मितेश रतिश जोशी

खांद्याला बॅग लावायची आणि भटकंती करायची, इतकं साधं, सोपं आणि बजेटफ्रेंडली असलेलं बॅकपॅकिंगचं विश्व प्रत्येक फिरस्तीला खुणावत असतं.

कामापासून वैवाहिक नात्यांपर्यंत कुठल्याही ताणातून बाहेर पडायचं तर नेहमीच्या वीकेंडचा एक्स्टेण्डेड वीकेण्ड करत कुठल्या तरी नवीन ठिकाणी भटकण्याची ओढ तरुण पिढीला जरा कणभर जास्तच आहे. सुट्टीच्या दिवशी घरात निवांत राहून आराम करणं हे त्यांच्या सवयीत बसत नाही. शिवाय, समाजमाध्यमांमुळे अवघं जग हातात एका क्लिकवर आलं असल्याने त्यांच्या भटकंतीच्या आवडीनिवडींना तर पंख फुटले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्रामवर येणाऱ्या भटकंतीच्या पोस्ट, बॉलीवूडच्या दर नव्या चित्रपटाबरोबर ओळखीची होत गेलेली परदेशी शहरं पाहिली की तरुणाईच्या भटकंतीच्या स्वप्नांना दिशा मिळते ती नव्या वाटांचे वाटसरू होण्याची, त्या नवीन वाटांवर नवीन सोबती शोधण्याची आणि जगण्याचा उत्स्फूर्त आनंद घेण्याची…

तरुणाईचं पर्यटन फारच तोलून मापून असतं. त्यामध्ये ‘केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार’ची खोली आणि समर्थ रामदास सांगतात त्याप्रमाणे ‘सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक’चा उत्साह- कुतूहल दडलेलं असतं. बॅकपॅकिंग करून डोळस आणि बिनधास्त भटकंती करायला सध्याच्या तरुणाईला प्रचंड आवडतं आहे. पर्यटन विश्वामधील बॅकपॅकिंग हा तसा पाहायला गेलं तर खूप जुना ट्रेण्ड आहे. बॅकपॅकिंग टूर करणाऱ्या फिरस्तींना बॅकपॅकर्स म्हटलं जातं. बॅकपॅकिंगने पर्यटन विश्वामध्ये प्रवेश कधी केला याविषयीची माहिती सांगताना भाडिपावर ट्रॅव्हल शो करणारा इंद्रजित मोरे म्हणतो, ‘बॅकपॅकिंगची सुरुवात युरोप या देशापासून झाली. हा फिरस्तीचा अत्यंत जुना ट्रेण्ड आहे. जर आपण इतिहास पाहिला तर सातव्या शतकामध्ये ह्युएन त्सांग या नावाने ओळखला जाणारा झुआनझांग हा चिनी बौद्ध भिक्खू प्रवासी होता. हा एक बॅकपॅकरच होता. जो चीनमधून वाराणसीत तक्षशिलेमध्ये ‘बौद्ध दर्शन’ शिकायला आला होता. त्याचं चित्र जर पाहिलं तर आपल्याला कळेल की त्याच्या पाठीवर भली मोठी बॅग होती. त्या बॅगेमध्ये प्रवासासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू आणि अभ्यासाची पुस्तकं होती. तोसुद्धा बॅकपॅकिंग करत आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठीच आला होता. यावरूनच लक्षात येतं की हा प्रवास ध्येयपूर्तीसाठी केला जातो’. काहींचं ध्येय शांतता अनुभवणं असू शकतं, तर काहींचं त्या प्रदेशाला भेट देऊन त्याची संस्कृती अनुभवणं असू शकतं. बॅकपॅकिंगमध्ये कोणत्याच गोष्टी प्लॅन नसतात. ‘जसं असेल तसं’ हे ब्रीदवाक्य घेऊन तुम्हाला फिरस्ती करावी लागते. एक देश किंवा प्रदेश निवडून तिथे हवे तितके दिवस, हवं तसं मनमुराद हिंडायचं हेच बॅकपॅकिंगचं उद्दिष्ट असतं, असंही तो सांगतो.

हेही वाचा >>> सफरनामा : कुटुंब निघालय टूरला…!

