25 October 2020

News Flash

काळ्या पुठ्ठय़ाच्या बांधणीत, सोनेरी अक्षरांत..

थॅलिडोमाइड हे मुळात जर्मन कंपनीचं औषध. जन्माला आलं ते बधिरता देण्यासाठी.

(संग्रहित छायाचित्र)

 

गिरीश कुबेर

छापील माध्यमांच्या ताकदीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या बातमीदारीनं सिद्ध केलं की, एका महत्त्वाच्या औषधाच्या पुरेशा चाचण्याच झालेल्या नाहीत. ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांना यात काही आश्चर्य वाटणार नाही. पण त्यांना सांगायला हवं की, औषध बनवणारी कंपनी बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्राची जाहिरातदार होती..

पदव्युत्तर अभ्यासक्रमांची एक अट असते. ती म्हणजे त्यात प्रवेशासाठी पदवी घ्यावी लागते. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पदव्युत्तर होता. त्यामुळे पदवी घ्यावी लागली. या काळात आवडतं काय आणि आपण करतो काय, हा साधारण ९९.९९ टक्के मुलांना भेडसावणारा प्रश्न समोर लटकत असायचा सतत. पण त्या नावडतीच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष जाऊ नये म्हणून आवडतीचं खूप वाचत होतो. त्यामुळे पदवीच्या काळ्या पाण्याचा अजिबात त्रास झाला नाही. या काळ्या पाण्याच्या डबक्यातून बाहेर पडणं आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विशाल प्रवाहात डुंबणं सुरू होणं या मधल्या अत्यंत क्रियाशील भावनिक/वैचारिक गर्भावस्थेत हॅरॉल्ड इव्हान्स यांची ओळख झाली.

ती करून देणारा मध्यस्थ अर्थातच गोविंदराव तळवलकर. त्यांनी एका रविवारी इव्हान्स यांच्या ‘गुड टाइम्स, बॅड टाइम्स’ या पुस्तकाचं सविस्तर रसग्रहण केलं होतं. लवकरच ब्रिटिश कौन्सिल वाचनालयाचं सदस्यत्व मिळालं आणि त्यावेळी नावावर घेतलं गेलेलं ते पहिलं पुस्तक होतं. काळ्या पुठ्ठय़ाच्या बांधणीत सोनेरी अक्षरांत पुस्तकाचं नाव. तो स्पर्श अजूनही आठवतोय. ही ८४-८५ सालची गोष्ट. नंतर ते पुस्तक अनेकदा वाचलं. तेव्हापासून इव्हान्स कायमच समवेत आहेत. हॅरिसन सॅलिस्बरी (याचं ‘विदाऊट फीअर ऑर फेव्हर’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कुमार केतकरांनी आवर्जून दिलं होतं), बेन ब्रॅडली, डेव्हिड रेम्निक, डेरेक जेम्सन, अजूनही अंगावर रोमांच आणणाऱ्या ‘ऑल दी प्रेसिडेन्ट्स मेन’चे बॉब वुडवर्ड-कार्ल बर्न्‍स्टिन.. अशा एकापेक्षा एक तेजस्वी दीपस्तंभांनी वर्तमानपत्रांच्या दुसऱ्या दिवशी रद्दी होणाऱ्या कागदाला अमीट सोनेरी झळाळी दिली. अशी किमान डझनभर नावं आजही प्रात:स्मरणीय. पण त्यातलं आदरोत्तम व्यक्तिमत्त्व म्हणजे हॅरॉल्ड इव्हान्स. त्यांच्या ‘गुड टाइम्स..’नं तेववलेल्या पत्रकारितेच्या दिव्यातलं तेल अजूनही तसंच आहे.

पुढे अनेकदा भाषणात इव्हान्स यांचे दाखले दिले गेले. जेव्हा पत्रकारिता म्हणजे काही एका उद्दिष्टानं लिहिणं होतं, लिहिणाऱ्याला ‘वहांका माहोल कैसा है’ असे प्रश्न विचारावे लागत नव्हते, वर्तमानपत्रं ही पाहण्यासाठी नव्हे तर वाचण्यासाठी छापली जात होती, संपादक न्यायाधीशाची भूमिका घेत नव्हते आणि ‘नेशन वॉण्ट्स टु नो’चा बिनडोक दावा करत नव्हते.. त्या वेळी इव्हान्स हे पत्रकारिता करत होते. त्यांची थॅलिडोमाइड प्रकरणातली बातमीदारी आज करोना-साथीचं मनोरंजनीय वार्ताकन केलं जात असतानाच्या काळात आठवली तरी धन्य वाटतं. ‘गुड टाइम्स.’मध्ये त्याचा उल्लेख आहेच.

