किशोरी आमोणकर१९३२-२०१७

delhi temperature
यूपीएससी सूत्र : रुद्रम-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अन् भारतातील उष्णतेची लाट; वाचा सविस्तर…
comics is Pictorial visual and cultural spaces
चित्रसंस्कार, दृश्यश्रीमंती आणि सांस्कृतिक अवकाश
kiran mane shared Janhvi Kapoor video
“बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये ‘गांधी-आंबेडकर’ यांच्याविषयी बोलताना कुत्सित…”, जान्हवी कपूरचा व्हिडीओ शेअर करत किरण मानेंचं वक्तव्य
Permanent Heat Waves in Indian Ocean, Threatening Marine Ecosystems, Marine Ecosystems, Coastal Communities,
हिंदी महासागराबाबत शास्त्रज्ञांचे नवे संशोधन… काय आहे इशारा?
Suchitra Pillai on being called boyfriend snatcher
“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”
Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
Thipkyanchi Rangoli fame actress Dnyanada Ramtirthkar surprise to fans shared her upcoming movie poster
Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दिलं चाहत्यांना सरप्राइज, काय ते? पाहा…
Loksatta kutuhal Geoffrey Hinton a pioneer of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते जेफ्री हिंटन

संगीतात घराणं असं काही नसतं. असतं ते निव्वळ संगीत. वेगवेगळ्या घराण्यांत त्याची विभागणी करणं म्हणजे संगीताची जणू जातींत विभागणी करण्यासारखंच आहे..हे किशोरीताईंनी सखोल विचारानंतर तयार केलेलं मत.

‘रेल्वेतील तिसऱ्या वर्गाचा डब्यातून आम्ही प्रवास करतोय. मी  आईच्या म्हणजेच माईच्या खांद्यावर डोकं ठेवून डुलक्या काढतेय. असा प्रवास करून कुठल्यातरी गावात आम्ही पोहोचतो. तिकडे माईच्या गाण्याचा कार्यक्रम आहे. आमच्या राहण्याची व्यवस्था चांगल्याशा हॉटेलात वा गेस्टहाऊसध्ये नाही, तर अशीच कुणाच्या तरी घरी केलेली. माईच्या गाण्याचा प्रश्नच नाही; पण आयोजकांकडून तिला फारशी चांगली वागणूक मिळत नाही. कार्यक्रमाचं मानधन मिळतं तेही तुटपुंजं. मला खूप खूप वाईट वाटतं. पण करणार काय. माईला पोटच्या तीन पोरांना सांभाळायचंय.. वाढवायचंय..’

‘पण मी तेव्हाच मनाशी पक्की खूणगाठ बांधली. मी उद्या गायिका झाल्यानंतर स्वतचा मानमरातब यथास्थित राहील, याची काळजी घेईन. कार्यक्रमासाठी कुठे गेले तर उत्तम हॉटेलातच वास्तव्य करेन. आणि मुख्य म्हणजे कार्यक्रमाचं मानधन चांगलंच घेईन. आमच्या माईला ज्या तडजोडी कराव्या लागल्या त्या मी कदापि करणार नाही.’

‘..आणि तशा तडजोडी मी कधीही केल्या नाहीत..’ इति किशोरी आमोणकर.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात लखलखीत कामगिरी करणाऱ्या, इतकंच नव्हे तर आपल्या गाण्याने या संगीतक्षेत्राचा विस्तार करणाऱ्या किशोरीताईंची ही लहानपणीची आठवण. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ती सांगितलेली. किशोरीताईंच्या स्वभावातील ज्या तालेवारपणाचा अनेकदा उल्लेख व्हायचा त्याची मुळे त्यांच्या त्या लहानपणीच्या दिवसांत असतील का? असतीलही कदाचित. पण हा तालेवारपणा शोभूनच दिसला त्यांना. याचं स्वच्छ कारण म्हणजे त्यांचं तेवढंच तालेवार, अरभाट गाणं.

