‘पाणी नाकातोंडाशी आल्याशिवाय तुझ्याकडून काहीच घडू शकत नाही ना!’

नाही.. नाही. तुम्ही काळजी करू नका; हे स्वगत चालू आहे. माझं माझ्याशीच. कारण आजही रविवार संध्याकाळ उलटून गेली आहे. उद्या, म्हणजे सोमवारी मला नवीन लेख लिहून द्यावा लागतो ‘लोकप्रभा’साठी. पहिल्या लेखापासून मी ठरवत आले आहे की, पुढचा लेख शुक्रवापर्यंत द्यायचाच. पण नाहीच! रविवार रात्री मी जागी होते आणि जागून लेख लिहायचाय या कल्पनेने मला लगेच झोपही आली. लहानपणापासून असंच चालत आलंय. म्हणजे अख्खं वर्ष अभ्यासाचं प्लॅनिंग करण्यातच जातं आणि ते प्लॅनिंग अमलात आणण्यासाठी फक्त परीक्षेच्या आदली रात्र उरते. त्या वेळीसुद्धा नेहमीपेक्षा जास्तच झोप यायची ‘त्या’ रात्री. म्हणजे वर्षभर रात्री टीव्हीवर लागलेला सिनेमा बघण्यासाठी, नातेवाईक आले तर रात्रीच्या जेवणानंतर धमाल करण्यासाठी, एखादं सिलॅबसबाहेरचं पुस्तक वाचण्यासाठी, नाहीच तर गाणी ऐकण्यासाठी दोन-दोन तीन-तीन वाजेपर्यंत जागणाऱ्या माझे परीक्षेच्या आदल्या दिवशी मात्र रात्री अकरा वाजताच डोळे मिटायला लागायचे. मग स्वत:लाच सहानुभूती द्यायला लागायचे. जणू काही जागरण करण्याची सवयच नाहीये मला. हां.. पण झोपले नाही हां त्या वेळी मी कधी!

मला आठवतंय; त्या वेळी परीक्षेत मार्क मिळवण्याच्या टार्गेटने मी जागायचे. मग डोळ्यांवर पाणी मारत, कॉफी घेत, कधी बिस्किट, कधी मॅगी तर कधी चिप्स अशी स्वत:ची कौतुकं करत रात्र अभ्यासात कशी छान निघून जायची कळायचंच नाही. मग पेपर झाल्यावर रात्री जागणं सत्कारणी लागल्याचं समाधान आणि थोडीफार, ‘चार दिवस आधी सुरुवात केली असती तर आणखी छान झालं असतं’ अशी समजूत काढत घरी परतायचे. ‘नेव्हर माइंड, पुढच्या वेळी नक्की’ असा दिलासाही द्यायचे. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तेच झालंय आजसुद्धा. पण आज मात्र ‘उद्या सकाळी उठून लिहिशील गं. आता आपल्याला दिवसभर कामही करायचं असतं की नाही. त्यात रविवार आला म्हणजे नाटकाचा प्रयोगही असतो. दमायला होतंच ना!’ असं म्हणत सकाळी लवकर उठायचं असं ठरवून स्वत:ला निद्रेच्या स्वाधीन करून टाकलं मी.

