पाणबुडीत उतरल्यानंतर आपल्याला वाटते की, बाजूला असलेल्या काचांमधून समुद्रतळ दिसेल. पण अशी कोणतीही खिडकी पाणबुडय़ांना नसते. सबमरिनर्ससाठी येथील सर्वात मोठी मोकळी जागा ही साधारणपणे १० बाय १० फूट आकाराची असते. म्हणजे एका लहानशा झोपडीएवढी. युद्धनौकांमध्ये डेकवर येऊन मोकळा श्वास घेण्याची सोय तरी असते. इथे मात्र तसे काहीच करता येत नाही. बाहेरच्या जगाशी संपर्कच नसतो. म्हणूनच येथील जीवन असते अतिशय खडतर आणि जिकिरीचे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्फोट झाला त्याच वेळेस त्यांनी बाहेर पडायला हवे होते, म्हणजे जळून राख होण्याची ही वेळ त्यांच्यावर आली नसती’ किंवा मग ‘स्फोट झाल्यानंतरच्या पहिल्या काही क्षणांमध्येच सुटकेचा प्रयत्न त्यांनी केला असता तर..’  ‘पाणबुडीवर काम करणाऱ्यांना म्हणे अधिक पैसे मिळतात. मग काम नीट का नाही करत, केवढी भीषण घटना आहे ही..’ अशा प्रकारची विधाने गेल्या तीन दिवसांमध्ये अनेकांनी केली किंवा मग सोशल नेटवर्किंग साइटस्वर आपल्या कमेंटस् म्हणून तरी टाकली. ही विधाने पाणबुडीविषयीचे आपले अज्ञान प्रकट करणारी आहेत. ते टाळण्यासाठी आपल्याला आधी पाणबुडी नेमकी असते तरी कशी, हे समजून घेणे आवश्यक आहे.
पाणबुडीचा आकार एखाद्या दंडगोलाकार माशाप्रमाणे असतो. त्यातही साधारणपणे चौकोनी दिसणारा भाग हा त्यावर जोडल्याप्रमाणे वाटतो, त्याला शाफ्ट किंवा कोनिंग टॉवर असे म्हणतात. या शाफ्टच्या भागामध्येच पेरिस्कोप, संदेशवहनाचा अँटेना आणि रिफेक्टरीचे पाइप बाहेर डोकावताना दिसतात. यातील पेरिस्कोप हा दुर्बिणीप्रमाणे काम करतो. अनेकदा केवळ पाण्याखाली राहून पेरिस्कोप बाहेर पाण्यावर येईल, अशा पद्धतीनेही टेहळणी केली जाते. समुद्रामध्ये सोडलेल्या ध्वनीलहरी एखाद्या वस्तूवर आपटून परत येतात तेव्हा त्या वस्तूचे चित्रण संगणकाच्या पडद्यावर उमटते. हे पाणबुडीसाठी सर्वात महत्त्वाचे असते. सोनार यंत्रणेमार्फत हे काम केले जाते. त्यावर पाणबुडीचे दिशादर्शन आणि कारवाया ठरतात.
टय़ूबसारख्या आकाराच्या या पाणबुडीत शिरण्यासाठी शाफ्टच्या एका बाजूस किंवा काही पाणबुडय़ांच्या बाबतीत दोन बाजूस गोल दरवाजे असतात. ते उघडून खाली जाणाऱ्या शिडीमधून उतरावे लागते. त्यावेळेस तुम्ही आत पोहोचता. आत पोहोचल्यानंतर मात्र सामान्य माणसाची पूर्ण निराशा होते आणि इथे असलेल्या कठोर जीवनाची कल्पना आपल्याला येते. खाली उतरल्यानंतर आपल्याला वाटते की, बाजूला असलेल्या काचांमधून समुद्रतळ दिसेल. पण अशी कोणतीही खिडकी नौदलाच्या कोणत्याही पाणबुडय़ांना नसते. ती केवळ चित्रपटातील पाणबुडय़ांमध्ये किंवा पर्यटकांना सागर तळ दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणबुडय़ांमध्येच दिसते. इथे नौदलाच्या पाणबुडय़ांमध्ये तुमच्या आजूबाजूला शेकडो वायर्स आणि विविध प्रकारच्या तेवढय़ाच संख्येने असलेल्या पाइप्सचे जंजाळ असते. शिवाय विविध प्रकारची शेकडो बटन्स बाजूला असतात. हे सारे पाहून सामान्य माणूस हैराणच होतो.
पाणबुडीमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करताना लक्षात येते की, त्या टय़ुबच्या आकाराच्या पाणबुडीत बरोबर त्या पाइप्स आणि इतर यंत्रणांच्या मधून जाणारा एक चिंचोळा मार्ग असतो. त्याच मार्गाचा वापर आपल्याला करावा लागतो. या मार्गावर एकाच वेळेस एक किंवा फार तर दोन जण मागे- पुढे जाऊ शकतात. तीन म्हणजे तर गर्दीच. पाणबुडीच्या त्या दरवाजामधूनही एका वेळेस एकच जण उतरू किंवा चढू शकतो. ही रचना माहीत नसताना सोशल नेटवर्किंग साइटस्वर आपण आपले अज्ञान पाजळत असतो.. एकाच वेळेस धावत बाहेर का नाही आले?
मागच्या बाजूस तर केवळ लहान- मोठी यंत्रे असतात. आतमध्ये अनेकदा डिझेलचा वास इंजिन रूममध्ये भरून राहिलेला असतो. फार काळ तिथे उभे राहणे आपल्यासाठी अशक्यच असते. हल्ली नवीन पाणबुडय़ांमध्ये समोरच्या बाजूस खालती बॅटरीज म्हणजे ज्या आधारावर ही पाणबुडी चालते त्यांची सोय असते. आणि त्याच्या बरोबर वरच्या बाजूस पाणतीर किंवा क्षेपणास्त्र बसविलेली असतात. सिंधुरक्षकचे डिझाइन अशाच प्रकारचे होते.
एकूणच अतिशय चिंचोळ्या अशा जागेत सबमरिनर्सना काम करावे लागते. त्यांच्यासाठी पाणबुडीमधील सर्वात मोठी मोकळी जागा ही साधारणपणे १० बाय १० फूट आकाराची असते. म्हणजे एका लहानशा झोपडीएवढी. त्याच जागेचा वापर त्यांना बहुपयोगी पद्धतीने करावा लागतो. म्हणजे कारवायांच्या वेळेस तिथे कंट्रोल रूममधील महत्त्वाचे टेबल असते. आणि एरवी शांततेच्या काळात त्याच टेबलवर एकत्र जेवण केले जाते. एरवी एकत्र बसण्यासाठी दुसरी कोणतीही जागा पाणबुडीत उपलब्ध नसते. पाणबुडीतील हे जीवन म्हणूनच अतिशय खडतर आणि जिकिरीचे असते. या पाणबुडीत सलग काही महिने काढणे हे तर फारच कमी जणांना जमू शकेल, असेच असते. म्हणून सबमरिनर्सची निवड अतिशय काटेकोरपणे केली जाते, त्यासाठी शारीरिक आणि मानसिक अशी पराकोटीची परिमाणे लावली जातात.
पाणबुडीमध्ये काम करण्यासाठीचा पर्याय स्वत:ला स्वीकारावा लागतो. त्यानंतर मानसिक आणि शारीरिक अशा कडव्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. त्यातून पार गेल्यानंतर प्रत्यक्षात काही दिवस पाणबुडीत काढावे लागतात. युद्धनौकांवर कंटाळा आला तर बाहेर डेकवर येऊन मोकळा श्वास घेण्याची सोय असते. तशी इथे कोणतीही सोय नसते. बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो. संपर्क असतो तो केवळ नौदल यंत्रणेशी. म्हणूनच पाणबुडीचा पर्याय स्वीकारून नंतर त्यातून माघार घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. पण हे जिकिरीचे जीवन जे देशसेवेसाठी स्वीकारतात त्यांना एरवीपेक्षा थोडा अधिक मोबदला दिला जातो, जो अशा प्रकारच्या सेवेसाठी आवश्यक असतो. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साइट्सवर किंवा प्रत्यक्ष समाजात चर्चेदरम्यान व्यक्त होताना जीभ टाळ्याला लावण्यापूर्वी हे सारे समजून घ्या आणि नंतरच व्यक्त व्हा!
                 

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How the submarine is