अवघा रंग एक झाला.. शामसुंदर राजसा.. म्हारो प्रणाम.. उड जा रे कागा.. पडले दूर देशी.. घट घट मे पंछी बोलता.. अवघा तो शकुन.. आणि अर्थातच सहेला रे..

या यादीला पूर्णविरामच नाही.

पूर्णविराम नसलेल्या किशोरी आमोणकरांच्या या गाण्याची सुरुवात कधी झाली?

किशोरीताईंचा जन्म १० एप्रिल १९३२ रोजीचा. मुंबईतला. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच त्या गाऊ लागल्या. पहिला गुरू घरचाच. आई मोगुबाई कुर्डीकर. मोगुबाई स्वत जयपूर घराण्याच्या अतिशय पट्टीच्या गायिका आणि गुरू म्हणून कडक शिस्तीच्या. मात्र शास्त्रीय संगीतातील घराण्यांचे, त्यांच्यातील वैविध्याचे त्यांचे भान खूपच सखोल. आणि गाण्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्ण खुली. त्यामुळेच जयपूर घराण्याच्या घरच्याच शिक्षणासोबतच अंजलीबाई मालपेकर (भेंडीबाजार घराणं), अन्वर हुसेन खाँ (आग्रा घराणं), बाळकृष्णबुवा पर्वतकर, शरदचंद्र अरोलकर (ग्वाल्हेर घराणं) अशा वेगवेगळ्या घराण्यांतील गुरूंकडून किशोरीताईंना संगीताचे धडे घेता आले. ‘गुरू तुम्हाला बळ देतो.. पण चालायचं, धावायचं तर तुम्हालाच असतं..’ ही किशोरीताईंची गुरूंबाबतची मनोधारणा.

‘संगीतात घराणं असं काही नसतं. असतं ते निव्वळ संगीत. वेगवेगळ्या घराण्यांत त्याची विभागणी करणं म्हणजे संगीताची जणू जातींत विभागणी करण्यासारखंच आहे..’ हे किशोरीताईंनी सखोल विचारानंतर तयार केलेलं मत. घराण्यांच्या विविध वाटांवर शिकण्याचा प्रवास झाल्यानंतरचा त्यांचा हा निष्कर्ष म्हणजे संगीताच्या गाभ्याविषयी.. अवघा रंग एक झाला.. अशीच काहीशी झालेली जाणीव. आणि त्या जणिवेला अनुसरूनच राहिलेला त्यांचा सांगीतिक प्रवास.

ही जाणीव त्यांच्या गाण्यांतून ठळकपणे प्रतीत व्हायचीच. कारण मुळात राग, शास्त्रीय रागांचं नियमबद्ध व्याकरण यांपेक्षा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता तो गाण्यातून जाणवणारा भाव.. रस. ‘आमच्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला मी, काय रे बाबा तुला अमका राग माहिती आहे का, असं नाही विचारणार. माझा प्रश्न असेल तो तुला माझं गाणं आवडतं का, असा. मला जर संगीताच्या माध्यमातून भाव पोहोचवायचे असतील तर या माध्यमाची नीटच जाण मला हवी. श्रुतींचं चलन कसं होतं, मिंड कशी हवी, सुरांतून व्यक्त कसं व्हायला हवं हे मला समजायला हवं..’ हे त्यांचं सांगणं. त्यांच्या रससिद्धांताला अनुसरून जाणारं.

