देशातील मच्छीमार संस्थांसाठी लागू करण्यात आलेल्या भरमसाट दरवाढीमध्ये कपात करण्याच्या दृष्टीने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांच्याशी चर्चा करणार आहेत.
औद्योगिक समूह किंवा महामंडळांप्रमाणेच देशातील मच्छीमार सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर सुमारे साडेबारा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या १७ जानेवारीपासून अमलात आलेल्या या दरवाढीमुळे मच्छीमारांचे अर्थशास्त्र पूर्णपणे विस्कटले आहे. ही दरवाढ परवडणारी नसल्यामुळे मच्छीमार संस्थांनी डिझेल उचलणे बंद केले असून कोकण किनारपट्टीवरील हा व्यवसाय जवळजवळ ठप्प झाला आहे.
मत्स्यव्यवसायाचा अंतर्भाव कृषी खात्यामध्ये असल्यामुळे कोकणासह, गोवे आणि मुंबईच्या मच्छीमार संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची गेल्या आठवडय़ात मुंबईत भेट घेऊन ही समस्या विस्ताराने मांडली. त्यावर अधिक चर्चेसाठी पवार यांनी या नेत्यांना आज दिल्लीत पाचारण केले होते. त्यानुसार कोकणासह केरळ, कर्नाटक, गोवे, गुजरात इत्यादी राज्यांमधील मच्छीमार संघटनांच्या नेत्यांनी आज सकाळी पवारांची दिल्लीत भेट घेऊन ही अन्याय्य दरवाढ मागे घेण्याबाबत सविस्तर चर्चा केली. कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारीही या प्रसंगी उपस्थित होते.
मच्छीमार नेत्यांकडून या समस्येची तपशीलवार माहिती घेतल्यानंतर पवार यांनी या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियममंत्री मोईली यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे या शिष्टमंडळातील नेते बशीरभाई मुर्तुझा आणि लतिफ महालदार यांनी दूरध्वनीवरून ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पवारांनी अशा प्रकारे घेतलेल्या पुढाकारामुळे हा प्रश्न येत्या काही दिवसांत सुटण्याची आशा निर्माण झाली असल्याचेही या नेत्यांनी नमूद केले.