थॅलिडोमाइड हे मुळात जर्मन कंपनीचं औषध. जन्माला आलं ते बधिरता देण्यासाठी. पुढे त्याचा वापर गर्भवती महिलांसाठी सुरू झाला. दिवस गेले की बायकांचे दिवस उलटीच्या भावनेनं जाता जात नाहीत. थॅलिडोमाइड हे या उलटीच्या भावनेवर प्रभावी आहे, असं लक्षात आल्यावर त्यासाठी ते दिलं जाऊ लागलं. इंग्लंडमध्ये साठच्या दशकात ‘गोऽऽड बातमी आहे’ असं एखादी म्हणाल्या म्हणाल्या तिच्या हातावर थॅलिडोमाइडच्या गोळ्यांचं पाकीट ठेवलं जायचं, इतका त्याचा वापर सर्रास होता. पण त्याच काळात जन्माला येणाऱ्या अर्भकांना एखादा अवयवच नसायचा. कोणाला एक कानच नाही, कुणाची बोटंच लहानमोठी, तर कोणाला आणखी काही. हे असं का होतंय याचं संशोधन करणाऱ्यांना संशय आला या थॅलिडोमाइडचा. दुर्दैवानं तो खरा निघाला.

त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा इव्हान्स यांनी केला. एकटय़ा ब्रिटनमध्ये जवळपास दहा हजार महिलांची बाळं या औषधाने काही व्यंग घेऊन जन्माला आली. या सर्वाचा माग इव्हान्स आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ‘टाइम्स’ने काढला. इतकंच नाही, तर या महिलांना सदर कंपनी भरभक्कम नुकसानभरपाई देत नाही तोपर्यंत त्यांनी हे प्रकरण लावून धरलं. हे औषध इंग्लंडमध्ये ‘डिस्टिलर्स कंपनी’कडून विकलं जात होतं. आपल्या औषधामुळे झालेला हाहाकार लक्षात आल्यावर नुकसानभरपाई देणं हा काही कंपनीसाठी मोठा आव्हानाचा मुद्दा नव्हता. औषध कंपन्या रग्गड पैसा कमावतात. त्यामुळे पैसे खर्च करणं हे काही त्यांच्यासाठी संकटाचं नाही. आताही काही फार वेगळी परिस्थिती आहे असं नाही. पण औषध कंपन्यांचं नाक दाबलं जातं ते त्यांच्या एखाद्या रसायनास औषधाचा दर्जा कसा दिला गेला हे शोधून काढण्यात. थॅलिडोमाइड प्रकरणात प्रश्न असा होता की, हे औषध बाहेर येण्यापूर्वी किती जणांवर त्याची चाचणी घेतली गेली. इव्हान्स या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करते झाले. ही बाब महत्त्वाची. नाही तर ‘अमुक ठिकाणी इतके करोनाबाधित सापडले’ अशा छापाची निर्बुद्ध बातमीदारी त्यांच्याकडून झाली असती.