सकाळी जाग येण्याच्या दोन मिनिटं आधी माझ्या डोक्यात एक विषय आला. मी जागी झाले तेव्हा काही केल्या तो आठवेना. असं होतं ना आपलं कधी तरी. काही तरी करायचं असलं की सतत बॅक ऑफ द माइंड ते चालू राहतं. तसं झालं असावं त्या क्षणी. मी बसून राहिले. शेवटी आज झोपेत डोक्यात आलेला पिगी बँक हा शब्द आठवला. मग मात्र यावरून काय लिहायचं हा विचार सुरू झाला. लहानपणी आई-बाबा पॉकेट मनी द्यायचे. त्या वेळी त्या तुटपुंजा पैशांमधलेही पैसे वाचवून साठवण्याची सवय लावली होती या पिगी बँकने. हा साठवलेला पॉकेट मनी पिगी बँकमध्ये खळखळ वाजायला लागला की काय श्रीमंत वाटायचं! कारण त्या वेळच्या आवाज करणाऱ्या पैशालाही केवढी तरी किंमत होती. एक रुपयात किसमिसची चार चॉकलेट्स मिळायची. शाळेतून येताना किंवा संध्याकाळी सोसायटीत खेळताना चार किसमिसची चॉकलेट आठ जणांमध्ये वाटून खायचो. एक रुपयात खूप सारा आनंद विकत घ्यायचो, हसायचो आणि मजा करायचो. आज जसे चार आणे (२५ पैसे) आणि आठ आणे (५० पैसे) कालबाह्य़ झाले तसे माझ्या लहानपणी पाच पैसे, दहा पैसे आणि वीस पैसे एक दिवस कालबाह्य़ झाले होते. पण भातुकलीच्या खेळात या पैशांनी खूप स्वप्नं विकत आणायचो त्या वेळी आम्ही. मी तर रमूनच गेले होते या आठवणींमध्ये. लेख वगैरे लिहायचाय हे पूर्ण विसरून बरं का! पण काहीही म्हणा, बालपण कमाल होतं माझं!

असो.. आता सकाळचा नाश्ता करायला टेबलावर येऊन बसलेय. माझ्यासमोर इडलीची प्लेट होती. मी बघत राहिले त्या इडलीकडे आणि पुन्हा एकदा तंद्री लागली. लहानपणच्या काही आवडीनिवडी आयुष्यभर साथ करतात हे खरं! आई-बाबा हॉटेलमध्ये घेऊन गेले ना की माझं कायम इडली-सांबार आणि माझ्या बहिणीचं मसाला डोसा हे ठरलेलंच होतं. कित्येक र्वष डोंबिवलीमधल्या रामकृष्ण हॉटेलमधल्या आवडत्या चवीसाठी आम्ही तिथेच जायचो. काही काळाने तर वेटर्सही ओळखायला लागले होते. ऑर्डर घ्यायला आले की दोन पदार्थ आधीच लिहून टाकायचे ते. काय मज्जा वाटायची तेव्हा. मैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये जायच्या वयात आल्यावर एक-दोनदा आग्रहाने त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले होते त्यांना. आणि त्यांच्यासमोर वेटरला असं म्हणाले होते, ‘अंकल, मेरा ऑर्डर तो आपको पता है, इन लोगों का लिख लो.’ कारण तो वेटर मला ओळखतो अशी स्टाइल मारायची होती ना मला मैत्रिणींसमोर. ते आठवून पटकन हसूच आलं मला आणि तंद्री सुटली. त्या वेळच्या इडलीची चव आताच्या टेबलावरच्या इडलीत शोधायला लागले मी. पुन्हा लेखाची आठवण झाली आणि आवडणारी इडली निराश होत पटकन संपवून तिथून उठले मी.

माझ्या घरात एका खिडकीजवळ एक बिन बॅग ठेवली आहे आणि माझं असं मानणं आहे की, तिथे बसून मला सुचतं. म्हणून आता मी तिथेच जाऊन बसले. म्हटलं बघू आता तरी सुचतंय का. त्या खिडकीमधून एक सोनमोहराचं झाड दिसतं. तेही इतक्या जवळ आहे की हात बाहेर काढला तर त्याच्या फुलांना स्पर्श करता येईल. या झाडावर दिवसभर वेगवेगळे पक्षी येऊन बसतात. सगळे स्वत:च्या विश्वात छान रमलेले असतात. खारुताई या फांदीवरून त्या फांदीवर पळत असतात. ‘लोकप्रभा’मधून फोन आला होता ना तेव्हाच दोन-चार विषय डोक्यात ठरवले होते. या निसर्गाबद्दल आणि या पक्ष्यांबद्दल लिहायचं निश्चित केलं होतं मी. हे आठवून त्या झाडाकडे पाहिलं तर दोन खारुताई, एक पोपट आणि जरा वरच्या फांदीवर तीन कावळे दिसले. नेहमी स्वत:मध्येच रमलेले हे पक्षी आता माझ्याकडे रागाने बघताहेत असं वाटून गेलं मला एकदम. कावळ्याची ‘काव काव’ जणू त्या क्षणाला त्याची भाषा कळतेय अशी वाटत होती. तो माझ्यावर चिडून असं म्हणत होता, ‘‘अजून किती काळ तू आमच्यावर लेख लिहिशील या आशेवर असंच झाडावर बसून राहायचंय आम्ही?’’ उगाचच ओशाळले मी. निसर्गही कधीतरी गिल्ट देऊ शकतो नाही का आपल्याला. माझ्या डोंबिवलीच्या घराच्या खिडकीतून पारिजातक दिसायचा. लहानपणी रोज सकाळी त्याची फुलं जणू बोलवायची मला ‘ये आणि आम्हाला वेच’ असं म्हणत. एखाद्या दिवशी जर मी कंटाळा केलाच तर दिवसभर त्या झाडाकडे बघताना असं वाटत राहायचं की त्याच्या फांद्या आज चिडल्या आहेत, म्हणूनच वाऱ्यालाही न जुमानता पान नि पान स्तब्ध आहेत. मग दुसऱ्या दिवशी सगळं सोडून फुलं वेचायला पळायचे मी. माझ्या ‘पॅन केक’ नावाच्या पहिल्या लेखात उल्लेख केला होता ना तशी त्या सुगंधात रमून जायचे. आता या आठवणीत रमले आहे तशी..

