दिवाळी हे बदलत्या ऋतूचा उत्सव असतो. थंडीची चाहूल आता हळूहळू लागली आहे. फेस्टिव्हल सीझननंतर आता लगेच वेडिंग सीझन सुरू होईल. त्या दृष्टीनं तयारीलाही आता जोर आला असेल. बदलत्या ऋतूत त्वचा, केस यांच्या सौंदर्याच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यावी लागते. ओरिफ्लेम इंडियाच्या मेकअप अँड ब्युटी एक्स्पर्ट आकृती कोचर यांनी त्यासाठी दिलेल्या या टिप्स.
हिवाळ्याची चाहूल लागताच त्वचाही उत्तर देऊ लागते. ड्राय स्किन ही तर अनेकांसाठी समस्या ठरते. डिहायड्रेशनमुळेही ‘ड्राय स्किन’चा सामना करावा लागतो. शरारातील पाण्याच्या प्रमाणाचा योग्य तो समतोल राखून डिहायड्रेशनपासून वाचता येऊ शकतं. त्यासाठी आहारातील पाणी, फळे व भाज्यांचे सेवन जास्त करावं. तसंच या कोरडय़ा हवामानाच्या दिवसांत लाइट वेट समर जेल किंवा मॉइश्चराइझरचा वापर करण्याऐवजी त्वचेवर नरिशिंग मॉइश्चरायझर लावावं.
थंडीच्या दिवसांत चेहऱ्याच्या त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. थंडीच्या दिवसांत बाहेर पडताना सनस्क्रीन लावणं अजिबात विसरू नका. तसंच चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी टोनर व मॉईश्चराइझरचा वापर करावा. डोळ्यांभोवतीचा भाग तरतरित ठेवण्यासाठी आय क्रीमचा उपयोग करावा. मॉइश्चरायझर निवडताना ते नैसर्गिक सामग्रीचा वापर करून बनवलेलं आहे ना, ते बघा. कोरफड, कडूनिंब, टी ट्री हे नैसर्गिक घटक हिवाळ्यात बहुगुणी ठरतात.
होम मेड फेस पॅक
हिवाळ्याच्या दिवसांसाठी काही घरच्या घरी तयार करता येतील आणि वापरता येतील, असे फेसपॅक सुचवते. डिहायड्रेटेड स्किनसाठी ओट मिल (ओट्सचं पीठ ), अंडय़ाचा पिवळा भाग, मध यांचं मिश्रण करून ही पेस्ट मान आणि चेहऱ्यावर एकसारखी लावावीय पंधरा मिनिटं तशीच ठेवावी. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्यावा. तीन भाग कच्च्या दुधात एक भाग मध मिसळून हे मिश्रण पंधरा मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्यामुळे स्किन मॉइश्चराइझ व्हायला मदत होईल.
केसांची काळजी
थंडीच्या दिवसांत आणखी एका अडचणीला सर्व मैत्रिणींना तोंड द्यावं लागतं ते म्हणजे तुटणारे केस. थंडीच्या दिवसांत कोरडय़ा हवामानामुळे कोंडा जास्त होतो. केसांचा रूक्षपणा टाळण्यासाठी आणि केसांचा पोत सुधारण्यासाठी एक चांगला घरगुती उपाय आहे. केस धुण्याआधी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करावा. त्याआधी केसांना तेल लावणं आवश्यक आहे. केसांना पोषण देण्यासाठी कोमट तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करणं कधीही उत्तमच. कोरडय़ा केसांसाठी आठवडय़ातून दोनदा ‘व्हिटॅमिन ई’च्या तेलाचा वापर करावा. त्यामुळे केस नक्कीच मजबूत होतील. त्यांचा पोत सुधारेल. थंडीच्या मोसमात अशाच केस आणि त्वचेकडे थोडं जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. त्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो केल्यात तर सौंदर्य नक्कीच खुलून दिसेल. हॅव अ हॅपी अ‍ॅन्ड ब्युटीफूल विंटर!
viva.loksatta@gmail.com