राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, नवीन वर्षांत देशातील सर्वात मोठय़ा बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली. आपल्या ‘एमसीएलआर’ अर्थात ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट’मध्ये कपात केल्यामुळे व्याजदर अनेक वर्षांच्या तळाला पोहोचले आहेत. स्थिर व्याजदराने गृहकर्ज घेतलेल्या अनेक कर्जदारांना त्यांचे सुरू असलेले कर्ज तरल व्याजदरात बदलून घ्यावेसे वाटत आहे. हे कर्ज अधिमूल्य भरून स्विच केले तर कर्जाचा हप्ता कमी होईल. आहे त्याच दराने व्याज आकारणी केली तर अधिक हप्ता द्यावा लागेल. नक्की काय करावे हे समजत नसल्याने हे कर्जदार गोंधळलेल्या स्थितीत आहेत. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील’’, वेताळ राजाला म्हणाला.

राजा उत्तरताना म्हणाला, ‘‘निश्चलनीकारणाचे जे काही चांगले साइड इफेक्ट्स आहेत त्यात बँकांची धन भरभराट होय. रोकडसुलभता वाढल्याने बँकांकडून व्याजदर घसरण अपेक्षित होती. बँकांच्या अध्यक्षांना अनेकदा आडून किंवा स्पष्टपणे कर्जावरील व्याजदर कमी करणार किंवा कसे अशी विचारणा होत होती. या प्रश्नाचे उत्तर ते टाळत आले असले तरी अपेक्षेनुसार त्यांना त्यांच्या ‘एमसीएलआर’मध्ये कपात करणे भाग पडले. तरल की स्थिर हा निर्णय घेण्याआधी ‘एमसीएलआर’ म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने वेळोवेळी रेपोदरात कपात करूनसुद्धा बँका त्यांच्या व्याजदरात कपात करीत नसल्याने रिझव्‍‌र्ह बँकेने बँकांना त्यांचा ‘एमसीएलआर’ व्याजदर निश्चित करण्यास सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेने वाणिज्य बँकांना एका सूत्राच्या आधारे त्यांचा ‘एमसीएलआर’ किंवा किमान व्याजदर निश्चित करण्यास सांगितले. बँकांनी रेपो दरासहित त्यांना उपलब्ध असलेल्या व्याजदरांचा विचार करून बँकांनी आपापला त्यांचा ‘एमसीएलआर’ जाहीर करावा असा फतवा रिझव्‍‌र्ह बँकेने काढला. त्यामुळे बँकांना एका दिवसापासून ते एका वर्षांपर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी किमान व्याजदर जाहीर करण्याचे आदेश दिले; या आदेशांचे फलित म्हणजे ‘एमसीएलआर’! खूप वर्षांपासून बँकांना त्यांचा ‘पीएलआर’ अर्थात प्राइम लेंडिंग रेट जाहीर करावा लागत असे. या व्याजदारावर अधिमूल्य आकारून कर्जाच्या जोखमीनुसार कर्जाचा प्रत्यक्ष दर ठरत असे. आजही ‘एमसीएलआर’ अधिक ‘मार्कअप’ या पद्धतीने प्रत्यक्ष व्याजदर ठरतात. बँकेने वेगवेगळ्या कालावधीनुसार व रकमेनुसार कर्जाचे चार वर्ग केले असून प्रत्येक प्रकारच्या कर्जासाठी ‘एमसीएलआर’ अधिक अधिमूल्य याप्रमाणे कर्जाचे प्रत्यक्ष व्याजदर निश्चित केले आहेत. ७५ लाखांच्या आतील आणि ७५ लाखांपेक्षा अधिक असे दोन गट आहेत. त्यामुळे स्टेट बँकेने जाहीर केलेला व्याजदर आपल्याला लागू होतो ही कर्जदारांची भावना चुकीची आहे. बँकेने आपला एका वर्षांसाठीचा ‘एमसीएलआर’ ८ टक्के निष्टिद्धr(१५५)त केला असून अधिमूल्यासहित व्याजदर ८.६५ ते ८.८५ टक्के या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत ज्या कर्जाची परतफेड मुदत १५ वर्षांहून कमी आहे अशा कर्जाच्या तरल व स्थिर व्याज आकारणीत १५ वर्षांत तीन लाखांचा फरक पडणार आहे.

‘‘अर्थचक्राच्या दिशेनुसार व्याजदरांचे एक आवर्तन असते. २००४ मध्ये ७-८ टक्क्यांदरम्यान व्याजदर असलेल्या कर्जाचे दर २००९ मध्ये ९-१० टक्के झाले. तर २०१२ मध्ये व्याजदरांनी शिखर गाठले होते. तुम्ही नेमके अर्थचक्राच्या कोणत्या टप्प्यात कर्ज घेता यावर स्थिर की तरल या प्रश्नाचे उत्तर मिळते. वरवर पाहता व्याजदर जरी स्थिर वाटले तरी बँकांनी त्यांचा ‘एमसीएलआर’ वाढविला तर स्थिर व्याजदर स्थिर न राहता वाढतीलच. व्याजदर नक्की कधी व किती खाली जातील हे आज सांगणे मुश्कील आहे. परंतु ज्यांनी कोणी स्थिर व्याज आकारणी पद्धतीचा अवलंब केला आहे अशा कर्जदारांनी थोडी वाट पाहावी व व्याजदर खाली जाण्याची अपेक्षा असल्याने अजून सहा महिन्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा अदमास घेऊन कर्ज स्विच करण्याचा विचार करावा. गृहकर्ज २० ते २५ वर्षांच्या दीर्घ मुदतीची असल्याने इतक्या अवधीत व्याजदरांचा अंदाज बांधता येत नाही. व्याजदरांचा फार तर २-३ वर्षांचा अंदाज बांधता येतो. हे लक्षात घेऊन कर्जदारांनी काहीही न करता आहे त्या परिस्थितीत २-३ वर्षे वाट बघावी व कर्जाची रक्कम ७० लाख किंवा कमी झाली तर कर्जाचा दर कमी होणारच आहे हे विसरू नये. सद्य परिस्थितीत व्याजदरात काहीही ढवळाढवळ न करणे हाच सल्ला होय,’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला gajrachipungi@gmail.com