बॅकपॅकिंग या ट्रेण्डविषयी बोलताना नोमाडीक ट्राईब्स या ट्रॅव्हल कंपनीचा सर्वेसर्वा वैभव खैरे म्हणतो, ‘आपल्याकडे गेल्या काही पिढय़ांमध्ये भविष्यासाठी पैशांची साठवण करण्याची सवय होती, पण आता मात्र त्यामध्ये बदल झाला असून सतत भविष्याची चिंता करत राहण्यापेक्षा वर्तमानाचा मनमुराद आनंद लुटण्याकडे अनेकांचा कल वाढतो आहे. सर्वसाधारण ठिकाणांपेक्षा एखाद्या हटके ठिकाणची वाट धरण्याला बॅकपॅकर्स प्राधान्य देत आहेत. फिरस्तीच्या या नव्या ट्रेण्डविषयी अनेकांना कुतूहल आहे. बॅकपॅकिंग खिशाला परवडतं हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्याहीपेक्षा एखाद्या नवीन देशाला भेट दिल्यानंतर जो तजेला, उत्साह मनाला मिळतो त्या आनंदासाठी अनेक जण अनोळखी प्रदेशाच्या सफरीला बॅकपॅकिंगच्या माध्यमातून महत्त्व देऊ लागले आहेत’. शिवाय, एव्हिएशनमध्ये झालेली क्रांती, तंत्रज्ञानातील बदल याचा परिणाम पर्यटनाच्या संकल्पनांमध्येही आमूलाग्र बदल होण्यात झाला आहे, असं सांगतानाच थोडंथोडकं सामान घेऊन नेपाळ, भूतान, बाली, व्हिएतनामसारख्या देशांना भेट देत कोणत्याही शानशौकतीची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त नवं काही तरी पाहण्याचा, जाणून घेण्याचा उत्साहच आजच्या बॅकपॅकर्स पर्यटकांमध्ये पाहायला मिळत असल्याचं वैभवने स्पष्ट केलं.

बॅकपॅकिंग ट्रॅव्हल करण्यासाठी भारतामधील गोकर्ण, हंपी, गोवा, कोस्टल कर्नाटक, लडाख, मनाली, स्पिती व्हॅली, पुष्कर या प्रदेशांना पसंती दिली जाते. तसंच थायलंड, पेरू, व्हिएतनाम, स्पेन, कंबोडिया, तुर्की या देशांमध्येही बॅकपॅकिंग ट्रॅव्हल केलं जातं. हल्लीच्या बॅकपॅकर्समध्येही दोन गट पाहायला मिळतात. स्वत:च्याच देशात फिरून काही गोष्टी जाणून घेण्यास प्राधान्य देणारा एक गट आहे. तर दुसरा असा मोठा गट आहे, जो चौकटीबाहेरील देशांना भेट देऊन त्यांची संस्कृती आणि राहणीमान जवळून अनुभवण्याची इच्छा मनी बाळगून असतो. त्यामुळे कोणा एकाचं प्राधान्य आपल्याच देशातील लडाखला असेल तर त्याच ठिकाणी दुसरा कोणी दुबई आणि पॅरिसला जाण्याची स्वप्नं रंगवत असतो. विविध देशांमध्ये जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा, खर्च करण्यासाठीची तयारी आणि विशलिस्टवरचं एक एक ठिकाण हुडकण्याची तीव्र इच्छा आजच्या बॅकपॅकर्सला काही शांत बसू देत नाही. अर्थात, देशाबाहेरच्या भ्रमंतीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ‘बजेट’. आपल्या खिशाला जास्त चाप बसणार नाही, मुख्य म्हणजे पुढच्या काळातही आपल्याला फिरता यावं, नव्या ठिकाणांना भेट देता यावं, या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्या आवडत्या देशांना भेट देण्याची एक यादीच तयार केली जाते. आणि मग त्या यादीनुसार खर्चाचे, सुट्ट्यांचे नियोजन करत एकेक सफर पूर्ण केली जाते.

बॅकपॅकर्ससाठी आता बॅकपॅकिंग हॉस्टेलची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. याविषयी सांगताना यशवंत मोरे म्हणाला, भारतात निवासी हॉस्टेलची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वी १९४५ मध्ये शिमल्याजवळ तारादेवी येथे झाली. हे सर्वात पहिलं वसतिगृह म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया (YHAI) ची स्थापना करण्यात आली, ज्याचं पहिलं वसतिगृह १९७७ मध्ये राजधानी दिल्ली येथे सुरू करण्यात आलं. आता गेल्या काही वर्षांमध्ये बॅकपॅकिंग हॉस्टेलची संख्या झपाट्याने वाढते आहे. पॉकेटफ्रेण्डली ट्रॅव्हल, नवीन लोकांची भेट, ताजं जेवण, कॅफे, बाल्कनीमधून दिसणारी अप्रतिम नैसर्गिक दृश्यं यामुळे हॉस्टेलला तेजीचे दिवस आले आहेत. वर्क फ्रॉम डेस्टिनेशन या ट्रेण्डमुळेसुद्धा हॉस्टेल फुल्ल होत आहेत, असं त्याने सांगितलं.

सहसा अनोळखी व्यक्तींसोबत बोलतानाही नेहमी सावधगिरी बाळगली जाते, मात्र बॅकपॅकिंगमुळे अनेकांच्या स्वभावामध्ये ती सहजताही आलीये. नव्या प्रदेशात फिरताना अनेकांशी ओळख करण्याची संधी तर मिळतेच पण त्यासोबत काही भन्नाट अनुभव आणि भन्नाट व्यक्तींच्या आयुष्याचा आपणही एक भाग होऊन जातो. आपल्या आयुष्याच्या डायरीत एक नवं पान जोडलं जातं. तेही अनोळखी व्यक्तींकडून… भ्रमंतीचा हा नवा दृष्टिकोन आजच्या मुसाफिरांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून प्रकर्षाने जाणवतो.

viva@expressindia.com