Haj Yatra without Mehram : इस्लाम धर्मात हज यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते. आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा झाली पाहिजे, अशी बहुसंख्य इस्लाम धर्मीयांची श्रद्धा आहे. अर्थात, त्याला महिलाही अपवाद नाहीत. परंतु, हज यात्रेकरिता महिलांवर अनेक निर्बंध लादले गेले होते. ‘हज’ला जाण्यासाठी त्यांच्याबरोबर कुणीतरी ‘मेहरम’ म्हणजेच पुरुष जोडीदार किंवा जवळचा पुरुष नातेवाईक असणं आवश्यक होतं. परंतु, भारत सरकारच्या हज कमिटीनं गेल्या वर्षी एक नियम बदलला. त्यानुसार इस्लाम धर्मीयांतील महिला एकट्यासुद्धा हज यात्रेला जाऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, यंदा पाच हजार १६२ भारतीय महिला हज यात्रेला ‘मेहरम’शिवाय जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हज यात्रा २०२४ साठी ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सहा हजार ३७० महिलांचे अर्ज आले आहेत. तर, पाच हजार १६२ महिलांनी मेहरमशिवाय यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला आहे, असं भारतीय हज समितीनं म्हटलं आहे. पीटीआयनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली हज समितीनं सोमवारी २९ जानेवारी रोजी हज अर्जदारांसाठी चिठ्ठ्या काढण्याची प्रक्रिया पार पाडली. हज यात्रेला जाण्याकरता चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया राबवली जाते. यावेळी ७० वर्षांवरील सर्व महिलांचे अर्ज आणि ज्यांना ‘मेहरम’शिवाय तीर्थयात्रेला जायचे आहे, त्यांचे अर्ज स्वीकारले गेले. त्यांच्यासाठी चिठ्ठ्या काढण्याची प्रक्रिया राबवली गेली नाही.

भारत हज समितीकडे एकूण पावणेदोन लाख अर्ज

हज २०२४ साठी भारतातील एकूण एक लाख ७५ हजार ०२५ यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी एक लाख ४० हजार ०२० जणांना हज समितीकडून पाठवलं जातं; तर ३५ हजार पाच यात्रेकरूंना खासगी ऑपरेटर्सकडून नेण्याची परवानगी आहे. ‘हज कमिटी ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी लियाकत अली आफकी यांनी सांगितले की, मेहरमशिवाय हजला जाणाऱ्या ५,१६२ महिलांपैकी ३,५८४ केरळमधील, ३७८ तमिळनाडू, २४९ कर्नाटक, १६६ महाराष्ट्र, १४१ उत्तर प्रदेशमधून, तेलंगणातून १३०, जम्मू-काश्मीरमधून ८२, मध्य प्रदेशातून ७२, गुजरातमधून ६४, दिल्लीतून ५०, आंध्र प्रदेशातून ४४, पश्चिम बंगालमधून ४०, राजस्थानमधून ३३, बिहारमधून ३०, आसाममधून २९, पुद्दुचेरीमधून १९, छत्तीसगडमधून १४, उत्तराखंडमधून १०, झारखंडमधून नऊ, गोवा व ओडिशातील प्रत्येकी पाच, लडाखमधून तीन, लक्षद्वीपमधून दोन आणि हरियाणा, हिमाचल प्रदेश व पंजाबमधून प्रत्येकी एक अशा संख्येनं महिला जाणार आहेत.

हेही वाचा >> मुस्लिम धर्मीयांसाठी हज यात्रा महत्त्वाची का आहे? हज यात्रा म्हणजे काय?

इस्लाम धर्मामधील तत्त्वांमध्ये ‘हज’ यात्रेचा समावेश करण्यात आला आहे. स्त्री जगभरात कुठेही एकटी फिरत असली तरी तिला हज यात्रेला मात्र एकटीला जाण्याची परवानगी नव्हती. तिच्याबरोबर जवळचा पुरुष नातेवाईक असणं आवश्यकच होतं. पुरुष जोडीदाराबरोबर जाता येत नसल्यास चार जणींचा गट करून अर्ज करावा लागत असे. त्यामुळे महिलांना हज यात्रेला जाण्यासाठी मर्यादा येत होत्या. तसंच चार जणींच्या गटामधील एका महिलेनं जरी अर्ज मागे घेतला तरी उर्वरित महिलांचे अर्जही रद्द होत असत. तसंच मेहरम पूर्णवेळ या महिलेबरोबर राहत असल्यानं त्याचा खर्चही करावा लागत असे. परंतु, भारत हज कमिटीनं हा मेहरमचा पर्याय काढून टाकल्याने महिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता त्या मोकळेपणाने हज यात्रेला जाऊ शकणार आहेत.

हज यात्रा कधी होते?

‘धू-अल-हिज्जा’ (Dhu al-Hijjah) इस्लामिक दिनदर्शिकेच्या या शेवटच्या महिन्यात हज यात्रेला प्रारंभ होतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या तुलनेत इस्लामिक दिनदर्शिकेत ११ दिवस कमी येतात. त्यामुळे ग्रेगोरियन दिनदर्शिकेत दरवर्षी हजच्या तारखा वेगवेगळ्या असतात. मागच्या वर्षीपेक्षा पुढील वर्षात हज १० ते ११ दिवसांनी आधीच येतो. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार दर ३३ वर्षांनी एका वर्षात दोन वेळा हजच्या तारखा येतात. असा योगायोग २००६ साली घडलेला आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5162 indian women to perform haj without mehram in 2024 sgk
First published on: 30-01-2024 at 16:14 IST