अभिषेक तेली

सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून युवा मतदारांचा कौल हा निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रातही प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. विकासाच्या मुद्दयांऐवजी एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यात राजकीय मंडळी रमली असून आश्वासनांचेही ढग दाटले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या निवडणूक उत्सवात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावताना देशाचं भविष्य असलेल्या तरुणाईच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने सत्तासंघर्षांचे विविध अंक पाहिले. राजकीय पक्षांमधील फूट, दिग्गज नेत्यांचे बंड, सत्तेसाठी जुळलेली अनपेक्षित समीकरणे आणि अभूतपूर्व सत्तांतर पाहून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची चिरफाड झाली अशी भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे ६३.७१ टक्के व ६२.७१ टक्के मतदान झाले. मतदानाची कमी टक्केवारी चिंताजनक आहे. परंतु मतदानाचा हक्क बजावून योग्य लोकप्रतिनिधीची निवड, अनागोंदी कारभाराला आळा आणि भ्रष्टाचाराला मुळासकट नष्ट करता येईल, असे काही तरुण मंडळींना वाटते आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नवमतदार तन्वी गुंडये म्हणते की, ‘आयुष्यात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावताना प्रचंड उत्सुकता व उत्साह आहे. पण जबाबदारी वाढल्याची जाणीवही होते आहे. आपलं एक मतही अमूल्य असतं, हे ध्यानात ठेवून विचारपूर्वक निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. अलीकडच्या काळातील पक्षफोडीचं राजकारण आणि आजही सत्तासंघर्षांच्या राजकारणाची होणारी पुनरावृत्ती पाहून मतदान करावं की नाही, हाच प्रश्न सर्वप्रथम भेडसावत होता. परंतु मतदानाच्या जोरावर भ्रष्ट लोकप्रतिनिधींना नामोहरम करता येऊ शकेल आणि लोकशाहीची ताकद दाखवता येईल, असं वाटतं. धर्माधर्मात वाढणारी तेढ, पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढणं, आरोप-प्रत्यारोप, आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन करणं, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. या सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करून मत द्यायचं ठरवलं आहे. मूलभूत गरजांकडे लक्ष देऊ शकणाऱ्या आणि नवनवीन योजना राबवू शकणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकडे प्राधान्य असेल.’

हेही वाचा >>> क्रिकेटपलीकडचे आयपीएल

सध्या सत्तेसाठी सुरू असलेली राजकीय पक्षांची अनपेक्षित हातमिळवणी आणि निवडणुकीच्या तोंडावर राजकीय मंडळींचे स्वत:च्या स्वार्थापोटी होणारे पक्षांतर हे राज्यातील तरुणाईला अस्वस्थ करून सोडणारं आहे. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निवडणुकीनंतर त्याच पक्षात राहतील का, अशी शंकाही तरुणाईला सतावते आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना आणि खोटया आश्वासनांना बळी न पडता विचारपूर्वक मतदान करावं, असं मत तरुणाईत व्यक्त होत आहे. ‘गेल्या वर्षभरात महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. पक्षफोडी आणि पक्षांतर पाहता भारताच्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करणं गरजेचं आहे. आपलं नेतृत्व करणारा नेता हा सर्वगुणसंपन्न असण्यासह त्याला चालू घडामोडींची जाण असणं गरजेचं आहे. कारण सध्या भारत विकासाच्या मार्गावर असतानाही बहुसंख्य पदवीधर तरुणाई घरात बसली आहे. बेरोजगारीचं प्रमाण झपाटयाने वाढतं आहे. त्यामुळे जर आम्ही आता आमचा नेता निवडताना चूक केल्यास भविष्यात त्याचे वाईट परिणाम आम्हालाच भोगावे लागणार आहेत’, असे मुंबई उपनगरातील नवमतदार नमिता सूर्यवंशी हिने सांगितलं. तर परभणीतील नवमतदार कृणाल बेंद्रे याच्या मते, ‘लोकसभा निवडणुकीत मतदान करताना शिक्षण, बेरोजगारी, महागाई या निकषांसह कृषी, स्थानिक उद्योगांना साहाय्यता, वाहतूक सुविधांची उपलब्धता, आरोग्यसुविधा, सर्वसमावेशक विकास आणि एकंदरीत भविष्याचा विचार करून विविध मुद्दे पाहिले जातील. कृषी विद्यापीठाच्या अनुषंगाने विकासाची भूमिका ठेवणारे सरकार निवडण्याकडे माझा कल असेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवर जनसंपर्क असणारा, सुशिक्षित, संसदीय कामकाजात प्रभावी ठरू शकणारा, मतदारसंघाच्या समस्या जाणणाऱ्या उमेदवाराला माझी पहिली पसंती असेल.’

