आपल्याकडे समाजात अनेकानेक बर्‍या-वाईट गोष्टी बराच काळ सुरू असतात, त्यातून खूप काळ चालू राहिलेली गोष्ट कायदेशीर ठरते असा एक सार्वत्रिक गैरसमज निर्माण होतो. मात्र जेव्हा एखाद्या गोष्टीवरून वाद उद्भवतात आणि वाद न्यायालयात पोहोचतात तेव्हा एखादी गोष्ट किती काळ सुरू आहे यापेक्षा सुरू असलेली गोष्ट कायदेशीर आहे की नाही हे महत्त्वाचे कसे ठरते या संबंधी एक प्रकरण नुकतेच केरळ उच्च न्यायालयात घडले. या प्रकरणात पतीच्या निधनानंतर त्याची कायदेशीर पत्नी कोण, यावरून दोन बायका भांडत होत्या आणि तो वाद न्यायालयात पोहोचला. कौटुंबिक न्यायालयाने एका पत्नीच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च न्यायालयाने- १. खालच्या न्यायालयात दाखल केलेली याचिकाच अयोग्य असल्याचा मुद्दा मांडण्यात आला, मात्र विवाहाची वैधता, अवैधता ठरविण्याचा अधिकार कौटुंबिक न्यायालयाला असल्याने सदर याचिका योग्यच ठरते. २. पहिल्या लग्नासंदर्भात साक्षीपुरावे सादर करण्यात आले, त्यात सादर फोटोंची निगेटिव दाखल न केल्याचा आक्षेप घेण्यात आला, मात्र फोटो कोणत्याही व्यावसायिक व्यक्तीने नव्हे तर नातेवाईकानेच काढलेले असल्याने एवढी जुनी निगेटिव न मिळणे ग्राह्य धरता येते. ३. पहिल्या लग्नातून जन्मलेल्या अपत्याच्या जन्मदाखल्यावर उभयतांचे नाव आई-वडील म्हणून दिसून येत आहे. ४. पहिल्या लग्नात कन्यादान विधी न झाल्याचा आक्षेप अपीलात घेण्यात आला, मात्र बाकी सर्व विधी करण्यात आल्याने कन्यादान विधी नसल्याचा विवाहावर विपरीत परिणाम होणार नाही. शिवाय याबाबतीत खालच्या न्यायालयात काहीही आक्षेप घेण्यात आले नव्हते. ५. बाकी सगळे पुरावे लक्षात घेता, पहिल्या विवाहानंतर आणि पहिला विवाह कायम असताना दुसर्‍या विवाह करण्यात आला हे स्पष्ट आहे. ६. पती आणि दुसरी पत्नी दीर्घकाळ एकत्र राहिले आणि त्यातून त्यांना अपत्यदेखील झाले हे खरे असले तरी गोकल चंद खटल्याच्या निकालानुसार त्यांचे संबंध वैध विवाह मानायला मर्यादा आहेत. ७. पहिला विवाह कायम असताना केलेला दुसरा विवाह हिंदू विवाह कायदा कलम ११ मधील तरतुदीनुसार सुरुवातीपासूनच अवैध (व्हॉइड अ‍ॅब इनिशिओ) ठरतो, अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आणि कौटुंबिक न्यायालयाचा निकालच योग्य ठरवला. एकत्र राहणे, दीर्घकाळ एकत्र राहणे, त्यातून अपत्यप्राप्ती होणे या सगळ्या गोष्टीसुद्धा त्या नात्याला वैध विवाहाचा दर्जा देऊ शकत नहीत हा बोध या महत्त्वाच्या निकालातून घेणे आवश्यक आहे. विशेषत: पहिले लग्न कायम असताना केलेले दुसरे लग्न किंवा दुसर्‍यासह दीर्घकाळ सहवास याला लग्नाचा दर्जा मिळत नाही हे स्पष्ट करणारा म्हणून हा निकाल महत्त्वाचा आहे.

हेही वाचा – डोक्यावर हेल्मेट, हातात लगाम… ‘ती’नं घडवला इतिहास!

आपल्याकडे बहुतांश गैरसमज हे ऐकिव माहिती आणि सांगोवांगी चर्चा यातून जन्म घेत असतात. काही छोटे मोठे गैरसमज आयुष्याचे फार मोठे नुकसान करतीलच असे नाही. पण एखाद्या सोबत एकत्र राहणे, त्याच्याशी शरीरसंबंध ठेवणे आणि अपत्यप्राप्ती करणे या आयुष्य बदलून टाकणार्‍या गोष्टी असल्याने केवळ ऐकिव माहितीच्या आधारे याबाबतीतले अंतिम निर्णय घेणे महागात पडू शकते. अशा महत्त्वाच्या आणि आयुष्य बदलून टाकणार्‍या गोष्टी करण्यापूर्वी याबाबतीत कायदेशीर तरतुदी नक्की काय आहेत ? आपल्या नात्याला काही कायदेशीर दर्जा आहे का? कायदेशीर दर्जा भविष्यात तरी मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे शोधावी आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा.

हेही वाचा – National Girl Child Day : लैंगिक समानतेच्या देशात राष्ट्रीय बालिका दिनाचं वैशिष्ट्य काय?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच हवे आहे, पण आपल्या आयुष्याचे अधिकार हातात घेताना, अधिकारासोबत आपोआपच येणार्‍या जबाबदारीचेसुद्धा भान ठेवले तर अशी फसगत होण्याची शक्यता आपोआपच कमी होईल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Living together for a long time does not qualify as marriage ssb
First published on: 24-01-2024 at 13:20 IST