22 September 2017

News Flash

राशीभविष्य

a

मेष

करायला जावे एक..

करायला जावे एक आणि व्हावे भलतेच अशी स्थिती सप्ताहात शक्य आहे. एखादे धाडसी कृत्य किंवा निर्णय आवश्य घेऊ शकता. पण त्याला कोणते गालबोट लागणार नाही ही काळजी घेणे आवश्यक. एखादा जुना विकार पुन्हा उलटू शकतो. एखादे शत्रुत्व पुन्हा जागे होऊ शकते.

सरळमार्गी काम करतानासुद्धा आपली आर्थिक घडी विस्कटण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी काही गट कार्यरत आहेत त्यांना विसरू नका. चांगल्या गोष्टींची घटस्थापना करताना शक्यतो कुणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक व कौटुंबिक आघाडीवर मिळणारा पाठिंबा आपल्याला आपली आर्थिक घडी आहे तशी ठेवण्यास उपयोगी पडेल.

शुभ दिनांक : १८, २३.

महिलांसाठी : कोणतेही वाद फार काळ लांबवू नका.

डॉ. धुंडिराज पाठक
b

वृषभ

नियोजन अचूक हवे

नाराज मित्रमंडळ, नातेसंबंधातला दुरावा, वरिष्ठांशी मतभेद किंवा हाताखालील लोकांचा असहकार या गोष्टी होणार नाहीत किंवा त्या वाढणार नाहीत याकडे कटाक्ष ठेवा. सध्या पशांचे नियोजन फार काटेकोर करणे आवश्यक आहे. पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढा पसा ओतता येईल अशी अपेक्षा करू नका. तब्येतीचेही तंत्र जपण्यावर भर द्या. नोकरी व्यवसायातील बदल सध्या अपेक्षित नाहीत. राहत्या घरासंबंधीचा प्रश्न सरळ मार्गी सुटणे शक्य. प्रेमप्रकरणातील गाडी कुठल्या वळणावर जाईल हे सांगता येणार नाही. कोणतेही अती आग्रह, अती अट्टहास करण्याचे टाळा. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातील सलोखा मात्र आपल्याला आधार देत राहील.

शुभ दिनांक : १७, १८.

महिलांसाठी : मौल्यवान वस्तूंच्या खरेदीचे बेत पुढे ढकला.

डॉ. धुंडिराज पाठक
c

मिथुन

नफ्याचे प्रमाण वाढेल

सप्ताहातील ग्रहस्थिती बऱ्याच अंशी अनुकूल आहे. कामाचे प्रमाण व्यस्त असले तरी त्यातून बरेच काही साध्य करता येण्यासारखे आहे. मिळणाऱ्या शुभवार्ता, होणारे सकारात्मक व्यवहार, पथ्यावर पडणाऱ्या गाठीभेटी आणि सफल ठरणारे प्रवास यातून आपला अपेक्षित कार्यभाग साधता येणे अवघड नाही. आपले विविधांगी वाचन आणि अभ्यास, माहिती यांचा योग्य जागी उपयोग करून घेऊ शकाल. वाढत्या उलाढालीतून नफ्याचे प्रमाणही वाढवू शकाल. नोकरदारांनाही सगळे कसब दाखवण्याच्या संधी मिळतील. गरजूंची किंवा बेकारांची प्रतीक्षा संपेल. धार्मिक कार्यातून कौटुंबिक सलोखा वाढता राहील. वैवाहिक जीवनातील मतभेदही कमी होतील.

शुभ दिनांक : १७, १८.

महिलांसाठी : बाते कम आणि काम जादा हे सूत्र लक्षात ठेवा.

डॉ. धुंडिराज पाठक
d

कर्क

बचावात्मक राहा

संमिश्र स्वरूपाचा सप्ताह संभवतो. एकीकडे आपापल्या कार्यक्षेत्रातील अधिकार आपल्याकडे येत असताना सगळी परिस्थिती मात्र मनासारखी असेल असे नाही. हितशत्रूंच्या विरोधावर मात करत आपला व्यवहारांचा मार्ग चालायचा आहे.

आर्थिक सफलता मिळेल मात्र त्याचे नियोजन अचूक असणे गरजेचे. नोकरदारांनी बचावात्मक धोरण ठेवणे हिताचे. डोळ्यांचे विकार, मधुमेह, डोकेदुखी किंवा मूत्रविकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. कोणतेही अतिरेकी निर्णय घेऊ नयेत. कुणावरही अनाठायी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये. प्रवासात महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वैवाहिक जीवनातले तसेच मुलांसंबंधीचे प्रश्न सुटत जातील.

शुभ दिनांक  : १८, २१

महिलांसाठी : स्वतच्याच कामात जास्त लक्ष घाला.

