नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरात निर्माण झालेला वाद पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर मिटला आहे.

रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप तटकरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे आग्रही होते. मात्र संदीप यांना डावलून सुनील तटकरे यांनी आपले व्याही संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. यामुळे कुटुंबातील वाद विकोपाला गेला होता. संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे दोघंही संदीप यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. मात्र निवडणुकीत संतोष पोटफोडे सहा मतांनी विजयी झाले होते. निकालानंतर अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे या दोन्ही आमदारांनी पक्षाच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहणे पसंत केले होते.

संदीपपाठोपाठ आमदार अवधूत हेदेखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. हा वाद जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीचा ठरला असता. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही भावांमध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला.

बारामती येथे सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी बोलावून चर्चा घडवून आणली. या वेळी अवधूत तटकरे, संदीप तटकरे, अनिकेत तटकरे आणि आदिती तटकरे हेदेखील उपस्थित होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे मनोमिलन पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

पवारसाहेबांनी दोघांनाही एकत्र काम करण्याचे निर्देश दिले आहेत. आमचे कौटुंबिक मतभेद आता मिटले आहेत. त्याप्रमाणे पक्षवाढीसाठी एकत्रित काम करू.

सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी.