डॉ. सौंदर्यवती!

डॉ. नम्रता जोशी मिसेस इंडिया अर्थ स्पर्धेत दुसऱ्या रनर अप ठरल्या आहेत.

‘मिस इंडिया’ या स्पर्धेबद्दल सर्वानाच माहिती असते. मात्र ‘मिसेस इंडिया’ या नावाचीही एक खूप मोठी सौंदर्य-व्यक्तिमत्त्वाचा कस घेणारी स्पर्धा होते हे अनेकदा आपल्या गावीही नसतं. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा जशी मोठी असते तसंच तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे नानाविध पैलू इथे जरा जास्तच जोखून घेतले जातात. त्यामुळे तुमच्या क्षेत्रातला तुमचा अनुभव, कलेची जाण, कला सादरीकरण, आत्मविश्वास, सामान्यज्ञान, समाजभान, राजकारण इत्यादी सर्व क्षेत्रातली माहिती असणं आणि त्यावर भाष्य करता येणं हे यात खूप महत्त्वाचं ठरतं. दरवर्षीप्रमाणे ‘मिसेस इंडिया अर्थ’ ही स्पर्धा या वर्षी घेण्यात आली असून व्यवसायाने नेत्रशल्यविशारद असलेल्या डॉ. नम्रता जोशी या स्पर्धेत दुसऱ्या रनर अप ठरल्या आहेत.

डॉ. नम्रता जोशी या मुंबईतील प्रख्यात नेत्रशल्यविशारद आहेत. तरुणपणापासूनच व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा खेळांमध्ये त्यांनी कौशल्य दाखवले आहे. व्हॉलीबॉलमध्ये राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या राज्याचे, मध्य प्रदेशचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटमध्येही त्यांनी त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या २५ वर्षांपासून ‘मेंडोलिन’ हे वाद्य त्या शिकत आहेत आणि त्यातही त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. त्याचबरोबर शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत अशा दोन्ही प्रकारांची त्यांना आवड आहे आणि हे दोन्ही प्रकार त्या शिकलेल्या आहेत. नृत्यातही त्यांना रस असून त्या एक उत्तम नर्तिका आहेत. आपले हे नृत्यकौशल्य त्यांनी ‘मिसेस इंडिया अर्थ’च्या ‘टॅलेंट राऊंड’मध्ये त्यांनी सिद्ध केलं आहे. या सर्वपरिचित क्षेत्रांसोबतच त्यांना पतंग उडवण्याची लहानपणापासून आवड आहे. जानेवारी २०१८ला अहमदाबाद येथे होणाऱ्या ‘इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल’मध्ये त्या सहभागी होणार आहेत.

‘मिसेस इंडिया अर्थ’ या स्पर्धेबद्दल बोलताना डॉ. नम्रता म्हणाल्या, ‘जगभरातील भारतीय विवाहित महिला या स्पर्धेसाठी अर्ज करतात. त्यासोबत आपला पूर्ण परिचय, शैक्षणिक-व्यावसायिक कारकिर्दीची माहितीही त्यांना द्यायची असते. त्यातून पहिल्या फेरीसाठी तुमची निवड होते. हजारो अर्जामधून आपला अर्ज निवडला जाणं हेच मुळात खूप कठीण असतं. ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेच्या निमित्ताने मी स्वत:मध्ये बरेच बदल केले. वेस्टर्न कपडय़ांची फारशी सवय नसतानाही हळूहळू त्यांची सवय करून घेतली. इव्हिनिंग गाऊनपासून नऊवारीपर्यंत सर्व प्रकारच्या पेहरावांची ओळख आणि ते कॅरी करण्याची सवय झाली. आपल्याकडे असलेले कलागुण जगासमोर सादर करण्याचं तंत्र समजलं. हेच सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं’ .

वेदवती चिपळूणकर  viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr namrata joshi became the second runner up in mrs india earth contest