लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : भूमाफियांसोबत पब मध्ये केलेली पार्टी आणि तरुणींसोबत केलेले नृत्य पालिकेच्या दोन अभियंतांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. पालिकेची प्रतिमा मलिन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. भीम रेड्डी आणि मिलिंद शिरसाट अशी हकालपट्टी केलेल्या या दोन अभियंत्यांची नावे आहेत.

वसई विरार महापालिकेच्या पेल्हार कप्रभागातील ठेका अभियंता भीम रेड्डी तसेच चंदनसार प्रभागातील ठेका अभियंता मिलिंद शिरसाठ या दोन अभियंत्यांची एक चित्रफित सध्या वायरल झाली होती. वसई विरार शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांसोबत हे दोघं एका पब मध्ये पार्टी करताना दिसत होते. त्यांच्यासोबत काही तरुणी नृत्य करीत होत्या. ही चित्रफित व्हायरल होताच खळबळ उडाली होती. त्याची गंभीर दखल महापालिकेने घेतली आणि या दोघांची पालिकेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागात हे दोघे अभियंता काम करत होते. तरी देखील अतिक्रमण करणाऱ्या भुमाफियांसोबत पार्टी करणे अत्यंत गंभीर आहे. सार्वजनिक ठिकाणी नृत्य करून त्यांनी पालिकेची प्रतिमा मदत केली आहे त्यामुळे या दोघांची हकालपट्टी केली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. कर्तव्यात कुणीही कसूर केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

आणखी वाचा-वसई विरारच्या विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू , २० वर्षांचे नियोजन, नव्याने आरक्षणे टाकणार

ही चित्रफीत ८ महिने जुनी आहे. एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या चित्रफितीच्या आधारे या दोघांना ब्लॅकमेल करत होते. या दोन अभियंत्यांनी त्यांना लाखो रुपये दिल्याचीही चर्चा आहे. २०१७ मध्ये देखील एका खासगी पार्टीत नृत्य करणाऱ्या १२ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party in pub with the land mafia expulsion of 2 engineers of vasai virar municipality mrj