किशोरीताईंची शास्त्रीय संगीत कारकीर्द बहराला लागली ती सन १९६०च्या आसपास. म्हणजे वयाच्या तिशीदरम्यान. हा बहर अगदी आत्ताआत्तापर्यंत सुरू होता. या प्रवासात एक महत्त्वाचं वळण आलं ते किशोरीताई वयाच्या पंचविशीत असताना. त्यांचा गाण्याचा आवाजच लुप्त झाला. सुमारे दोन र्वष त्या गाऊच शकत नव्हत्या. आयुर्वेदिक उपचारांमुळे त्यांना त्यांचा गाता आवाज पुन्हा लाभला. आणि या स्वल्पविरामानंतर त्यांच्या गाण्यानं महत्त्वाचं वळण घेतलं. हा स्वल्पविराम त्यांना संगीतावरील चिंतनासाठी खूप उपयुक्त ठरला. संगीताचा, रागांचा, श्रुतींचा, रससिद्धांताचा सखोल विचार त्यांनी या काळात केला. दोन वर्षांच्या स्वल्पविरामानंतर त्या जेव्हा पुन्हा गाऊ लागल्या तेव्हा तो सारा विचार त्या गाण्यातून प्रकट झाला. जटिल व काहीशा कर्मठ अशा रागनियमांतून त्यांचं गाणं अलवारपणे मुक्त झालं. नियमांना अपमानास्पद धुडकावणं तर नाही, मात्र भावपरिपोष अधिक मोलाचा मानून त्या गाऊ लागल्या. त्यातून त्यांचं गाणं अधिक विस्तारलं.. विकसित झालं. जे संगीतप्रेमींना खूप काही देत राहिलं.

शुद्ध शास्त्रीय रागदारी, ठुमरी, मराठी अभंग, भावगीतं, हिंदी अभंग, निर्गुणी भजनं असं बरंच काही किशोरीताईंचं संचित. चित्रपटांसाठी संगीत देण्याचा प्रयत्नही केला त्यांनी. पण त्या धबडग्याच्या आणि जेथे सुरांपेक्षा इतरच हिशेब अधिक होतात अशा त्या क्षेत्रात त्या फार रमणं अशक्यच होतं आणि तसंच झालं.

किशोरीताईंच्या गाण्यासोबतच त्यांच्या स्वभावाचीही चर्चा व्हायची नेहमी. किस्से ऐकविले जायचे. समोरच्या प्रेक्षकांचं वर्तन आवडलं नाही म्हणून, आणि त्या प्रेक्षकांत फारुख अब्दुल्लांसारखा बडा माणूस असताना त्यांनी कसा गायलाच नकार दिला.. ध्वनिक्षेपकरचना योग्य नाही म्हणून त्या कशा संतापल्या.. एका बडय़ा उद्योजकाच्या पत्नीने मैफलीदरम्यान उठवळपणे विडा देऊ केल्यानंतर, ‘मी तुम्हाला कोठेवाली वाटले का’, असं त्यांनी कसं फटकारलं, गाण्याआधी ग्रीनरूममध्ये त्या कुणालाच कशा येऊ देत नाहीत.. वगैरे. त्यावर त्यांची भूमिका ठाम आणि कलावंत आपल्या कलेकडे कशा रीतीने बघू शकतो, याची जाणीव करून देणारी..

‘गाणं गाताना मला अमूर्ताशी संवाद साधायचा असतो. त्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. त्यात मला समोरच्या प्रेक्षकांची मदत अपेक्षित असते.. त्यांच्याकडून होणारा अडथळा नव्हे. आणि संगीत म्हणजे काय सवंग मनोरंजन वाटलं का? गाण्यासाठी कमालीची एकतनता लागते.. एक प्रकारची तंद्रावस्था लागते. म्हणूनच मला या असल्या गोष्टी आवडत नाहीत. जिथल्या तिथं त्यांना फटकारते मी..’

किशोरीताईंसाठी गाणं, संगीत, स्वर म्हणजे द्वैत नव्हतंच.. अद्वैत होतं. संगीताप्रती पराकोटीचे विनम्र भाव बाळगून हे अद्वैत साधायचा त्या सतत सायास करीत असत. उच्च कोटीचा आध्यात्मिक अनुभव देणारा असा तो क्षण. त्यांची सारी असोशी होती ती त्याचसाठी.

