डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

चौथी पाचवीतील मुले ‘पॉर्न’ बघतात हे बालसेनेच्या मुलांनीच निदर्शनास आणून दिले. गेल्या वर्षभरात एकूणच वाढती नेट व्यसनाधीनता व त्यातही ‘पॉर्न’ बघण्याच्या व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ८ वी-९ वीतल्या मुलांनी/ मुलींनी तिसरी ते पाचवीमधील मुला-मुलींना माझा ‘मित्र’/ ‘मत्रीण’ होशील का? असे विचारणे, त्यासाठी जबरदस्ती करणे याचे रिपोर्टस् वाढू लागले. आणि हे वेगाने वाढते आहे..

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
Investment opportunities in FMCG
बदलत्या बाजाराचे लाभार्थी; ‘एफएमसीजी’मधील गुंतवणूक संधी
rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार

लहान मुलांमधील सध्याची वाढती समस्या म्हणून इंटरनेटच्या आकर्षणाकडे बोट दाखवता येईल. तासन्तास संगणक अथवा स्मार्टफोनवर गेम्स खेळणे अथवा माहिती मिळवणे यापासून सुरू झालेले वेड हे आज लैंगिक चित्रपट, चित्रफिती पाहण्याच्या अतिवेडाकडे, ‘पॉर्नअ‍ॅडिक्शन’मध्ये परावर्तित होताना दिसून येते आहे. त्याचे दुष्परिणामही भयावह रूप घेताना दिसत आहेत. मागच्याच महिन्यात ‘पॉर्न’ पाहण्यास अवरोध केला म्हणून पालकांवर मुलाने खुनी हल्ला केल्याची बातमी वाचनात आली. तर या व्यसनाच्या परिणामस्वरूप स्वत:च्या आईला नको तिथे हात लावू पाहणाऱ्या मुलाची केस माझ्याकडे होती. हे नेमके का होते, कसे होते, याचा थोडा अभ्यास केला. त्यातून पुढे आलेल्या गोष्टी या एक-दोन लेखांत मांडण्याचा प्रयत्न आहे.

‘पॉर्न-अ‍ॅडिक्शन’ची संभाव्य कारणे म्हणून सहज उपलब्धता, लैंगिकतेबद्दल संभ्रम, असुरक्षितता, कदाचित अशा मुलांवर लहान वयात लैंगिक शोषण झाल्याचा परिणाम, पालकांचे दुर्लक्ष, पालकांद्वारे शारीरिक, शाब्दिक, भावनिक शोषण, भावनिक सुरक्षिततेची गरज आणि मायेची भूक, ही सांगता येतील.

ज्ञानदेवी/पुणे चाइल्डलाइन शाळा-शाळांमधून बालसेना नामक (पिअर सपोर्ट) आणि मुलांच्या सबलीकरणाचा उपक्रम राबविते. मुलांचे नेते निवडून त्यांच्या माध्यमातून मुलांचे प्रश्न सखोलपणे समजून घेण्याचा हेतूही यातून साध्य झाला आहे. ४ थी-५ वीतील मुले ‘पॉर्न’ बघतात हे बालसेनेच्या मुलांनीच प्रथम निदर्शनास आणून दिले. गेल्या वर्षभरात एकूणच वाढती नेट व्यसनाधीनता व त्यातही ‘पॉर्न’ बघण्याच्या व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या तक्रारी वाढू लागल्या. ८ वी-९ वीतल्या मुलांनी/ मुलींनी तिसरी ते पाचवीमधील मुला-मुलींना माझा ‘मित्र’/ ‘मत्रीण’ होशील का? असे विचारणे, त्यासाठी जबरदस्ती करणे याच्या तक्रारी वाढू लागल्या. प्रत्येक शाळेत यासाठी कोडवर्ड्स आहेत. आणि हे फार वेगाने वाढते आहे. पूर्वी हॉस्टेलपुरता मर्यादित असणारा हा आजार नियमित शाळांमध्येही पसरताना दिसून येत आहे. नकार पचत नाही. त्यासाठी ‘दादागिरी’ होते. त्याचे काही भीषण परिणामही दिसू लागले आहेत. छोटय़ा मुलांचे कोशात जाणे, वर्तणुकीच्या तक्रारी, इत्यादी. हे सर्व का व कसे होते आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता लक्षात येते की, कधी स्टेटस सिम्बॉल म्हणून, तर कधी मुलांचे लाड पुरवायची पद्धत म्हणून, तर कधी मुलांना वेळ देता येत नाही तर कशात तरी गुंतवून ठेवायचे म्हणून स्मार्टफोन, टॅब्स् अशा वस्तू त्यांना दिल्या जातात. मुले काय बघतात यावर नियंत्रण ठेवणे अवघड आहे, पण अशक्य नाही. नेट हे नक्कीच ज्ञानाचा मोठा स्रोत आहे. दुर्दैवाने चांगली माहिती मिळवतानासुद्धा मध्ये-मध्ये जाहिरातस्वरूपात ‘पॉप-अप्स’ येतात. ज्याचे कुतूहल वाटावे व अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न स्वाभाविक व्हावा अशी रचना असते. उदाहरणार्थ, मी स्वत: एकदा कोणी तरी फेसबुकवरून झाशीच्या राणीबाबत उपलब्ध नवी माहिती देणारी पाठवलेली लिंक उघडली असता मध्ये-मध्ये व्हाएग्रा संबंधाने खूप विचित्र चित्रे येत होती. अशा लिंक्सवर एकदा क्लिक केले की अधिकाधिक विकृत, अर्धवट वयाच्या मुलांनी निदान बघू नयेत अशा लिंक्स येत राहतात. उत्तेजित करणारी चित्रे व माहिती यात असते.

