02 April 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : तरी.. ‘निफ्टी’ कोरडीच!

धुवाधार आर्थिक सवलतींच्या वर्षांवात खरे तर निफ्टीवर केव्हाच तेजीचा महापूर येऊन निफ्टीने ११,६०० चा पल्लादेखील पार व्हायला हवा होता.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

चिंब पावसानं रान झालं आबादानी.. यंदा बरसलेल्या पावसाला कविवर्य ना. धों. महानोर यांच्या या काव्यपंक्ती चपखल बसतात. गेल्या पंधरा दिवसांत पावसाची व अर्थमंत्र्यांची जुगलबंदीच चालू होती. एकीकडे पावसाचं कोसळणं, तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्र्यांच्या आर्थिक सवलतींचा वर्षांव अशी दोघांमध्ये स्पर्धाच चालू होती. एकीकडे पावसाच्या कोसळण्याने पूर येत होता, तर बरोबर विरुद्ध चित्र बाजारात होते. धुवाधार आर्थिक सवलतींच्या वर्षांवात खरे तर निफ्टीवर केव्हाच तेजीचा महापूर येऊन निफ्टीने ११,६०० चा पल्लादेखील पार व्हायला हवा होता. पण कसलं काय? निफ्टीला ११,१०० चा स्तरदेखील पार करताना धाप लागत आहे. थोडक्यात चिंब पावसातदेखील.. आमची निफ्टी कोरडीच आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स – ३७,३८४.९९

निफ्टी – ११,०७५.९०

गेल्या शुक्रवारचा साप्ताहिक बंद आश्वासक झाल्याने तसेच इतके दिवस मृतवत असलेले ‘ब’ वर्गातील (स्मॉल व मिड कॅप) समभागात तेजी अवतरल्याने, पुन्हा एकदा सुधारणा अपेक्षित आहे. या सुधारणेचे वरचे लक्ष्य हे प्रथम सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० असेल. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास सेन्सेक्सवर ३७,७०० ते ३८,३०० आणि निफ्टीवर ११,२०० ते ११,४०० चा स्तर दृष्टिपथात येईल.

तिमाही निकालांचे विश्लेषण

एशियन पेंटस : या स्तंभातील २२ जुलैच्या लेखातील समभाग होता एशियन पेंटस. त्याचा बंद भाव त्यासमयी १,३६९ रुपये होता व वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर १,३७० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर १,३७० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,४४० रुपये व त्या नंतर १,५३० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. एशियन पेंट्सचा प्रत्यक्ष निकाल अतिशय उत्कृष्ट असल्याने सहजगत्या १,५३० रुपयांचे इच्छित वरचे लक्ष्य ६ ऑगस्टला साध्य तर केलच, पण या मंदीच्या रेटय़ातही एशियन पेंट्सने १,६२२ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक ३० ऑगस्टला नोंदविला.   अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अवघ्या दीड महिन्यात ११ टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही दीड महिन्यानंतर, एशियन पेंट्सचा बाजारभाव (शुक्रवारचा बंद भाव) हा १,५४८ रुपयांवर आहे जो अगोदर उल्लेख केलेल्या वरच्या लक्ष्यासमीप आहे.

लार्सन अँण्ड टुब्रो : या लेखातील दुसरा समभाग होता लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड. समभागाचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा १,३८० रुपये होता. निकालाअगोदर १९ जुलैचा बंद भाव हा १,४११ रुपये होता. निकाल निराशादायक असल्यास १,३८० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत समभाग १,३०० रुपयांपर्यंत घसरेल. असे निकालाअगोदरचे विश्लेषण होते. प्रत्यक्ष निकाल निराशादायक असल्याने, २३ ऑगस्टला समभागाने १,२७४ रुपयांचा नीचांक नोंदवला. आज दीड महिन्यानंतरही, समभागाचा बाजारभाव हा महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तराखालीच आहे. पण या मंदीच्या रेटय़ात १,३०० रुपयांचा स्तर राखत शुक्रवारचा बंद भाव १,३६३ रुपये आहे.   (क्रमश:)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:46 am

Web Title: share market trends senesex nifty abn 97 2
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : मंदीमुक्त अतुल्य रसायन
2 कर बोध : अग्रिम कर दुसरा हप्ता १५ सप्टेंबरपूर्वी
3 नियोजन भान : तुम्हाला वार्षिकीची गरजच काय?
Just Now!
X