वसई– वसई विरार मधील नागरिकांना यापुढे विविध दाखले तसेच परवाने घेण्यास पालिकेत जाण्याची गरज पडणार नाही. पालिकेने एकूण ५१ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी सेवा हमी कायदा (राईट टू सर्व्हिस) संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या विविध सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करून विहित दिवसात घरबसल्या दाखले, प्रमाणपत्र आणि परवान्या मिळणार आहे. याशिवाय आपल्या अर्जाची स्थिती काय आहे त्याचा देखील मागोवा (ट्रॅक) ठेवता येणार आहे.

महापालिकेतर्फे नागरिकांना विविध सेवा दिल्या जातात. विविध कामांसाठी पालिकेच्या विभागातून परवानग्या घ्याव्या लागतात. त्यात नळजोडणी, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, व्यवसाय परवाना, अग्निशमन परवाने, मालमत्ता विभागातील विविध दाखले आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र ते घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या विभागीय कार्यालयात जावे लागत होते. यासाठी नागरिकांचा वेळ जायचा. याशिवाय अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाला आहे की नाही किंवा त्याची स्थिती काय आहे ते समजत नव्हते. यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ सेवा हमी कायदा अंतर्गत वसई विरार क्षेत्रातील नागरिकांसाठी एकूण ५१ सेवा अधिसूचित केलेल्या आहेत.

हेही वाचा >>>नालासोपाऱ्यात भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू; ४ मजूर गंभीर जखमी

असे मिळवता येतील दाखले आणि परवाने

 या सर्व सेवा https://rtsvvmc.in/vvcmcrts/ या प्रणालीवर भेट देऊन घेता येतील, यासाठी स्वतःचा स्वतंत्र लॉगीन आयडी तयार करून ५१ सेवांपैकी हव्या असलेल्या सेवेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा.  नागरिकांना या अर्जांचे शुल्क भरण्याी सोय (पेमेंट गेटवे) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर नोंदणी क्रमांक (युनिक नंबर ) व पावती, त्वरित प्राप्त होईल त्या द्वारे नागरिक आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकतात. नागरिकांना सदर सेवेचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणार आहे. ही आरटीएस प्रणाली ‘आपले सरकार पोर्टल’ सोबत जोडण्यात आले असल्याने तेथूनही नागरिक अर्ज करू शकतात. या प्रणालीद्वारे नागरिक सहजरित्या आपल्या अर्जाचा पाठपुरावा(ट्रॅक) घेऊ शकतात. तरी सदर सेवांचे प्रमाणपत्र नागरीकांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे जेणेकरुन नागरीकांना महापालिकेमध्ये वारंवार फेऱ्या घालाव्या लागणार नाहीत, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान विभाग) समीर भूमकर यांनी दिली.

पालिकेने ऑनलाईन सुरू केलेल्या प्रमुख विविध सेवा

जन्म प्रमाणपत्र देणे, मृत्यू प्रमाणपत्र जारी करणे (३ दिवस)

विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे (३६ कामकाजाचे दिवस)

नवीन नळजोडणी (१५ दिवस)

मालकी हक्कात बदल करणे (७ दिवस)

नळजोडणी आकारामध्ये बदल करणे (१५ दिवस)

तात्पुरते / कायम स्वरुपी नळ जोडणी खंडीत करणे (७ दिवस)

पाणी पाणी देयक तयार करणे ३ दिवस)

प्लंबर परवाना (१५ दिवस)

थकबाकी नसल्याचा दाखला (१५ दिवस)

नव्याने मालमत्ता कर नोंदणी

कर माफी मागणे

मालमत्ता हस्तांतरण नोंदणी प्रमाणपत्र / इतर कन्व्हेयन्सचे अनुदान (१५ दिवस)

वारसा हक्क नोंदणी (१५ दिवस)

अग्निशमन ना-हरकत दाखला देणे (७ दिवस)

पंडाल साठी N.O. सी (७ दिवस)

व्यापर / व्यवसाय साठा करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र (७ दिवस)

रस्ता खोदाई परवानगी देणे

नवीन परवाना व नुतनीकरण (३० दिवस)