डॉ. धुंडिराज पाठक
e

सिंह

व्यावहारिक सूत्रे हाती येतील

राशींकडून आलेले ग्रहांचे बळ अनेक अर्थानी कामाला येणार आहे. राजकारणी लोकांबरोबर असणारी ऊठबस, व्यापारी मित्रमंडळींसोबत झालेल्या गाठीभेटी, नोकरदारांनी वरिष्ठांशी जमवलेले सूत इत्यादी मार्गानी आपली अनुकूलता वाढती राहील. पशांची गणिते अपेक्षेप्रमाणे सुटत जातील. मित्रपरिवारासमवेत जमलेल्या गप्पाष्टकांतून चांगली व्यावहारिक सूत्रे हाती लागतील.

ओळखींचा फायदा घेता येईल. कौटुंबिक जीवनातले सामोपचाराचे तंत्र, वैवाहिक जीवनातले जुळत चाललेले संबंध आणि घरात वाजत असलेले शुभ कार्याचे पडघम यातून लांबणीवर पडलेली काय्रे मार्गी लागतील. खाण्यापिण्याची पथ्ये व औषधपाणी अजिबात दुर्लक्षू नका.

शुभ दिनांक : २२, २३

महिलांसाठी : कामाचे नियोजन अचूक असण्यावर भर द्या.

डॉ. धुंडिराज पाठक
f

कन्या

गोष्टी मार्गी लागतील

पशाशिवायही ही अनेक कामे होऊ शकतात, याचा अनुभव या सप्ताहात आपण घेऊ शकाल. महत्त्वाच्या ओळखी, घरातील ज्येष्ठ आणि जुने नातेसंबंध यांतून काही अपेक्षित अशा चांगल्या गोष्टी मार्गी लागतील. राहत्या घरासंबंधीचे प्रश्न असो किंवा भाऊबंधकीचे प्रश्न, त्यातून मार्ग निघू शकेल. सासुरवाडीचा एखादा प्रश्न अंगावर घेऊन सोडवावा लागेल. नोकरीव्यवसायातली स्थिती मनासारखी नसली तरीही अपेक्षित आर्थिक ध्येय गाठू शकाल. मुलांचे शैक्षणिक प्रश्न सहज सोडवू शकाल. कधीकाळी कुणाला केलेली मदत सध्या फळाला येईल. डोकेदुखी व मणक्याचे आजार असणाऱ्यांनी मात्र सध्या विशेष काळजी घेणे हिताचे.

शुभ दिनांक: १७, २१.

महिलांसाठी : अनाठायी खर्चावर र्निबध आणा.

डॉ. धुंडिराज पाठक
g

तूळ

नाव मोठे करता येईल

कला गुणांना वाव मिळणारा, मनातील इच्छा पूर्ण करणारा, लांबलेली कामे मार्गावर आणणारा आणि शुभ कार्यात सहभाग घ्यायला लावणारा असा हा सप्ताह आपल्या बाबतीत ठरू शकतो. आर्थिक घडी चांगली बसवता येईल. व्यापारी वर्गाला आपापल्या क्षेत्रात नाव मोठे करता येईल. नोकरदारांना बढतीच्या दिशेने प्रवास सुरू करता येईल. बेकारांसाठी दूरच्या ठिकाणी का होईना; पण मार्ग मिळेल. प्रेमप्रकरणातील प्रेमिकांनी किंवा विवाहितांनी थोडा संयम दाखविणे हिताचे. आतडय़ाचे किंवा पोटाचे विकार व मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातला चांगला सामोपचार आपल्याला मोठी ऊर्जा देणारा ठरेल.

शुभ दिनांक: १७, १८.

महिलांसाठी : अन्य कोणाशी तुलना करून आपला आनंद हरवून बसू नका.

डॉ. धुंडिराज पाठक
h

वृश्‍चिक

व्यवहार मनासारखे

सध्या हितचिंतक लांबलेले आणि हितशत्रूंचा जोर वाढलेला अशी स्थिती संभवते. स्वतला आहे त्यापेक्षा मोठे समजणे चूक ठरेल. आपापल्या क्षेत्रात बचावात्मक धोरण ठेऊन वाटचाल करा. ही आमावस्या आणि अन्य ग्रहमान एखादा मोठा व्यवहार मनासारखा करू शकते मात्र व्यवहारात कोणतीही चूक नको. सुसरीबाई तुझी पाठ मऊ असे धोरण ठेवल्यास नोकरी व्यवसायातील कामांमध्ये अपेक्षित वेग घेता येईल. साहित्य व सांस्कृतिक विश्वात नाव मोठे करता येईल. क्रीडाक्षेत्रात असणाऱ्यांनी मात्र थोडी सावध भूमिका ठेवावी. वैवाहिक जीवनातली सुसंगती आणि कौटुंबिक जीवनातील वाढलेला जिव्हाळा यातून घरगुती वातावरण आनंददायी ठेवता येईल.