एकूणच यू-टय़ूब असो, गुगल अथवा कोणतेही असे माध्यम, हा माहितीचा न संपणारा खजिना असतो. साधे एखाद्या पाककृतीची माहिती घ्यायला गेले तरी शेकडो तशा क्लिप्स मिळतात व ते बघण्याचा मोह अनावर होतो. मजा अशी की, आपण शोधत असलेल्या माहितीच्या यादीत दुसरी एखादी कुतूहल चाळवणारी लिंक येते, जी उघडायचा मोह आवरत नाही. हे सतत असे बघायचे वेड का लागते तर असे सांगितले जाते की, डोपोमाईन या रसायनाचा अशा वेळेला शरीरात प्रादुर्भाव होतो व तो एक आनंदाची अनुभूती देऊन जातो. मग हा चक्रव्यूह भेदणे अवघड होऊन बसते. हे इथेच थांबत नाही तर उपयुक्त व मुलांनी कदाचित शालेय प्रकल्पांसाठी म्हणून उघडलेल्या लिंक्समध्येच पोर्नोग्राफिक क्लिप्स येतात. ज्यात त्या वयातच काय, पण मोठय़ांनाही कुतूहल वाटावे अशी चित्रे व शीर्षके/ मथळे असतात. प्रत्यक्षात त्या क्लिप्समध्ये असे काही असतेच असे नाही, पण एकदा उघडले की खरोखरच पोर्नोग्राफिक असलेल्या लिंक्सची यादी देते. हा खरा धोका. या ट्रॅपमधून सुटणे पौगंडावस्थेतील मुलांना तर फारच अवघड. शरीरावर व मनावर होणारे परिणाम हे भीषण असतात. त्याचा परिपाक म्हणून जे पाहिले त्याचा प्रयोग इतर मुलांवर करणे, नैराश्यात जाणे अथवा शोषण करणाऱ्याला बळी पडणे हा होताना ‘चाइल्डलाइन’मध्ये आम्ही नित्य पाहतो.

एका उच्चशिक्षित घरातील ६ ते ७ वर्षांच्या मुलाने शेजारच्या दीड वर्षांच्या बाळाच्या तोंडात स्वत:चे लिंग दिलेले आईने पाहिले व प्रचंड घाबरून मानसोपचारतज्ज्ञाची मदत मागितली. ओघाने ती केस ‘चाइल्डलाइन’कडे आली व अनुभवावरून आमची पहिली प्रतिक्रिया झाली ती ही की, हा मुलगा गुन्हेगार नसून स्वत:च पीडित असला पाहिजे. चौकशीअंती आमचा होरा अगदी योग्य असल्याचे निष्पन्न झाले. शेजारच्या दादाने मला असे केले. हा खेळ होता म्हणून मीपण केला, असे त्याने निरागसपणे सांगितले. आता रागाचा रोख शेजारच्या १४ वर्षांच्या दादाकडे वळला, पण तोही पीडितच होता. कारण त्याच्यावर आणखी मोठय़ा मुलाने ‘पॉर्न’ पाहून हाच प्रयोग केला होता.

