ठाणे : देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना पुन्हा संधी मिळाली तर, सर्वांचा मतदानाचा अधिकार संकटात येईल, असा दावा शरद पवार यांनी शुक्रवारी भिवंडीतील जाहीर सभेत बोलताना केला. देशाची घटना बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ४०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. .

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभा घेतली. भिवंडी येथील चाविंद्रा मैदानात ही सभा पार पडली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित होते. ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. या निवडणूकीत तुमचे-माझे भवितव्य काय आहे, याचा निर्णय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ४०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. कारण त्यांना घटना बदलायची आहे. त्यांचे खासदार, पदाधिकारी जाहीरपणे घटना बदलण्याबद्दल वक्तव्य करत आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार संकटात येईल. त्यादिवशी लोकांच्या अधिकाराचे अस्तित्त्व नष्ट होऊन या देशात मोदींच्या नेतृत्वाखाली हुकूमशाही सुरू झालेली दिसेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – रेल्वेगाडीत लैंगिक अत्याचार झाल्याचा मॉडेलचा आरोप, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा – कल्याणमधील गोविंद करसन चौकातील बस थांब्यामुळे वाहन कोंडी

माझी दोन राज्यांत सरकार आहे. परंतु त्यांच्याकडे ताकद, सत्ता आहे. दिल्लीत बदल घडविला म्हणून मला कारागृहात पाठवले. मोदींना गरीबांच्या मुलांनी शाळेत जावे, चांगले आरोग्य मिळावे असे वाटत नाही. मी ५०० शाळा बनविल्या म्हणून तुम्ही मला कारागृहात टाकले हा अतिशय छोटा विचार आहे. मी दिल्लीत सर्वांना औषधोपचार मोफत दिले. कारागृहात गेल्यानंतर माझ्यावरील औषधोपचार बंद करण्यात आला. मला मधुमेहाचा त्रास आहे. मला माहिती नाही त्यांना काय करायचे होते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. भाजप हा पक्ष विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना संपवित आहे. ४ जूनला भाजप निवडून आली तर, सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्यही कारागृहात जातील. त्यामुळे भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकू देऊ नका, असेही ते म्हणाले. शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणणे किती अयोग्य आहे. उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणतात. हा मराठी माणसाचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.