देशाला विकासाच्या वाटेवर न्यायचे असल्यास तरुणाईला मोठया संख्येने मतदान करावेच लागेल, असा सूर तरुणाईमध्ये आहे. दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य आदी महत्त्वपूर्ण क्षेत्रांचा सर्वांगीण विकास निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीने करणं आवश्यक आहे. त्यामुळे नवमतदार म्हणून उमेदवाराची निवड करताना संबंधित उमेदवाराची आजवरची राजकीय, शैक्षणिक पार्श्वभूमी, गुन्ह्यांची नोंद आदी विविध गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत, असं मत तरुणाई व्यक्त करते आहे. मुंबई उपनगरातील नवमतदार हर्षदा गाडेकर सांगते की, ‘लोकशाहीच्या या सोहळयामध्ये उमेदवार निवडीबाबत व्यक्तीपरत्वे नक्कीच वेगवेगळे निकष असतील. परंतु माझ्यामते उमेदवाराचे शिक्षण किंवा नवीन उमेदवाराने त्याच्या संबंधित क्षेत्रात केलेले कार्य, जुन्या उमेदवाराने केलेल्या कामाचा पाठपुरावा, गुन्ह्यांची नोंद, सामाजिक जाण, कार्यतत्परता, विचारसरणी या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. मतदान करताना उमेदवाराचा पक्ष, जात, धर्म, वैयक्तिक फायदा न पाहता ‘समाजहित’ म्हणजेच ‘आपल्या भागाचा विकास’ हा सगळयात महत्त्वाचा निकष जोपासला पाहिजे. एखादा उमेदवार तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेच्या सभागृहात मांडतच नसेल, त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत नसेल, तुमच्या अडीअडचणींचा पाठपुरावाच करत नसेल आणि शेवटी त्यासाठी लागणारा निधी केंद्राकडून मंजूर करून घेत नसेल, तर तो लोकप्रतिनिधी काय उपयोगाचा आहे. तुम्ही प्राधान्य दिलेल्या पक्षाचा, जाती-धर्माचा, विचारसरणीचा असला तरी काय उपयोग? त्यासाठी सगळयात महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा अधिकार आणि विशेषत: जबाबदारी सगळयांनी पार पाडलीच पाहिजे’. तर नागरिकांसह तरुण नवमतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही दबावाला आणि आश्वासनांना बळी पडू नये. एक दूरदृष्टी ठेवून, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून आणि सध्याची जागतिक परिस्थिती पाहता, माझ्या देशाचं जागतिक पातळीवरील स्थान मजबूत करण्यासाठी मी मतदान करेन. देशाचा सर्वसमावेशक विकास, तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविणाऱ्या, तापमान वाढ, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा अनेक मुद्दयांवर दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवारास मत देण्याकडे माझा कल असेल, असं साताऱ्यातील नवमतदार प्रथमेश संकपाळ याने सांगितलं.

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

सत्तेचं सिंहासन काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सुसंस्कृत राजकारणाचा झालेला चिखल आणि फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनतेसह तरुण पिढी कंटाळलेली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी राजकीय पटलावर वावरताना केलेल्या कामगिरीचा लेखाजोखाही जनतेने लक्षात ठेवला आहे. राजकीय मंडळींनी स्वत:च्या स्वार्थाला महत्त्व न देता, विकासाला महत्त्व द्यावं असं तरुण नवमतदारांचं म्हणणं आहे. एकमेकांवर राजकीय व वैयक्तिकदृष्टया टीकाटिप्पणी करण्यामध्ये रमण्यापेक्षा, निवडून आल्यानंतर कशापद्धतीने मतदारसंघाचा विकास करणार, याबाबत उमेदवारांनी स्पष्टता देणं गरजेचं असल्याचं मतही तरुणाईने व्यक्त केलं आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईची मतं निर्णायक ठरणार हे निश्चित आहे.

बेजबाबदार नागरिकांमुळे राजकीय क्षेत्राची पत ढळली

जगातील सर्वात मोठी ‘लोकशाही’ म्हणून भारताकडे पाहिलं जातं. भारतातील लोकसभा निवडणूक ही जगातील सर्वात व्यापक निवडणूक असून एकप्रकारे लोकशाहीचा उत्सवच असतो. हा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस झटत असतात. परंतु मतदानाच्या दिवसाकडे अनेक जण सुट्टी म्हणून पाहतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीतही कमालीची घट होते. याबद्दल छत्रपती संभाजीनगरमधील नवमतदार आदित्य देशमुख म्हणतो, ‘इतिहास व नागरिकशास्त्राच्या पुस्तकामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून राजकारणात माझी नेमकी काय भूमिका आहे, हे कळलं. वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर आपण मोठे झाल्याची आणि जबाबदारी वाढल्याची जाणीव निर्माण होते. आजघडीला माझ्या आजूबाजूला बहुसंख्य मंडळी अशी आहेत की ज्यांना स्वत:चा नगरसेवक, आमदार व खासदार कोण आहे, याबाबत अजिबात कल्पना नसते. तसंच त्याबाबत जाणून घेण्याची इच्छाही त्यांना नसते. यामध्ये तरुण मंडळींचाही समावेश अधिक आहे. माझ्या मते राजकीय पक्षाची पत ढळण्याला हीच मंडळी जबाबदार आहेत. आपल्या दैनंदिन दिवसात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा समावेश असतो. त्यामुळे यंदा माझं पहिलं मत प्रचंड महत्त्वाचं असणार आहे, याची मला जाणीव आहे.’ तसंच लोकसभेच्या उमेदवाराला सभागृहात कायदे निर्मितीमध्ये योगदान द्यावं लागतं. त्यामुळे आपण निवडून देणाऱ्या खासदाराला त्यासंदर्भात किमान गोष्टींची माहिती असायला हवी. त्याने माझे प्रश्न लोकसभेत मांडावे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करावा, अशी अपेक्षाही आदित्यने व्यक्त केली.

viva@expressindia.com