दोन उपकंपन्यांद्वारे हजारो गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी सहारा समूहाचे सुब्रतो रॉय यांच्यासह तीन जणांच्या स्थावर-जंगम मालमत्ता तसेच बँक व डिमॅट खाती गोठविण्याचे आदेश अखेर सेबीने बुधवारी सायंकाळी उशिरा जारी केले. गुंतवणूकदारांचे वार्षिक १५ टक्क्यांसह २४ हजार कोटी रुपये अदा न केल्याबद्दल समूहाविरोधात कारवाई न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही सेबीवर ताशेरे ओढले होते.
सुब्रतो रॉय यांच्यासह वंदना भार्गवा, रवि शंकर दुबे व अशोक रॉय चौधरी यांची यांची बँक तसेच डिमॅट खाती व स्थावर-जंगम मालमत्ता गोठविण्याचे आदेश सेबीचे पूर्णवेळ सदस्य प्रशांत सरन यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. याबाबत संबंधितांना येत्या २१ दिवसांत संपूर्ण माहिती देण्याचेही बंधनकारक करण्यात आले असून या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सहारा समूहातील ‘सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेन्ट कॉर्पोरेशन’ व ‘सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन’ या दोन उपकंपन्यांबाबत जारी करण्यात आलेल्या २०० पानांच्या आदेशात मालमत्तांची स्वतंत्र यादीही देण्यात आली आहे.