‘ॲनिमल’ चित्रपटात सुरुवातीच्या काही मिनिटांत एक संवाद आहे… “सदियों पहले दो तरह के बंदे होते थे. एक अल्फा और दुसरे बाकी सब. अल्फा यानी स्ट्राँग बंदे. जो जंगल में घुसकर शिकार कर के लाते थे. पर औरते सिर्फ खाना नहीं पकाती थी. वो ये भी डिसाइड करती थी कि शिकारीयों में से कौनसा मर्द उनके साथ बच्चे पैदा करेगा, उन्हे प्रोटेक्ट करेगा…” रणबीर कपूर रश्मिकाच्या पावलावर हात ठेवून तिने त्याच्याशीच लग्न करणं कित्ती गरजेचं आहे, हे पटवून देतोय… हा आहे ‘ॲनिमल’मधला ‘अल्फा मेल’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप रेड्डी वांगाच्या कल्पनेतून पडद्यावर उतरलेल्या आणि रणबीर कपूरने पूर्ण ताकदीने साकारलेल्या या अल्फा मेलमुळे ‘भारताचा अफगाणिस्तानच होईल’ या भीतीने सध्या कित्येकांना पछाडलं आहे! एवढं भयंकर काहीतरी पडद्यावर दाखविण्याची परवानगी मिळतेच कशी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्याचं असं आहे की, एकतर या चित्रपटाचं नावच ‘ॲनिमल’ आहे. दुसरं म्हणजे दिग्दर्शकाच्या खात्यात ‘अर्जुन रेड्डी’ (तेलुगू) आणि त्याचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ असे माणसातलं जनावर बिनदिक्कत पडद्यावर मांडणारे चित्रपट जमा आहेत. असं असताना चित्रपटात अहिंसा आणि स्त्रीदाक्षिण्याचे धडे शोधण्याचा उपद्व्याप करणं हे अतीच महत्त्वाकांक्षी ठरतं! तिसरी आणि प्रत्येकाने विचार करावा अशी बाब म्हणजे आपण आपल्या भवतालाकडे खरोखरच उघड्या डोळ्यांनी आणि मनाने पाहतो का? वास्तव स्वीकारतो का?

हे ‘अल्फा मेल’ आले कुठून?

‘अल्फा मेल’ ही संकल्पना आली आहे प्राणीवर्गातूनच! कळपातला सर्वांत शक्तिशाली नर म्हणजे अल्फा मेल. शिकार करण्याची, कळपातल्या इतरांचं रक्षण करण्याची, मादीचा अनुनय करून तिला जिंकण्याची आणि आपल्या इलाक्यात इतर कोणालाही फिरकू न देण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो अल्फा मेल. तो सोडून बाकीचे सगळे ‘बिटा मेल’- सर्वसामान्य नर- अशी ही ढोबळ विभागणी. पुढे साधारण ऐंशी- नव्वदच्या दशकात ही संज्ञा माणसांच्या बाबतीत विशेषतः बलाढ्य उद्योगपतींच्या, राजकीय नेत्यांच्या बाबतीत वापरली जाऊ लागली. शारीरिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या शक्तिशाली आणि वर्चस्ववादी पुरुष असं तिचं ढोबळ स्वरूप आहे. त्यात ‘बिटा मेल’, ‘सिग्मा मेल’चीही भर पडली. सध्याची ‘जेन झी’ स्वतःची ओळख यात शोधताना दिसते. समाजमाध्यमी गटांत डोकावल्यास या विषयावरचा मुबलक खुराक सापडतो.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: उपवासाला भाताची पेज, मुगाचे कढण?