शुभ दिनांक : २०, २१.

महिलांसाठी : कोठेही पूर्वग्रह दूषित वागू नका.

डॉ. धुंडिराज पाठक
i

धनु

मार्ग निघत राहील

साडेसातीचा काळ असला तरी अनेक कामे मनासारखी होत राहतील. खऱ्या अर्थाने शुभकार्याची घटस्थापना करू शकाल. बरेच दिवस उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने मोठय़ा हालचाली घडून येतील. आर्थिक प्रकरणे मनासारखी पुढे व वेगवान होतील. नवे जुळलेले नातेसंबंध, नवे जोडले गेलेले ग्राहक, राजकारणात जवळ आलेले सहकारी आणि मित्रपरिवाराची मेहेरनजर याही आपल्या जमेच्या बाजू राहतील. त्यातून अपेक्षित असे निर्णय घेऊ शकाल. आपला मूळचा सकारात्मक स्वभाव आणि प्रत्यक्ष कृतीला दिलेले महत्त्व यातून सप्ताहाचा यशाचा झेंडा उंचावत जाईल. घरगुती प्रश्नांतूनही मार्ग निघत राहील.

शुभ दिनांक : २२, २३.

महिलांसाठी : तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सूत्र विसरू नका.

डॉ. धुंडिराज पाठक
j

मकर

प्रश्नासोबतच उत्तर येईल

सप्ताहात अचानक धनलाभाच्या शक्यता असल्या तरी त्यावर विसंबून राहून मोठी कामे सोडून देता येणार नाही. कुठेही कोणत्याही प्रलोभनात अडकू नका. सध्या कष्टाला पर्याय नाही. हाती घेतलेली कामे नेटाने चालू ठेवा. अडथळे वाढणार असले तरी त्याला घाबरून जाऊ नका. प्रश्नाचे उत्तर हे प्रश्नासोबतच येत असते हे लक्षात ठेवा. त्यासाठी थोरामोठय़ांशी चर्चासत्रे चालू ठेवा. अनुभवी, वरिष्ठांचा हात सोडू नका. नोकरी-व्यवसायात आपल्या शक्तीपेक्षा फार मोठे धोके पत्करू नका. रुळलेल्या वाटेनेच पुढे जाणे सध्या तरी हिताचे ठरेल. वैवाहिक जोडीदाराचे वा सासुरवाडीचे होऊ घातलेले गरसमज वेळीच दूर करण्यावर भर द्या.

शुभ दिनांक : १७, २३

महिलांसाठी : सकारात्मक अवश्य राहा.

डॉ. धुंडिराज पाठक
k

कुंभ

गुंतागुंत टाळा

परिस्थिती सगळीकडून अनुकूल दिसत असली तरी प्रत्यक्षात तशी असणे अवघड आहे. आपल्याकडे येणारे संदेश, मिळणाऱ्या बातम्या आणि समोर बोलणारे काही समव्यावसायिक यांनी सांगितले गेलेले मुद्दे तसेच असतील असे नाही. शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. आरोग्याच्या बाबतीत कुठेही गहाळ पडू नका. फार अवघड कामे किंवा गुंतागुंतीच्या गोष्टी यात सध्या न पडलेले बरे. केव्हाही स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरदारांनी कायदेशीर वाट सोडू नये. व्यापारी वर्गाने सरकारी कामात चुका टाळाव्यात. वैवाहिक जोडीदाराचा काही दिवस चालू असलेला वरचष्मा एकंदरीत आपल्याही फायद्याचा असेल.

शुभ दिनांक: २२, २३

महिलांसाठी : मोठे निर्णय दूरदृष्टीने घ्या.

डॉ. धुंडिराज पाठक
l

मीन

फार अपेक्षा नको

सप्ताहातील ग्रहस्थिती काही अंशी प्रतिकूलतेकडे झुकलेली आहे. कुणावरही थेट विश्वास ठेऊ नका. भावनेच्या भरात कुणाला मदत करायला जाल तर कदाचित ती उलटून येऊ शकते. आपली कामे आपल्याच स्वार्थासाठी, स्वत करावी हे उत्तम. व्यापारी वर्गानेही फार मोठी अपेक्षा न ठेवता चालू असलेल्या व्यवसायातूनच योग्य तो फायदा घेत पुढे जावे. कला, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना वेगळ्या चांगल्या संधी मिळू शकतात. वैवाहिक जोडीदाराचे आरोग्य आणि मातुल घराचे काही प्रश्न याकडे लक्ष द्यावे लागेल. स्वतच्या आरोग्याबाबत कोणतीही हयगय करू नका. मुलांची सकारात्मक वाटचाल मात्र आपल्याला आनंददायी ठरेल.

शुभ दिनांक : १७, २२.

महिलांसाठी : स्वतच्या निर्णयावर ठाम राहा.

डॉ. धुंडिराज पाठक