शिवसेना आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत कलह विकोपास गेला आहे. त्यातूनच विधीमंडळात पक्षाची भूमिका ठरविताना विश्वासीत घेतले जात नसल्याचा आरोप करीत ग्रामीण भागातील आमदारांनी पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांच्या मानमानी काराभाराबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत शहरी आणि ग्रामीण आमदरांमध्ये उडालेली चकमक सध्या नागपूरात चर्चेचा विषय ठरली आहे.
शिवसेनेत सध्या गटनेता म्हणून सुभाष देसाई आणि प्रतोद म्हणून बबनराव घोलप काम पाहत आहेत. या पक्षातील २९ आमदार नवीन असून त्यातही ग्रामीण भागातील आमदारांची संख्या अधिक आहे. मात्र पक्षात केवळ मुंबईतील मुठभर आमदारांचाच वरचष्मा असून त्यांच्याच मनमानीप्रमाणे सगळा कारभार चालल्याची नाराजी काही सेना आमदारांनी व्यक्त  करीत आहेत. शुक्रवारी शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान काही आमदारांनी राज्य सरकारने काढलेल्या सिंचनावरील श्वेतपत्रिकेची होळी केली. त्यावरून पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. आम्हाला न विचारता अशी आंदोलने कशी करता, अशी विचारणा ज्येष्ठ नेत्यांनी केली. त्यावर मुंबईतील मूठभर आमदारांच्याच मनाप्रमाणे आम्ही वागायचे काय, असा सवाल करीत अन्य आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे कळते. राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव असो, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्याची भेट असो वा विधिमंडळात कोणत्याही मुद्यावर पक्षाची भूमिका ठरविण्याची वेळ असो, आम्हाला न विचारताच तुम्ही भूमिका ठरवता, आम्हाला साधी कल्पनाही दिली जात नाही, प्रसार माध्यमातून पक्षाची भूमिका कळते हे योग्य आहे का, अशा सवालांची सरबत्ती करीत या आमदारांनी मनातील असंतोषाला वाट करून दिली. त्यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी मात्र झाले गेले विसरून जा असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. शिवसेनेतील पक्षांतर्गत कलहाचे प्रत्यंतर विधिमंडळातही दिसून येत असून गेल्या आठवडय़ात अविश्वास प्रस्तावावर एकदा हसे झाल्यानंतरही सरकार विरोधात पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा हट्ट सेनेने धरला आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव आणण्याची भूमिका भाजपाला घ्यावी लागल्याचे एका भाजपा नेत्यानेही खाजगीत सांगितले.