वक्ता दशसहस्त्रेषु

चांगला वक्ता दहा हजारांत एखादाच आढळतो, असे म्हणतात; परंतु त्याला अपवाद आहे महाराष्ट्राचा. या महाराष्ट्राने आजवर अनेक उत्तमोत्तम ओजस्वी वक्ते दिले. एक काळ असा होता की, राजकारण असो की कला वा वाङ्मय, समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक उत्तमोत्तम वक्ते सहज आढळत; पण कालौघात वक्तृत्वाची ही देदीप्यमान परंपरा नाममात्र उरल्यासारखी झाली आहे. त्याच तेजस्वी परंपरेचे, वक्तृत्वाच्या कलेचे पुनरुज्जीवन व्हावे या उद्देशाने ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात येत आहे पहिलीवहिली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा. नाथे ग्रुपची प्रस्तुती असलेल्या या विशेष स्पर्धेतून निवडला जाणार आहे महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’!
ही स्पर्धा आहे राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी. येत्या १६ जानेवारीपासून मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर ती घेण्यात येणार असून या केंद्रांतून प्रत्येकी दोन विभागीय विजेते निवडले जाणार आहे. नंतर मुंबईत १५ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेची महाअंतिम फेरी होईल आणि त्यातील विजेता ठरेल महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्रेषु’!