देशभरातील एटीएमची संख्या एक लाखाच्या वर पोहोचली आहे. अर्थातच यामध्ये बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेचे सर्वाधिक एटीएम आहेत. ३१ ऑक्टोबरअखेर देशातील एकूण एटीएम १,०४,५०० झाले आहेत. पैकी ५९ टक्के हिश्यांसह स्टेट बँक आणि तिच्या पाच सहयोगी बँकांचे ६१,५०० एटीएम आहेत.
विविध बँकांच्या एटीएमद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे नियंत्रण असणाऱ्या ‘राष्ट्रीय वेतन महामंडळा’ने (एनपीसीआय) ही माहिती जारी केली आहे. महामंडळ विविध बँकांच्या अंतर्गत वेतनाचीही माहिती ठेवते. भारतात स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून बँकेतील आपल्या खात्यातून रोख काढणे आदी व्यवहार १९९० च्या दशकापासून एटीएमद्वारे व्हायला सुरुवात झाली. बँक क्षेत्रातील तीव्र स्पर्धा पाहता अनेक बँकांनी या व्यासपीठाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांचाही आक्रमकपणे विस्तार केला आहे.
देशातील खाजगी बँकांचे आजवर ४१,८०० एटीएम असून त्यांचा बाजारहिस्सा ४० टक्के आहे. तर सहकारी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांकडे त्यांच्या देशभरातील १,१५० एटीएमसह उर्वरित एक टक्का बाजारहिस्सा आहे. एटीएमद्वारे होणारे बँकांचे व्यवहार ‘नॅशनल फायनान्शियल स्विच’द्वारे होतात. या माध्यमातून महिन्याला २० कोटी उलाढाली होतात; त्यामध्ये ७५ टक्के व्यवहार हे केवळ रोख काढण्याचे असतात, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. प्रति उलाढाल सरासरी ३,३०० रुपयांची रोख काढली जाते. देशातील सर्व बँका मिळून येत्या दोन वर्षांत आणखी एक लाख एटीएम उभारतील, असा महामंडळाचा अंदाज आहे. यामुळे प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे एटीएमची संख्या सध्याच्या ८० वरून १७० होईल.