बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान खानला त्याच्या लग्नाविषयी अनेकदा प्रश्न विचारले गेले आहेत. सलमान लग्न कधी करणार, कोणासोबत करणार, कोणत्या पद्धतीने करणार यांसारखे असंख्य प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात उद्भवतात. लग्नाबद्दल त्याचे मत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच सलमानने एका मुलाखतीत याविषयी आपले मत मांडले. मात्र हे मत कदाचित त्याच्या चाहत्यांना निराश करू शकेल.

‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर सलमान विविध कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये उपस्थित होता. अशाच एका मुलाखतीत सलमानने लग्न आणि प्रेमाबद्दल मोकळेपणाने आपली मतं मांडली. ‘लग्नाबद्दल कोणी मला विचारत असल्यास मी त्यांना लग्नावर माझा विश्वास नसल्याचे सांगतो. माझ्या मते लग्न म्हणजे पैसे वाया घालवणे,’ असं सलमान यावेळी म्हणाला. त्याचप्रमाणे या मुलाखतीत प्रेमावरही विश्वास नसल्याचे सलमान म्हणाला. तो म्हणाला की, ‘मी प्रेमावर विश्वास नाही ठेवत. मला या शब्दाच्या अस्तित्वाचे कारणच समजत नाही. गरज हाच खरा शब्द त्यासाठी आहे. कोणाची गरज जास्त आहे यावर सगळे अवलंबून आहे. एखाद्या वेळी तिला तुमची खूप गरज असते मात्र तुम्हाला ती गरजेची वाटत नाही. त्याचप्रकारे तुम्हाला ज्या मुलीची खूप गरज वाटत असेल तेव्हा तिला तुम्ही नको असाल. त्यामुळे गरज हा शब्द महत्त्वाचा आहे.’

PHOTO : असा असेल ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिनाचा लूक?

51 वर्षांचा सुपरस्टार सलमानला त्याच्या बदलत्या स्वभावाबद्दलही प्रश्न विचारला गेला. त्याचे उत्तर देताना तो म्हणाला की, ‘मी जसा आधी होतो, आताही तसाच आहे. आजही मी रिक्षामध्ये बसतो, हिंडतो, फिरतो, सायकल चालवतो. एक असा काळ होता जेव्हा मी नकारात्मक आणि निराशावादी झालो होतो. मात्र याबद्दल बोलणे मला कधीच योग्य वाटले नाही. नंतर वेळेनुसार गोष्टी बदलत गेल्या आणि परिस्थिती आणखी चांगली झाली.’

वाचा : दुसऱ्या दिवशीही ‘ट्युबलाइट’चा प्रकाश मंदच 

लग्नाबद्दलचे सलमानचे मत जाणून त्याचे चाहते मात्र नक्कीच निराश झाले असतील. लग्नावरून सलमानचा विश्वास का उडाला याचे उत्तर स्वत: सलमानच देऊ शकेल. याआधी सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. सध्या रोमानियन ब्युटी लूलिया वंतूर सलमानची कथित प्रेयसी असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. शिवाय सलमानच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या जवळपास सर्वच कार्यक्रमांना लूलिया आवर्जुन हजेरी लावते.