‘ॲनिमल’मधला शाळकरी वयातला रणविजय सिंग (रणबीर) आपल्या मोठ्या बहिणीला कोणीतरी छेडलं, तिच्याकडे लक्ष द्यायला बाबांना वेळ नाही, म्हणून स्वतःच तिच्या कॉलेजात जातो आणि रायफलमधल्या सगळ्या गोळ्या जमिनीवर झाडून येतो! रक्षण करण्याच्या स्वतःच ओढावून घेतलेल्या जबाबदारीपुढे जगातली कोणतीही भीतीही फिकी पडते. पुढे याच बहिणीच्या नवऱ्याने आपल्या वडिलांवर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचं उघड होतं, तेव्हा तो त्याचा ‘कायमचाच बंदोबस्त’ करून टाकतो. स्वतःच स्वतःला अत्युच्य स्थानी बसवून कुटुंबाचे सगळे निर्णय स्वतःच घेऊन मोकळी होणारी अशी उदाहरणं आपल्या आजुबाजूला कधी नसतातच का? रणविजय बडे बाप का बेटा आहे, त्यामुळे रक्ताचे सडे पाडतो आणि आपल्या आजुबाजूचे असे काही कथित कुटुंबप्रमुख शाब्दिक तोफगोळ्यांपर्यंत आणि काही वेळा कौटुंबिक हिंसाचारापर्यंत मजल मारतात, एवढंच! जे समाजात आहेच त्यावर आपण ओरड करत नाही. किंबहुना अनेकदा आपल्याला त्यात काही वेगळं वाटतही नाही. समाजात असं घडणारच, असं आपण म्हणतो. मग तेच जरा आणखी भडक स्वरूपात पडद्यावर दाखवलं तर एवढी ओरड करण्याचं कारण काय?

रश्मिकाच्या ‘ब्रा’वर किती ती चर्चा

खरंतर संपूर्ण कथा वंचित बालपणाभोवती गुंफली आहे. या कल्पनेच्या अतार्किकतेवर टीका झाली असती तर समजण्यासारखं होतं. आपल्याला आपल्या वडिलांनी आयुष्यात कधीच वेळ दिला नाही, ते चांगले बाबा होऊ शकले नाहीत, म्हणून पुढच्या जन्मी मी त्यांचा बाबा होणार आणि त्यांना चांगला बाप कसा असतो हे शिकवणार. म्हणजे त्याच्या पुढच्या जन्मी ते माझे बाबा होतील आणि माझ्यावर प्रेम करतील… ही काय कॉन्सेप्ट आहे? संपूर्ण चित्रपट याच अजब तर्कटावर बांधला आहे. मात्र त्याविषयी फार कोणी तक्रार करताना दिसत नाही. सगळी तक्रार आहे, ती त्याने एका बाईला बूट चाटायला सांगितलं, गीतांजलीच्या (रश्मिका) ब्राचा पाठीवरचा पट्टा खेचून सटकन मारला याबद्दल. त्याने तसं केल्यानंतर तिने त्याच्या कानाखाली मारल्याच्या दृश्याचा मात्र बहुतेकांना विसर पडला. चित्रपटात तो दोनदा रश्मिकाचे पाय धरताना दिसतो, मात्र ते अनेकांच्या नजरेतून सहज निसटतं. पण तो विवस्त्र होऊन आपल्या महालाच्या आवारात फिरतानाचं ब्लर केलेलं दृश्य, चित्रपटातली शरीरसंबंधांची दृश्य यांची मात्र समाजमाध्यमांवर सतत उजळणी सुरू आहे.

अलीकडे चित्रपटांत मासिक पाळीच्या काळात स्त्रियांची किती काळजी घ्यायला हवी याचे धडे देण्याचं (- असा उल्लेख ‘कबीर सिंग’, ‘अर्जुन रेड्डी’मध्येही आहे), त्यावर चित्रपट काढण्याचं प्रमाण वाढत असाताना, “महिन्यातून चार पॅड बदलताना किती नखरे करतेस, मी दिवसाला २० पॅड्स बदलतोय,” असं आजारांनी पुरता बेजार झालेला, रणविजय गीतांजलीला कसं काय विचारू शकतो? असा प्रश्न अनेकींना पडला आहे.

आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न कधीच कोणी विचारले नाहीत का, याचं उत्तर प्रत्येकीने स्वतःविषयी अजिबात दया वगैरे वाटू न देता स्वतःलाच द्यावं आणि मग ‘चित्रपट हा समाजाचा आरसा असतो’ वगैरे वाक्यं आठवावीत.

बॉबी देओलचं फोरसम!