एका घरगुती पाळणाघरात जाणाऱ्या मुलीचे वर्तन बदलले, ती काही तरी वयाच्या विपरीत चाळे करते म्हणून तिला आमच्याकडे आणण्यात आले. चौकशीअंती कळले की, पाळणाघरातल्या बाईची पौगंडावस्थेतील मुलगा व मुलगी नेटवर व स्मार्टफोनवर ‘पॉर्न’ बघत व पाळणाघरातल्या मुलांवर त्याचे प्रयोग करत असत. तसेच त्या मुलांनाही जबरदस्तीने या चित्रफिती बघायला लावत असत व कुणाला हे सर्व सांगितले तर मारून टाकू वगैरे धमक्या देत असत. या सर्वामुळे ही मुलगी एकदम कोशात गेली होती व अन्य लक्षणेही दिसत होती.

सायबरतज्ज्ञ अथवा पोलीस यावर फारसे सकारात्मक उपाय सांगू शकत नाहीत. मध्यंतरी काही साइट्स बंद करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याच्यावर इतकी उलटसुलट चर्चा झाली की त्या निर्णयाने पुन्हा डोके वर काढलेच नाही. त्यामुळे मुलांनाच काय पाहायचे, काय पाहायचे नाही, जे पाहायचे नाही ते का पाहायचे नाही हे पटवून देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, हा एकच उपाय होऊ शकतो. असे काही पाहिल्यास शरीर व मनावर होणाऱ्या उत्तेजनात्मक परिणामांना कसे तोंड द्यायचे याबाबत बालक-पालकांमध्ये मोकळेपणाने केलेला संवाद खूपच जरुरीचा आहे. मुली एकमेकींच्यात बरेच बोलतात. आई, मावशी अशांशीही बोलतात, पण बाप-लेकांत अशी मोकळी चर्चा होत नाही असा अनुभव आहे. याला हेही एक कारण आहे की, लहानपणापासून बाबांचा वापर धाक दाखवण्यासाठी झाल्यामुळे ज्या वयात फक्त बाबांशीच बोलता येईल अशा गोष्टींबाबत बोलण्यासाठी लागणारे नातेच नसते. मग आणखी नेट किंवा चुकीचे सल्लागार यांच्याकडून सल्ले घेतले जातात. परिणामस्वरूप लालबत्ती विभागात जाऊन उत्तरे शोधली जातात व त्याचेही व्यसन लागले की घाबरलेली मुले ‘चाइल्डलाइन’ची मदत मागतात तीही व्यसन सोडण्यासाठी नव्हे तर एचआयव्हीच्या भीतीने.

नेट आणि ‘पॉर्न’ अ‍ॅडिक्शनच्या परिणामस्वरूप, तज्ज्ञांच्या मते, आकलनशक्ती कमी होते, नराश्य येते, अभ्यासात अधोगती होते. अपराधीभाव- त्यामुळे येणारी अस्वस्थता, मित्रपरिवार सोडणे, खोटे बोलणे, याबरोबरच थकवा, डोळ्यांखाली काळे/ सूज/ लाल डोळे अशी शारीरिक लक्षणेही दिसू लागतात. दारू किंवा मादक पदार्थाच्या सेवनाने होतात तसे मेंदूवर दुष्परिणाम होतात आणि नेट वापरावर मर्यादा आणल्यास भावनिक समस्या-अस्वस्थता, नराश्य, चिडचिड होते. पण नेट व्यसनी मात्र ‘मला काहीच समस्या नाही’ असे म्हणत सतत समस्या नाकारत राहतात.

या सगळ्याचा मी स्वत: या साइट्स, लिंक्स कशा उघडल्या जातात, त्याचा नाद कसा लागू शकतो याचा अभ्यास केला. त्यावरून समाजाला सांगावेसे वाटते की, आंतरजाल हे खरेच कोळ्याचे जाळे आहे. आपले लेकरू कीटक होऊन बळी जात नाही ना, याची काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे. तेव्हा तुम्ही जातीने त्याकडे लक्ष द्या.

anuradha1054@gmail.com

chaturang@expressindia.com