आज तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांमध्ये ९४ जागांसाठी मतदान होत असून बारामती लोकसभा मतदारसंघ हा हायवोल्टेज मतदारसंघ ठरला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नणंद-भावजयीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. या जागेसाठी दोन्ही पक्षाकडून तुफान प्रचारसभा रंगल्या. एका बाजूला शरद पवार तर दुसऱ्या बाजूला अजित पवार अशी ही अलिखित लढत आहे. यावरून अजित पवारांनी शरद पवार गटातील नेत्यांवर टीका केली आहे. ते बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे ही जागा महत्त्वाची मानली जात आहे. तर, अजित पवार गटाने सुनेत्रा पवारांना संधी दिली आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रचारानिमित्त शरद पवारांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. लोकांशी संवाद साधला. परिणामी आचारसंहिता लागताच शरद पवारांची प्रकृती खालावली. याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, माझ्या मनात विचार आला की २००४ सालीही अशाच पद्धतीने शरद पवारांना गंभीर आजार झाला होता. साहेबांचा आम्ही निवडणूक उमेदवारीचा फॉर्म भरला आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन तातडीने करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता सेनापती निवडणुकीत नाहीय, सैन्यानं ही निवडणूक लढवायची आहे.
अन् आमच्या डोळ्यांत पाणी आलं
“तेव्हा आम्ही सर्व ‘निसर्ग’ला होतो. आर. आर पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटीलसह अनेक दिग्गज नेते होते. (साहेबांनी ऑपरेशनची माहिती दिल्याक्षणी) आमच्या डोळ्यांत पाणी आलं. आम्ही विचार केला की प्रचाराचा फॉर्म भरल्यानंतर तिथंच सभा होती. ती सभा झाल्या झाल्या आम्ही जबाबदारी उचलली आणि साहेबांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं”, असा जुना प्रसंग अजित पवारांनी सांगितला.
नेत्यांनी सांगायला हवं होतं की दगदग करू नका
ते पुढे म्हणाले, “आताच्या काळात सर्वांनी सांगायला पाहिजे होतं की अशा पद्धतीने दगदग करू नका. तुम्ही आराम करा. आम्ही निवडणुकीची जबाबदारी उचलू. जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया स्वतः आता जे साहेबांजवळ आहेत त्यांनी ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती.”
मी त्यांच्याबरोबर असतो तर…
“मी जर त्यांच्याबरोबर असतो तर मी सांगितलं असतं की, २००४ ला असाच प्रसंग आला, तेव्हा आम्ही ती जबाबदारी पार पाडली, तेव्हा बऱ्यापैकी जागा आपण निवडून आणल्या होत्या”, असंही अजित पवार म्हणाले.
“सुप्रिया आणि रोहित पवार साहेबांना सारखं बोलावतात. बाकी कोणाचं काही चालत नाही. मी आजही कुटुंबातील सदस्य आहे. परंतु, तेव्हा मी या सर्व गोष्टी पाहायचो. तेव्हा आर.आर पाटील, छगन भुजबळ मिळून सर्व गोष्टी ठरवायचो. कुटुंब म्हणून काम करायचो. आताच्या काळात एवढा त्रास होत होता, त्यांना बोलताना त्रास होत होता. त्यावेळी त्यांनी सांगायला हवं होतं. सुप्रियाही ५४ वर्षांची आहे. जयंत पाटील, अमोल कोल्हे, अनिल देशमुख यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी सांगायला हवं होतं”, असं अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळेंच्या शेवटच्या सभेत सर्व कुटुंब एकत्र आलं होतं. पण यात मला राजकीय महत्त्वांकांक्षा दिसत नाही. कारण, जो काम करतो त्यालाच जनता निवडून देत असते. कुटुंब-कुटुंब करता, पण माझं कुटुंब एवढं मोठं आहे की तीन परिवार सोडून (श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार आणि शरद पवार यांचे परिवार) प्रचारात कोणी नव्हतं. आमच्याकडूनही काही प्रचार करत होते. सुनेत्रा उमेदवार म्हणून बसली होती, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भाषण करत होतो”, असं अजित पवार म्हणाले.
८४ वर्षांचा योद्धा लढतोय, पण तुम्ही लढायला लावता
“याआधीही एवढ्या सभा झाल्या, आम्हीच स्टेजवर असायचो. आता परिस्थिती बदलली. आम्हालाही माणुसकी आहे, काळजी आहे. यांनी काय सांगायचं ८४ वर्षांचा योद्धा लढतोय, पण तुम्ही लढायला लावता. तुम्ही आराम करा, आम्हाला मार्गदर्शन करा, तब्येतीची काळजी घ्या. तिथं बसून सूचना द्या, असं सांगणं गरजेचं होतं. बाळासाहेब ठाकरे एकच सभा घ्यायचे. उद्धव ठाकरेही एकच सभा घेतात”, असं सांगत त्यांनी टीका केली.
“एकेकाळी पहाटे चार वाजेपर्यंत सभा चालायची. पुलोदच्या काळात पहाटेपर्यंत सभा चालायच्या. पण साहेब तेव्हा तरुण होते, उमेद होती, जिद्द होती. पण आता हे लोक स्वतःकरता साहेबांना करायला लावतात”, अशी टीकाही त्यांनी शरद पवार गटातील नेत्यांवर केली.