News Flash

माझा पोर्टफोलियो : वादळी अनिश्चिततेत पोर्टफोलियोला स्थिरत्व

भारतात जे काही जुने मोठे यशस्वी उद्योग समूह आहेत त्यांत मुरुगप्पा समूहाचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल.

भारतात जे काही जुने मोठे यशस्वी उद्योग समूह आहेत त्यांत मुरुगप्पा समूहाचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल. गेली ११७ वर्षे २८ व्यवसायात पारंगत असलेल्या या समूहाच्या नऊ कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या या समूहाच्या काही कंपन्यांची नावे समजल्यावर प्रचीती येईल. यात काबरेरंडम युनिव्हर्सल, चोलामंडलम, वेण्ड इंडिया, कोरोमंडल इंटरनॅशनल, पॅरी अ‍ॅग्रो, ईआयडी पॅरी इ. कंपन्यांचा समावेश करता येईल. याच समूहाची टय़ूब इन्व्हेस्टमेंट्स गेल्या सहा दशकाहून अधिक सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवत आहे. कंपनीने आपल्या पुनर्रचनेनंतर (गुंतवणूक आणि वित्त विभाग वेगळा काढून) इंजिनीयरिंग, सायकल आणि धातूवर्धक उत्पादने अशा तीन विभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या खेरीज आपल्या सहकारी आणि उपकंपनीद्वारे कंपनी गीयर तसेच वाहन निर्मितीसाठी इतर सुटय़ा भागांचे उत्पादन करते. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली शांती गीयर्स ही टय़ूब इन्व्हेस्टमेंट्सची उपकंपनी आहे. रेल्वे, इंजिनीयरिंग तसेच वाहन उद्योगाला आवश्यक असलेल्या स्टील टय़ूब, प्रीसिजन टय़ूब आणि स्टील स्ट्रिप्सचे उत्पादन करणारी ही मोठी कंपनी असून वाहन तसेच इतर उद्योगाच्या वाढत्या मागणीसाठी कंपनी राजपूर येथे वार्षिक ११,००० टन टय़ूबची निर्मिती करणारा प्रकल्प उभारत आहे. बजाज ऑटो, मारुती तसेच कॅटरपीलरसारख्या मोठय़ा कंपन्या कंपनीचे प्रमुख ग्राहक आहेत. पुढील आर्थिक वर्षांपासून हा प्रकल्प कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरण संवर्धनाला अनुसरून सायकलची मागणी वाढू लागली आहे. बीएसए, हरक्युलस तसेच रोडिओ आणि मोन्त्रो या ब्रॅण्ड नावांनी कंपनी आपल्या सायकलची विक्री करते. कंपनीने नुकताच रीडले या बेल्जियन कंपनीशी ३३ वर्षांचा करार केला असून या अंतर्गत कंपनी ११ प्रीमियम ब्रॅण्डच्या २५,००० ते ८०,००० रुपयांच्या सायकल बाजारात आणेल.

डिसेंबर २०१७ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने ११०२.९३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४.९४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत तो २८ टक्क्य़ांनी अधिक आहे. अनिश्चित बाजारात नेहमी कमी धोका असणारे आणि दीर्घावधीत फायदा करून देणारे शेअर शोधावेत. टय़ूब इन्व्हेस्टमेंट्ससारखी अत्यल्प ‘बिटा’ असलेली कंपनी म्हणूनच तुमच्या पोर्टफोलियोमध्ये हवी.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.  २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 6:15 am

Web Title: tube investments india portfolio by ajay walimbe
Next Stories
1 फंड विश्लेषण : रंग माझा वेगळा
2 वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
3 फंड जिज्ञासा : म्युच्युअल फंड गुंतवणूक दीर्घावधीसाठीच हवी!
Just Now!
X