भंडारा जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार असताना तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला हाताशी धरून ४५० एकर जमीन अकृषिक करुन कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर आणि तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी व सध्या गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत गेडाम यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा बुधवारी विधानसभेत करण्यात आली.
प्रदीप काळभोर यांच्याकडे केवळ नऊ दिवस भंडारा जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्याच काळात त्यांनी गेडाम यांना हाताशी धरून हा गैरव्यवहार केल्याबद्दल सुधाकर देशमुख, देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचा आग्रह सदस्यांनी धरला. मात्र या प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी सुरू असून अहवाल येताच संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. ही कारवाई लगेच करावी, ही मागणी करीत दोन्ही बाजूंचे सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. या गोंधळामुळे कामकाज तीनदा तहकूब करावे लागले.