ती असोशी आता निमाली. ज्या स्वराशी अद्वैत साधायचं त्या स्वराच्याही पल्याड असलेल्या शाश्वत स्वरात त्या विलीन झाल्या.. आपले अलौकिक स्वर मागे ठेवून!

amonkar

 

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर या माझ्या गुरु. या नात्याने गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या माझ्या गुरुभगिनी. पण, मी त्यांच्याकडूनही बरेच काही शिकले असल्याने किशोरीताईंना मी गुरुस्थानीच मानते. त्यांची स्वरांवरील भक्ती मी पाहिली आहे. रियाझ करताना त्या अडीच-तीन तास झाले तरी गंधार-पंचमापर्यंतच असायच्या. त्यांचे स्वरांवरील प्रभुत्व अफाट होते. प्रत्येक स्वराचे प्रकटीकरण करण्याची ताईंची एक खास शैली होती आणि त्या प्रकटीकरणातून प्रत्येक वेळी वेगळे काही सांगितले जायचे, इतका त्यांचा स्वरांचा सूक्ष्म अभ्यास होता. गाण्यामध्ये स्वराला धक्का न लावता दुसऱ्या स्वरापर्यंत कसे जायचे हे शिकायचे तर किशोरीताईंकडूनच शिकले पाहिजे. धक्का कोठे वापरायचा हे त्यांना नेमकेपणाने ठावूक होते. त्यामुळे त्या गाताना धक्का द्यायच्या तेव्हा तो खणखणीतच असायचा.

पद्मा तळवलकर (ज्येष्ठ गायिका)

किशोरीताईंची संगीताची स्वतंत्र शैली, सांगीतिक विचार आणि त्यांचे अफाट कर्तृत्व या विषयी रसिक सदैव कृतज्ञ राहतील. माझे बाबा पं. भीमसेन जोशी आणि किशोरीताई हे दोघेही राघवेंद्र स्वामींचे भक्त होते. राघवेंद्र स्वामी यांचे श्लोक किशोरीताई यांनी गायलेले आहेत. बाबा ते श्लोक नेहमी ऐकत असत. त्यामुळे लहानपणापासूनच किशोरीताईंचे स्वर कानावर पडत होते. आर्य संगीत प्रसारक मंडळाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘संवेदना’ हा शास्त्रीय संगीताचा महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा त्या महोत्सवात किशोरीताई यांचे गायन झाले होते. त्या वेळी त्यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला होता. बाबा गेल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईला आयोजित स्वरांजलीमध्ये मी गायलो होतो. साधना करून सिद्ध झालेले आणि कलात्मक वेगळेपण सतत दाखविणारे किशोरीताई यांचे व्यक्तिमत्त्व दुर्मीळच.

श्रीनिवास जोशी, प्रसिद्ध गायक

मी गाणे शिकलो ते पं. जसराज, जे माझे प्रत्यक्ष गुरु आहेत. पण, ज्यांच्याकडून विद्या शिकलो नसलो तरी किशोरीताई मला गुरुस्थानी होत्या. अत्युच्च प्रतिभावंत कलावंतांमध्ये त्यांचे गाणे बौद्धिक आणि भावनिकदृष्टय़ा प्रेरणादायी होते. त्यांच्या रागांमधील कल्पनाविलासाची श्रेणी अमर्याद होती. जबरदस्त गळा, तयारी आणि भावनेने ओथंबललेले त्यांचे गाणे लोभस असेच असायचे. सामान्य रसिकांप्रमाणेच जाणकार आणि कलेची साधना करणाऱ्यांसाठी ते ऐकतच रहावे असे होते. व्यक्ती गेली तरी त्याने केलेले काम कधीही संपत नाही हे सत्य असल्याने किशोरीताईंचे सूर कायमच रसिकांसमवेत असतील.

संजीव अभ्यंकर, प्रसिद्ध गायक

किशोरीताईंचे गाणे ऐकताना आपण दैवी अनुभव घेत आहोत असे वाटते. ते गाणे मनाला स्पर्श करून जायचे. अनेक वर्षे स्मरणात राहते. अशा व्यक्ती जातात तेव्हा संगीत क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी होत असते, हे रसिकांना जाणवते तसेच ते गायक कलाकारांनाही जाणवत राहते. एखादा राग कसा फुलविला जातो याचे किशोरीताई या आदर्श होत्या.

