वसई- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातून १०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवून वसुली केली जात आहे. त्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून २० कोटी देण्यास सांगितले जात आहे, असा खळबळजनक आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर हल्लाबोल केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पालघर मतदारसंघातील भाजप उमेदवाराची जबाबदारी आहे. यासाठी ते जिल्ह्यातून १०० कोटी रुपये वसूल करत आहेत. प्रत्येक विभागातील अधिकार्‍यांना बोलावून ते २० कोटी देण्यास सांगत आहेत. याची माहिती खुद्द एका अधिकार्‍याने दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले. महामार्गावरील सन या हॉटेलमध्ये चव्हाण यांचा मुक्काम असून तेथील मागील १५ दिवसांचे सीसीटीव्ही चेक करा, असेही ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा – मिरा भाईंदरला गणेशोत्सवापूर्वी ४० दश लक्ष लीटर पाणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रचारसभेत आश्वासन

अधिकार्‍यांना फक्त ठेकेदारांकडून पैसा गोळा करण्यास सांगितले आहे. यासाठी जिल्ह्याच्या विकासाची कामे बाजूला ठेवाअसे ही सांगितल्याने जलजीवन मिशनसारख्या योजनांचा बोजवारा उडाल्याचे ठाकूरांनी सांगितले. या निवडणुकीत भाजपचे लोक अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. बहुजन विकास आघाडीला बदनाम करण्यासाठी वसईकरांचे पाणी बंद केले असून वीज घालवली जात आहे, असेही ते म्हणाले.

औकात असेल तर शिस्तीत लढा- फडणवीसांना ठाकूरांनी ठणकावले

डहाणूतील सभेत भाजप नेते देंवेद्र फडणवीस यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना आम्हाला संपवणं म्हणजे काय गाजर मुळी आहे का? बापाचं राज्य आहे का? असा सवाल केला. औकात असेल तर शिस्तीत लढा, असेही त्यांनी ठणकावले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठाकूरांची तुलना बेडकाशी केली होती. त्यावर शेलक्या भाषेत टीका करताना बेडकासारखं कोण दिसतं? देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बदद्ल एवढं वाईट बोलू नये असा खोचक टोमणा मारला. माझ्याकडे राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जे भाजप नेते लाचारासारखे येऊन बसले होते तेच आता मला निपटवून टाकण्याची भाषा करत आहेत, अशा शब्दात भाजप नेत्यांची खिल्ली उडवली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वसईच्या सभेत वसई विरारला ४०० दशलक्ष लिटर पाणी दिल्याची थाप मारली. कुठे पाणी आहे दाखवा असे सागून भाजप नेते थापा मारून जनतेची फसवणूक करत असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा – “पंतप्रधान हा देशाचा, मोदींनी भाजपाचा प्रचार करू नये”, उद्धव ठाकरे यांचा मोदी आणि शाहांवर घणाघात

मी मर्द आहे, मर्दासारखा लढतो

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा देखील त्यांनी समचार घेतला. मी मर्दासारखा लढतो. कुणावर हुकूमशाही केली नाही असे सांगितले. तर वाढवण बंदराला १६ हजार कोटी येणार असे ठाकरे यांचे मंत्री सुभाष देसाई सांगत होते. तुम्ही मुख्यमंत्री असताना वाढवण बंदर का रद्द केले नाही, असा सवाल ठाकरेंना केला. वाढवण बंदराला सुरवातीपासून आम्ही कसा विरोध केला याचाही पुनरुच्चार ठाकूर यांनी केला.