गरज असते?
मेट्रोचालक म्हणून काम करण्यासाठी इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकलमधील डिप्लोमा तसेच बीएससी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणेही आवश्यक असते. त्यातही तुमची दृष्टी (नजर) योग्य असणे गरजेचे असते. कोणत्याही वेळी काहीही घडू शकते अशावेळी निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे का? एखादी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता याचीही परीक्षा घेतली जात असल्याने यादृष्टीने सर्व पात्रता असणे गरजेचे आहे.

• ‘एमएमएमओसीएल’मध्ये आज किती महिला मेट्रोचालक कार्यरत आहेत?
मेट्रो २ अ आणि ७ साठी एमएमएमओसीएलकडून एकूण ९७ मेट्रोचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वीच नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मेट्रो १ मध्ये महिला मेट्रोचालक कार्यरत आहेत. याअनुषंगाने एमएमएमओसीएलनेही महिला मेट्रोचालकांची नियुक्ती केली आहे. ९७ मेट्रोचालकांची नियुक्ती करताना महिला मेट्रोचालकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार आज ९७ पैकी २१ महिला आहेत. या सर्व महिला मेट्रोचालक आज मेट्रो २ अ आणि ७ च्या पहिल्या टप्प्यात कार्यरत आहेत.

स्वयंचलित, विनाचालक चालणाऱ्या गाडय़ा एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पात असणार आहेत. अशावेळी मेट्रोचालकांना संधी आहे का?
मेट्रो २ अ आणि ७ सह यापुढील मेट्रो प्रकल्पात स्वयंचलित, विनाचालक चालणाऱ्या गाडय़ांचा समावेश असणार आहे. मात्र, विनाचालक चालणाऱ्या मेट्रो गाडय़ा मेट्रोचालकांच्या देखरेखीखालीच चालविल्या जाणार आहेत. म्हणजेच स्वयंचलित गाडी चालणार असली तरी गाडीत मेट्रोचालक असेल आणि त्याचे गाडीवर लक्ष तसेच नियंत्रण असेल. मेट्रोचालक म्हणजे केवळ गाडी चालविणे असे नाही. आम्हाला अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अगदी गाडय़ा स्थानकापासून कारशेडमध्ये नेणे, गाडय़ांची दुरुस्ती करणे, डबे जोडणे अशी अनेक कामे आहेत. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी आहे.

या क्षेत्रात येण्याबाबत महिलांना काय सांगाल?
कोणतेही काम छोटे मोठे नसते. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ज्यात आवड आहे ते निवडणे आवश्यक असते. जेणेकरून आपण आपल्या कामाला न्याय देऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करत क्षेत्र निवडणे आवश्यक असते. तुम्हाला काही वेगळे करायचे असले तर नक्की मेट्रोचालक म्हणून काम करण्याची संधी महिलांना आहे. हे क्षेत्र पुढे व्यापक होत जाणार आहे. त्यामुळे ज्यांना काही वेगळे करायचे असेल त्यांनी या क्षेत्रात नक्की यावे. केवळ मेट्रोचालक म्हणून नव्हे तर येथे स्थानक व्यवस्थापकापासून अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी आहेत. या संधीचा लाभ घेत मोठय़ा संख्येने महिलांनी यात यावे.
मुलाखत मंगल हनवते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro driver new areas opportunity weekly interview metro gudipadva dahisar aarey inaugurated amy
Show comments