आनंद भाटे, प्रसिद्ध गायक

ताईंसोबतच्या अनेक आठवणी आहेत. सगळ्याच आठवणी आज डोळ्यासमोर तरळत आहेत. ताईंसोबत अनेक सांगितिक गप्पा झाल्या. मीच गेल्या साठ वर्षांपासून या क्षेत्रात असल्याने ताईंचा अनेक वर्षांचा सहवास लाभला हे माझे भाग्यच आहे. त्या जेवढय़ा कठोर शिस्तीच्या होत्या तितक्याच त्या प्रेमळ स्वभावाच्याही होत्या. आज अनेक स्त्री-गायिका ताईंसारखं गाण्याचा प्रयत्न करतात. हीच खरी त्यांच्या कामाची पावती असून त्यांच्यासारखे गायन आता इथून पुढे ऐकायला मिळणार नाही. ताई या शास्त्रीय संगीतातील एक विद्यापीठ होत्या आणि असे विद्यापीठ पुन्हा होणे नाही.

पं. अजय पोहनकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायक

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे गाणे आपल्याला स्पर्श करतं तेव्हा ते स्वर न राहता संवेदना बनते. तेव्हा ती व्यक्ती आपली होऊन जाते त्यापैकी किशोरी ताई होत्या. चार-पाच वेळा त्यांच्या पाया पडण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले नाही. पण त्यांच्या गाण्यातून त्यांच्या संवदनेचा स्पर्श मला इथून पुढे कायम होत राहील. लाखो-करोडो चाहत्यांना एक मोठा कलाकार सोडून गेल्याने घरातीलच एखादी व्यक्ती गेल्याची भावना आज मनात येत आहे.

महेश काळे, शास्त्रीय गायक

गानसरस्वती किशोरीताई अमोणकर एक दिग्गज व्यक्तिमत्व होत्या. त्यांच्या घराण्यात पारंपरिक तालिम असतानाही त्यांनी आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. हे कशातून येते? मला वाटते की त्या स्वत:च्या सिध्दांतावर कायम ठाम राहिल्या. त्यांनी कधीही त्याच्याशी तडजोड केली नाही आणि त्यांची आंतर्शक्ती जी अध्यात्मिक आहे. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांतून त्यांनी एक वेगळी वाट निर्माण केली. तरूण पिढीलाही त्यांनी प्रभावित केले. त्यांची गाणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. पण त्यांची जी कला साधना, तपस्या, निष्ठा होती हे सगळे लक्षात ठेवण्यासारखे आहे कारण त्यातून जी एक स्वरानुभूती होते ती त्यांनी आपल्या सगळ्यांना प्रदान केली आणि ती कायम आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहिल. १९८६ मध्ये विलायत खाँ साहेब यांच्याबरोबर वाजवण्यासाठी किशोरीताईंनी मला आमंत्रित केले होते. मी वर्तमानपत्रातून वाचले होते की विलायत खाँ साहेब कार्यक्रम करतायेत. मी कधीच त्यांचा कार्यक्रम चुकवत नव्हतो. त्यावेळीही मी त्यांचा कार्यक्रम पहायचा निश्चित केले होते. त्याचवेळी किशोरीताईंनी फोन केला आणि सांगितले की विलायत खाँ साहेब कार्यक्रम करतायेत. मीही त्यांना म्हणालो, ‘हो मी जाणार आहे ऐकायला..’. त्यावर त्या लगेच म्हणाल्या, नाही ऐकण्यासाठी नाही. तर तुला तबला घेऊन यायचे आहे. खाँसाहेबांनी सांगितले तुला तबला वाजवण्यासाठी सांगितले आहे. ते ऐकल्यावर मी आश्चर्यचकित झालो. त्यानंतर खाँसाहेबांबरोबर अनेक कार्यक्रम के ले. मला स्वत:ला किशोरीताईंना साथसंगत करण्याची संधी कधीच मिळाली नाही, पण त्या खूप मोठय़ा कलाकार होत्या.

