बॉलिवूडची ‘बेबी डॉल’, अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी एक मुलगी दत्तक घेऊन तिचं पालकत्त्व स्वीकारलं. सध्या सनी बहुतांश वेळ आपल्या मुलीसोबत घालवतेय. निशा कौर वेबर असं सनीच्या मुलीचं नाव असून तिच्यासाठी सनी जोरदार शॉपिंग करत असल्याची माहिती मिळतेय.

‘नवभारत टाईम्स’च्या माहितीनुसार, सनीने आपल्या मुलीसाठी खूप सारे कपडे विकत घेतले असून सनीच्या वॉर्डरोबपेक्षा तिच्या मुलीचाच वॉर्डरोब कपड्यांनी भरलाय. कपड्यांसोबत निशासाठी चप्पल आणि खेळणीही विकत घेतली आहेत. फार कमी वेळातच निशा आणि सनीमध्ये चांगली बॉडिंग झाल्याचे म्हटले जातेय. सनीसुद्धा तिला आपला पूर्ण वेळ देत असून केवळ महत्त्वाच्या कामांसाठीच ती घराबाहेर पडतेय. सनी नसताना डॅनिअल निशाची काळजी घेतो. निशासाठी काही पुस्तके आणि म्युझिकल बुक्सदेखील सनीने घेतली आहेत.

VIDEO : मोरोक्कोमध्ये कतरिनाचा ‘वॉटर स्टंट’

सनी आणि डॅनिअल मुलीला दत्तक घेण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून लातूरच्या एका अनाथाश्रमाच्या संपर्कात होते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी खूप धावपळ करावी लागली, असे डॅनिअलने सांगितले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सनी आणि डॅनिअलला शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमध्ये एकीकडे टेस्टट्युब बेबी आणि सरोगसीचं प्रस्थ वाढत असताना सनीचा मुलीला दत्तक घेण्याचा हा निर्णय प्रशंसनीय ठरत आहे.