‘‘अगं मुली, आजच्या दिवसात लेख पूर्ण करणार आहेस का तू?’’ असं स्वत:ला ठणकावलं मी आणि नवीन काही विषय शोधण्यासाठी झाडावरून मान वळवली. तर बेडरूमच्या एका शेल्फवर मित्रमैत्रिणींनी दिलेले टेडीबिअर्स दिसले. माझा ना एक प्रॉब्लेम आहे. मला वाढदिवस अजिबात लक्षात राहत नाहीत. दरवर्षी कुणीतरी आदल्या दिवशी फोन करून आठवण करतं, ‘उद्या अमुक एकाचा बर्थडे आहे. आठवणीने विश कर.’ आणि त्या ‘अमुक एका’लाही मला लक्षात नव्हतं हे विश करताना माहीत असतं. कारण तमुक एकाच्या बर्थडेची या अमुक एकानेच आठवण केलेली असते पूर्वी. तर मुद्दा असा, हे जे टेडीज आहेत ते सात आहेत. त्या प्रत्येकाच्या गळ्यात एक चिठ्ठी आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या एका बर्थडेला माझ्या मित्रमैत्रिणींनी मला हे गिफ्ट केले. ‘आपण आठ जण आहोत. मग तुम्ही सातच टेडी का दिले?’ असं मी विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं, ‘अगं त्या प्रत्येकावरच्या चिठ्ठीमध्ये आमच्यापैकी एकाचं नाव आणि आमच्या बर्थडेट्स लिहिल्या आहेत. आता हे टेडीज तुला आमचे बर्थडे लक्षात ठेवायला मदत करतील. म्हणून ते सात आहेत.’ सात या आकडय़ावरून आठवलं, असं म्हणतात मित्रमैत्रिणींबरोबरच नातं सात र्वष टिकलं तर पुढे आयुष्यभर टिकतं. पण हो, ते नातं टिकवण्यासाठी आठ जणांचे आठ स्वभाव गुणदोषांसकट स्वीकारलेत आम्ही. त्याचंच माझ्याबाबतीतलं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या शेल्फवरचे हे टेडीज. आज आमच्या मैत्रीला तेरा र्वष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता बाकी आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या पाचवीला पुजलोय हे निश्चित!

तर अशा प्रकारे या झोपेत सुचलेल्या ‘पिगी बँक’ या विषयाचा शोध घेत घेत मी खूप सारे जुने-जुने कोपरे फिरून आले. आता लक्षात येतंय की, साठवण छान झालीये. माझी आठवणींची पिगी बँक या लेखाच्या निमित्ताने वाजवून पाहिली मी. लेखाचं माहीत नाही, पण या छान भरगच्च आठवणींच्या खळखळाटाने मला लहानपणीसारखंच श्रीमंत वाटून गेलंय.
तेजश्री प्रधान – response.lokprabha@expressindia.com