पंडित नयन घोष, तबला आणि सतारवादक

यमनाची इतकी सुंदर सुंदर रु पे त्यांनी निर्माण केली. किशोरीताई म्हणजे आमच्यासाठी, सर्व संगीत रसिकांसाठी त्या साक्षात सरस्वती होत्या. आजच्या मुलांना सरस्वती दाखवायची असेल तर त्या ताईच होत्या. संगीत त्या जगल्या. त्यांचा प्राण, त्यांचा ध्यास सगळे संगीत होते. अतिशय तळमळीने शिकवत असत आणि त्यांनी आमच्या सर्वावर खूप मायाही केली. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की मला त्यांच्यासारख्या गुरू लाभल्या.

आरती अंकलीकर-टिकेकर, शास्त्रीय गायिका.

किशोरीताई ज्यांच्याकडे बघावं, ज्यांचा सूर आत्मसात करावा अशी जी थोडीच लोकं आहेत. त्या निघून गेल्या खरोखर अगदी पोरके झाल्यासारखे वाटते. त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आमच्या संस्थेसाठी करायचा होता मात्र तो योग कधीच आला नाही. त्यांनी एकदा सूर लावला की ऐकणारे सगळे विसरून त्यांच्या सूरात रममाण होऊन जात. रसिकांना त्या गुंग करून टाकत असत. त्यांना सूर पोहोचलेला होता. आणि तो सूर मिळवण्यासाठी जे गायक सगळे धडपड करतात, रियाज करतात. ती सिध्दी प्रत्येकाला प्राप्त होतेच असे नाही. पण ज्यांना ती प्राप्त झाली आहे ते आम्हाला आधारभूत वाटतात. असे लोक सोडून चाललेत याचे भयंकर वाईट वाटते. हे असे कोणी निर्माण होणार नाही आता. हिमालयच गेला भारतातून तर कसे वाटेल ना तसेच झाले आहे आज..

पंडित चंद्रकांत लिमये, शास्त्रीय गायक.

स्वातंत्र्यानंतर नवनिर्मितीच्या काळाला सुरुवात झाली होती. त्यावेळी कला क्षेत्रात नवनवीन शोध सुरू होते. मी, किशोरी, रवी शंकर आणि वासुदेव गायतोंडे आम्ही सर्व कलाकार भुलाभाई मेमोरियल इन्स्टिटय़ूट येथे वाढलो. तेथे खऱ्या अर्थाने आमचा कला क्षेत्रामधून मैत्री झाली. मी त्यावेळी रंगायन चालवित होते. तेथे किशोरी आमोणकरांची खोली होती. मी त्यावेळी तेंडूलकरांचे मादी हे नाटक करीत होते. प्रेक्षकांनी ते नाटक उचलून धरले होते. एकदा किशोरी मी आणि गायतोंडे प्रयोग झाल्यानंतर गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी किशोरी म्हणाली की विजया तुमचं सगळं ठोस असतं. म्हणजे मादी हे नाटक करताना शब्दांच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचता. नाटकाची तालीम करीत असताना तुम्ही काय सादर करायचे हे ठरवून घेता. तुम्हाला मदत करणारी माणसे कायम आजूबाजूला असतात. मात्र माझ्या संगीतात तर सर्व अस्पष्टता असते. आम्हाला सादरीकरण करताना प्रेक्षकांना स्पष्टता द्यावी लागते. तेव्हा गायतोंडे म्हणाले की कॅनव्हासवर चित्र काढताना मी दिलेले फटकारे प्रेक्षकांना सांगावे लागत नाही. त्यातून विश्व निर्माण होतं. मात्र तेव्हापासून मी माझ्या सर्व नाटकात शब्दांच्या पलीकडे जाऊन त्याला दृश्य आणि श्राव्य बाजू कशी आणता येईल यासाठी पुष्कळ विचार केला आणि ते माझ्या कामात उमटले असे मला वाटते.

विजया मेहता