मुंबई : भांडवली बाजाराची नव्या सप्ताहाची सुरुवात सोमवारी निर्देशांक तेजीसह झाली. १६३.६८ अंश वाढीसह सेन्सेक्स ३७ हजाराच्या पुढे जाताना ३७,१४५.४५ वर पोहोचला. तर निफ्टीने अर्धशतकी निर्देशांक भर घालत त्याचा ११ हजाराचा टप्पा पुन्हा एकदा गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक आठवडय़ाच्या पहिल्या व्यवहारात ५६.८५ अंश वाढीने ११,००३.०५ पर्यंत स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक स्तरावरील सकारात्मक अर्थहालचालींची दखल येथेही घेतली गेली. तर देशांतर्गत अर्थचिंतेवर सरकारकडून लवकरच उतारा शोधला जाण्याच्या आशेने येथील बाजारातील गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी केली.

नव्या सप्ताहाची सुरुवात काहीशी घसरणीने करणारा मुंबई निर्देशांक सत्रात ३७,८०० च्याही खाली आला. मात्र दुपारच्या व्यवहारात शुक्रवारच्या तुलनेत त्यात थेट ४६० अंशांपर्यंतची झेप घेतली गेली. तर सोमवारचा निफ्टीचा प्रवास १०,८८९.८० ते ११,०२८.८५ असा राहिला.

मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपनी समभाग तेजीच्या तर त्यापैकी निम्मे, १० समभाग घसरणीच्या यादीत राहिले. येस बँक, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, कोटक महिंद्र बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, स्टेट बँक, ओएनजीसी, एचडीएफसी लिमिटेड, हीरो मोटोकॉर्प आदी जवळपास ४.५० टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्र, बजाज ऑटो, टीसीएस आदी मात्र १.५० टक्क्य़ांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, भांडवली वस्तू, उद्योग, ग्राहकपयोगी वस्तू, बँक, वित्त क्षेत्र १.७५ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तुलनेत माहिती तंत्रज्ञान निर्देशांक जवळपास पाऊण टक्क्य़ापर्यंत आपटला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्य़ापर्यंत वाढले.

येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर आठवडय़ाच्या पहिल्या सत्रात जवळपास स्थिर राहिला. तर मुंबईच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूचे दर सप्ताहारंभी काही प्रमाणात वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती प्रति पिंप ६२ डॉलरवर स्थिरावल्या आहेत.

मोदी २.० पर्वात गुंतवणूकदारांना १४ लाख कोटींचा फटका

पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिले १०० दिवस साजरे होत असतानाच या दरम्यान येथील भांडवली बाजारात मात्र गुंतवणूकदारांनी १४ लाख कोटी रुपये गमावले आहेत. मोदी यांनी दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यापासून, चालू वित्त वर्षांचा परिपूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्यापासून भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांनी ३१,७०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. या दरम्यान मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे मूल्य १४० लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले आहे. बाजारात नियमित व्यवहार होत असलेल्या कंपन्यांपैकी ९६ टक्के कंपन्यांनी त्यांचे समभागमूल्य ३० मेपासून सातत्याने गमावले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex gains 164 points nifty closes above 11000 zws
Show comments