काही कंपन्यांच्या गुणवत्तेबद्दल फारसे काही सांगावे लागत नाही. मला वाटते अशा काही मोजक्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक इंगरसोल रॅण्ड असावी. १४६ वर्षांपूर्वी १८७१ मध्ये अमेरिकेत स्थापन झालेली इंगरसोल रॉक ड्रिल १ जून १९०५ मध्ये इंगरसोल रॅण्ड झाली. १९२१ मध्ये भारतातील बहुधा पहिलीच अमेरिकन गुंतवणूक असलेली ही कंपनी कलकत्त्यात स्थापन झाली. आज कंपनीची भारतात चेन्नई, बंगळूरु तसेच कोइम्बतूर येथे इंजिनीयरिंग आणि टेक्नॉलॉजी सेंटर्स असून तिचे नरोडा आणि साहिबाबाद येथे दोन उत्पादन प्रकल्प आहेत. सध्या कंपनीचे भारतभरात २,००० कर्मचारी आहेत. जगभरात या बहुराष्ट्रीय कंपनीचे ५१ उत्पादन प्रकल्प, ८६७ कार्यालये असून त्यात ४०,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. इंगरसोल रॅण्डचे प्रमुख उत्पादन कॉम्प्रेसर्स असले तरीही कंपनी पॉवर टुल्स, क्लब कार्सचे उत्पादन करते तसेच फ्लुइड मॅनेजमेंट व इक्विपमेंट हँडलिंग इत्यादी सेवाही पुरविते. कंपनीची उत्पादने बहुतेक सर्वच क्षेत्रांत वापरली जातात यांत प्रामुख्याने तेल आणि वायू, वाहन, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, खाणकाम तसेच जहाजबांधणी आदींचा समावेश करता येईल. ३० सप्टेंबर २०१७ रोजी नुकत्याच संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १६१.१४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २२.०३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १० टक्क्यांनी जास्त आहे.

अर्थात इतके असूनही गेली पाच वर्षे कंपनीची कामगिरी सुमारच आहे. परंतु आगामी कालावधीत कुठलेही कर्ज नसलेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीकडून ‘बाय बॅक’ (समभाग पुनर्खरेदी) जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कंपनीच्या कामकाजातही सुधारणा अपेक्षित आहे. त्यामुळेच सध्याच्या अनिश्चित बाजारात इंगरसोलसारखा शेअर सुरक्षित वाटतो आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ  शकतो.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.