ते भान होतं म्हणून इव्हान्स मोठे ठरतात. कारण त्यांच्या बातमीदारीनं सिद्ध केलं की, इतक्या महत्त्वाच्या औषधाच्या पुरेशा चाचण्याच झालेल्या नाहीत. ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांना यात काही आश्चर्य वाटणार नाही. पण त्यांना सांगायला हवं की, इव्हान्स ज्या वेळेस या कंपनीविरोधात आपली लेखणी परजत होते त्यावेळेस ही कंपनी ‘द टाइम्स’ची सर्वात मोठी जाहिरातदार होती. अशीच त्या वेळची दुसरी महाप्रचंड जाहिरातदार कंपनी म्हणजे ‘आयसीआय’ (इम्पिरियल केमिकल इण्डस्ट्रीज्). जगातल्या काही नामांकित रसायन कंपन्यांतली एक असलेल्या या कंपनीकडून होणाऱ्या प्रदषणाचा मुद्दाही इव्हान्स यांनी लावून धरला. या दोन्हींचा रास्त परिणाम झाला आणि कायद्यातही बदल झाले. एकंदरच टाइम्सनी जाहिरातदाराविरोधात काही छापल्याचं ते शेवटचं प्रकरण असावं. त्यानंतर हे वर्तमानपत्र रूपर्ट मर्डॉक यांच्याकडे गेलं. तोवर इव्हान्स टाइम्सचे संपादक झाले होते आणि इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर यांचा उदय झाला होता. मर्डॉकसारख्या माध्यमसम्राटांना सत्तेशी जुळवून घेत उत्पन्न कसं वाढेल यातच रस असतो. म्हणून अमेरिकेतल्या फॉक्स न्यूजने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम करावं आणि त्याची मालकी मर्डॉक यांच्याकडेच असावी यात योगायोग नाही. सत्ताधारी पक्षासाठी फॉक्स न्यूज होण्यासाठी आसुसलेले प्रत्येक देशात असतात. आपल्याकडे तर डझनांनी निघतील. नंतर नंतर परिस्थिती अशी होते की, याची माध्यमांना आपल्या दावणीला बांधणाऱ्या राजकीय पक्ष/नेत्यांना जाणीव नसते आणि मग हे राजकीय पक्ष/नेतेच माध्यमांच्या दावणीला बांधले जातात (हे कसं होतं हे समजून घ्यायची इच्छा असणाऱ्यांनी ब्रायन स्टेल्टर यांचं ‘होक्स’ हे पुस्तक जरूर वाचावं). म्हणून माध्यमं आणि राजकीय पक्ष/नेते यांत सुरक्षित अंतर हवंच हवं. वैयक्तिक संपत्तीनिर्मितीसाठी आपल्या हातातली माध्यमताकद वापरणाऱ्या मर्डॉक यांच्या आगमनाचं वर्णन इव्हान्स यांनी ‘दैत्याचा पुनर्जन्म’ असं केलंय. यावर अधिक भाष्याची गरज नसावी. त्यामुळेच आपला टाइम्स सत्ताधीशांभोवती फारच पिंगा घालतोय असं लक्षात आल्यावर त्यांनी आपला ‘टाइम इज अप’ हे ओळखलं. पुढे ते अमेरिकेत गेले, अनेक वर्तमानपत्रं, साप्ताहिकं, रॉयटर्ससारखी वृत्तसेवा अशा अनेक दिशांनी आपली पत्रकारिता करत राहिले. नंतरही अनेक उत्तमोत्तम पुस्तकं त्यांनी लिहिली. या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीत एक समान सूत्र आहे.

ते म्हणजे सत्त्व आणि पायरी हे दोन्ही त्यांनी कधी सोडलं नाही. लोकशाहीची जननी अशा ब्रिटनमधल्या इव्हान्स यांना ‘चवथा स्तंभ’ म्हणजे नक्की काय हे निश्चित माहीत होतं. बाकीचे तीन स्तंभ दिसतात. लोकशाहीच्या महालाचा आधार असणारा माध्यमाचा स्तंभ अदृश्य असतो. तसाच तो असायला हवा. याचा अर्थ या चौथ्या स्तंभाचं काम दिसायला हवं, हा स्तंभ नव्हे.

पत्रकारितेचे अनेक नवे पर्याय नंतर पुढे आले. पण छापील वर्तमानपत्रावर इव्हान्स यांचा प्रचंड विश्वास होता. माध्यमताकदीचा सर्वगुणसंपन्न आविष्कार यात आढळतो, असं ते मानायचे. ‘जगातल्या वेडय़ावाकडय़ा घटनांचा काहीएक बौद्धिक शिस्तीत अर्थ लावून लगेच दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी वाचकांपर्यंत तो सादर करणं हेच किती थक्क करणारं आहे,’ असं इव्हान्स आपल्या ‘माय पेपर चेस’ या पुस्तकात म्हणतात तेव्हा त्यातून त्यांचं अव्यभिचारी वर्तमानपत्रप्रेम दिसून येतं. या व्यवसायावर त्यांनी ते आयुष्यभर केलं. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत ते संपादक राहिले. त्यांचं यथार्थ मूल्यमापन केलं ‘द गार्डियन’चे माजी संपादक अ‍ॅलन रस्ब्रिजर यांनी- ‘‘आम्हा प्रत्येकाला हॅरॉल्ड इव्हान्स व्हायचं होतं..,’’ अशा शब्दांत.

शुक्रवारी पहाटे इव्हान्स गेल्याची बातमी आली. समोरच्या फडताळात काळ्या पुठ्ठय़ाच्या बांधणीत सोनेरी अक्षरांत इव्हान्स जिवंत दिसले.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:02 am

Web Title: loksatta anyatha article on harold evans abn 97
Next Stories
1 फिटे अंधाराचे जाळे..?
2 एकच प्याला.. चहाचा!
3 विश्वविधायकाचा वाढदिवस!
Just Now!
X