राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये फिरून जलयुक्त शिवारची कामे पाहावीत! प्रत्यक्ष शेतात फिरणाऱ्यालाच विकासाची कामे दिसतील, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही त्याचे उत्तर कामाने देऊ. पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीनिमित्त कार्यकर्त्यांना विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याचा संदेश देण्यात आला. सरकारच्या कामांवर जनता खूश आहे.

आज कृषी विकासाचा राज्यातील दर तीन टक्के असून तीन वर्षांत तो लक्षणीय वाढणार आहे. जलयुक्त शिवार योजनेस जनतेचे सहकार्य मिळत आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती सरकारने यशस्वीरीत्या हाताळली. अनेक स्वयंसेवी संस्था त्यासाठी पुढे आल्या. भाजपच्या १२३ आमदारांनी आणि २३ खासदारांनी राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. लातूरजवळील मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी भाजपने २५ लाख रुपये दिले. अशोक कुकडे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय मंडळींनी तेथे ६ कोटी निधी जमविला, म्हणून सरकारनेही तेवढाच निधी दुष्काळ निवारणाच्या कामासाठी दिला. जिल्ह्य़ातील ६५ नद्यांचे खोलीकरण-रुंदीकरण स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्यात येत आहे.

भोकरदन तालुक्यातील सोना नदीच्या खोलीकरण-रुंदीकरणासाठी ९ पोकलेन आणि ५० ट्रॅक्टर काम करीत आहेत. त्यामुळे या परिसराचे चित्र बदलणार आहे.

ऑल इंडिया फुड ग्रेन असोसिएशन, तसेच शायना एन. सी. यांची स्वयंसेवी संस्था यांनी प्रत्येकी १० नद्या खोलीकरण-रुंदीकरणासाठी घेतल्या आहेत. जलयुक्त शिवाराच्या संदर्भात सहकार तसेच स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मोठे काम राज्यात झाल्याचे दानवे म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार; प्रतिक्रिया टाळली मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला असता त्याबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचे दानवे यांनी टाळले.