मामाअर्थ कंपनीच्या प्रमुख गझल अलघ या त्यांच्या ब्रँडमुळे सतत चर्चेत येत असतात. पण, सध्या त्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी लिंक्डिनवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी त्या आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही १२ तास काम करत होत्या असं सांगितलं होतं. महिला गर्भावस्थेत काम करू शकत नाही, ही पुरुषांची मानसिकता मला बदलायची होती, असे त्या म्हणाल्या होत्या. मग काय तर, लोकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली. कोणी म्हणाले, “गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे; तर कोणी म्हणाले, “पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी हा धोका कशाला पत्करायचा?” तुम्हाला काय वाटते, महिला गर्भावस्थेत खरंच काम करू शकत नाही?

मामाअर्थ कंपनीच्या प्रमुख गझल अलघ लिंक्डिन पोस्टमध्ये काय म्हणाल्या होत्या?

मामाअर्थ कंपनीच्या प्रमुख गझल अलघ लिंक्डिन पोस्टमध्ये लिहितात, “जर तुम्ही गर्भवती आहात तर हळू हळू पावलं टाका.”
त्या पुढे लिहितात, “मी मित्र आणि नातेवाईकांकडून अनेकदा बरंच काही ऐकलं. जेव्हा मला शार्क टँकमध्ये या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी समोर आली, तेव्हा मी विचार केला आणि आठ महिन्यांची गर्भवती असतानासुद्धा संधी घेतली आणि १२ तास शूट केले. माझा उद्देश इतरांना प्रेरणा देण्याचा होता. महिला गर्भावस्थेत काम करू शकत नाही, हा विशेषत: पुरुषांमध्ये असलेला गैरसमज मला दूर करायचा होता.”
“यावर्षी माझ्या इनोव्हेशन टीममध्ये चार मॅनेजर्स गर्भवती आहेत. आम्ही इनोव्हेशनसाठीचं बजेटही खूप जास्त ठेवलं आहे. मला विश्वास आहे की, आम्ही त्यांच्या मुलांची प्रसूती तर करणारच, पण त्याचबरोबर आमचे लक्ष्यही पूर्ण करू. जेव्हा सहकार्याची गरज भासेल तेव्हा आम्ही एकमेकांसाठी हजर आहोत.”

हेही वाचा : “मी वाईट आई आहे का?” Mamaearth Co-founder गझल अलघ यांची भावनिक पोस्ट चर्चेत

महिलांनी गर्भावस्थेत काम करावे की नाही?

प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना सांगतात, “महिलांनी गर्भावस्थेत काम करावे, त्यात काहीही चुकीचे नाही. गर्भधारणा हा काही आजार नव्हे, पण गर्भावस्थेत किंवा त्यामुळे कोणता आजार झाला असेल तर काम करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे हे चांगले लक्षण नाही. अशा महिलांनी कामाचा ताण घेऊ नये, पण ज्या महिला निरोगी आहेत, त्या काम करू शकतात.

गर्भावस्थेत किती काम करावे?

डॉ. निखिल दातार सांगतात, ” गर्भावस्थेत किती काम करावे हे तुम्ही काय काम करता यावर अवलंबून आहे. याशिवाय गर्भावस्थेत महिला निरोगी आहे का, हेसुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची क्षमता आणि स्वरुप वेगवेगळे असते, त्यामुळे किती काम करावे हे त्या व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असते.”

महिलांना वारंवार स्वत:ला का सिद्ध करावं लागतं?

जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, तेव्हा ते प्रश्नचिन्ह खोडून काढण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांच्या बाबतीत हे सातत्याने दिसून येते. महिला अमूक एक गोष्ट करू शकत नाही, असं सहज बोललं जातं, पण अशी कोणतीच गोष्ट नाही जी महिला करू शकत नाही. आपण स्त्री-पुरुष समानतेविषयी अनेकदा बोलतो किंवा वाचतो, पण प्रत्यक्षात महिलांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. समानतेच्या रांगेत टिकण्यासाठी महिलांना निर्सगाने दिलेल्या जबाबदाऱ्यांसह इतर जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या लागतात. महिलांमध्ये खूप जास्त सहनशीलता आहे, त्यामुळे वेळोवेळी ती स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करते.