रणविजय क्रूर आहे, समाजाच्या श्लीलतेच्या व्याख्येत बसणारा नाही, पण महिलांच्या मर्जीविरोधात त्यांच्यावर जबरदस्ती करताना दिसत नाही. खरा पुरुषी अभिमानाचा कळस दिसतो तो बॉबी देओलने साकारलेल्या अब्रारमध्ये. दोन पत्नी मुलाबाळांसमोर तिसरा निकाह करणारा, निकाह झाल्यानंतर काही क्षणांत जमलेल्या पाहुण्यांसमोर नव्या पत्नीवर झडप घालणारा आणि पुढच्या आणखी काही क्षणांत आधीच्या दोन पत्नींनाही तिच्याच बेडरूममध्ये आणणारा अब्रार हा खरा ‘मिसॉजिनिस्टिक’ आहे. इथेही प्रपोगंडाचा वहिम येतो. तो ‘अब्रार’ आहे. (असा ‘प्रोपगंडा’चा संशय या चित्रपटात अनेकदा येतो, पण ‘कुछ तो गडबड हैं’ हे जाणवेपर्यंत चित्रपट आणि प्रेक्षकही पुढे सरकलेला असतो. काही उदाहरणं म्हणजे मशीनगन निर्मितीबद्दल ‘आत्मनिर्भर भारत’चा उल्लेख किंवा कंपनीचं नाव ‘स्वस्तिक’… नायकाचं पूजेच्या वेळी गोमूत्र प्राशन करणं आणि चर्चमध्ये सिगारेट ओढणं… वगैरे.)

शेवटी काय, तर ‘ॲनिमल’ बघून चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपण गेले ३ तास २० मिनिटं नेमकं काय पाहत होतो, असा प्रश्न पडू शकतो! मजा अशी आहे, की ‘ॲनिमल’च्या जगात पोलीस, शासन, व्यवस्था वगैरे अद्याप निर्माण व्हायची आहे, वगैरे गोष्टींवर आपल्याला विशेष आक्षेप वाटत नाही. चित्रपट म्हणून आपण ते सहज स्वीकारू शकतो.

अश्लील, हिंसक वगैरे गटात मोडणारे चित्रपट अनेकदा महिलांचा अपमान करणारे म्हणून नाकारले जातात. ‘ॲनिमल’चं वेगळेपण हे, की त्याच्याविषयी पुरुषांनाही अनेक आक्षेप आहेत. कदाचित अल्फा, बिटा, सिग्मा अशी आपली वर्गवारी केली जाणं त्यांना पटत नसावं. बायकांना एव्हाना आकारावरून, रंगांवरून आणि आणखी कशा कशावरून किती किती वर्गांमध्ये विभागलं गेलं आहे, याचा काही हिशेबच राहिलेला नाही. पुरुषांसाठी मात्र हे नवं आहे. ‘ॲनिमल’मुळे डोक्यात असा काही गदारोळ खरोखरच सुरू असेल, तर बाई असो वा पुरुष कोणीही ‘तो केवळ एक चित्रपट आहे,’ असं म्हणावं आणि सरळ सोडून द्यावं! कारण खरी गोष्ट अशी आहे, की या चित्रपटातली पात्रं क्रूर, विकृत, बिनडोक आणि बिच्चारीही वाटू शकतात, पण कोणीही ‘हीरो’ वाटत नाही… त्यांची कीव येऊ शकते, द्वेष वाटू शकतो, मात्र त्यांच्याविषयी प्रेम निश्चितच निर्माण होत नाही. बाहेर पडणारा प्रेक्षक त्यांना लाखोली वाहत असतो, हेच संदीप रेड्डी वांगाचं यश आहे!

आयुष्य म्हणजे काही सिनेमा नव्हे आणि सिनेमा म्हणजे आयुष्य नव्हे! बाकी सिनेमाबाहेरच्या आपल्या खऱ्याखुऱ्या जगात बायकांवर अत्याचार होतात, बायका कापल्या जातात, बॅगेत भरून दूर जंगलात फेकल्या जातात, भांड्यात घालून शिजवल्या जातात, असल्या बातम्यांचं मसालेदार वार्तांकन २४ तास सुरू असतं. पण तो भाग वेगळा…! चित्रपटांमध्ये मात्र स्त्रियांचा पूर्ण आदर झालाच पाहिजे. नाहीतर भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही!

vijaya.jangle@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal movie review male dominance cruelty and reality of women assault dvr