Astrology: भारतीय संस्कृतीत पौराणिक काळापासून रंग आणि त्यांचे महत्त्व अनेक ग्रंथांद्वारे वर्णित करण्यात आले आहे. असं म्हणतात, ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी देवी लक्ष्मी सदैव वास करतात. हे नियम एखाद्या ठिकाणाबद्दलच नाही तर आपण दररोज घालत असलेल्या कपड्यांसाठीदेखील आहेत. जे लोक दररोज धुतलेले स्वच्छ कपडे घालतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मी नेहमीच प्रसन्न असते. तसेच हे कपडे आपण जर आठवड्याच्या वाराच्या रंगानुसार घातले तर त्याचा आणखी फायदा होण्याची शक्यता असते.

ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्यातील प्रत्येक वाराचे खास महत्त्व आहे. हिंदू धर्मात देवतांना आणि ग्रहांना आठवड्यातील प्रत्येक वार समर्पित केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वारानुसार देवी-देवतांची आणि ग्रहांची पूजा-आराधना केली जाते. यासह शास्त्रात वारानुसार रंग वापरण्याचे महत्त्वसुद्धा सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही जर वारानुसार रंग वापरला तर यामुळे तुमच्या आयुष्यात अनपेक्षित उत्तम बदल घडू शकतात. असं म्हणतात, यामुळे त्या रंगांशी संबंधित ग्रहदेखील आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. यामुळे आपला दिवस उत्साहात जातो.

कोणत्या वाराला कोणता रंग वापरावा?

सोमवार

शास्त्रात, सोम या शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. त्यामुळे सोमवार हा चंद्र ग्रहाचा वार आहे. चंद्र ग्रहाचे वर्णन शास्त्रात शीतल, शांत ग्रह म्हणून केले जाते. त्यामुळे सोमवारी नेहमी सफेद रंगाचे कपडे घालण्यास सांगितले जातात. कारण सफेद रंग शीतलता आणि शांततेचे प्रतीक आहे. सोमवारी भगवान शंकरांची पूजा-आराधनादेखील केली जाते. या रंगाच्या वापराने तुमच्यावर चंद्र आणि महादेव नेहमी प्रसन्न राहतील.

मंगळवार

मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार असून मंगळ ग्रह उग्र, साहस आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या दिवशी नेहमी लाल रंगाचे कपडे घालावे. कारण लाल रंग मंगळ ग्रहाच्या गुणांचे प्रतिनिधित्व करतो. या दिवशी श्री गणेश आणि श्री हनुमान यांची आराधना केली जाते. तसेच श्री गणेश आणि हनुमान यांनादेखील लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी लाल रंग वापरावा, यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकते.

बुधवार

बुधवार हा बुध ग्रहाचा वार असून बुध ग्रहाला बुद्धी, ज्ञान आणि वाणीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या दिवशी नेहमी हिरवा रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. हिरवा रंगदेखील बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच या दिवशी बुद्धीच्या देवतेची म्हणजेच श्री गणेशांची उपासना केली जाते.

गुरुवार

गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार असून गुरु ग्रह धन, संपत्ती आणि ज्ञानाचे कारक ग्रह मानले जातात. गुरु ग्रहाला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी हा रंग आवर्जून वापरावा. तसेच या दिवशी श्री विष्णू आणि श्री दत्तगुरुंचीदेखील पूजा केली जाते. या दोन्ही देवतांनादेखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे.

हेही वाचा: शंख वाजवल्याने अनेक दोष होतात दूर; जाणून घ्या जबरदस्त फायदे

शुक्रवार

शुक्र ग्रहाचा वार असलेल्या शुक्रवारी देवी लक्ष्मी, दुर्गा यांची पूजा-आराधना केली जाते. शुक्र हा ग्रह सौंदर्य, आकर्षण आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे शास्त्रात या दिवशी हलका गुलाबी, क्रिम रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या रंगाच्या वापराने व्यक्तीला भौतिक सुख प्राप्त होतात.

शनिवार

हा शनि देवांचा वार असून या दिवशी काळा आणि निळा हे दोन रंग वापरण्यास सांगितले जाते, तसेच या दिवशी काळा आणि निळा रंग वापरल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास येत नाही, अशी मान्यता आहे. तसेच शनिदेवालादेखील हे दोन्ही रंग अतिशय प्रिय आहेत.

रविवार

रवि म्हणजेच सूर्य, त्यामुळे रविवार हा सूर्याचा वार असून सूर्य मान-सन्मान, पद-प्रतिष्ठेचा कारक ग्रह मानला जातो. या दिवशी सूर्याचा रंग म्हणजे केशरी, तांबूस पिवळा हे रंग वापरावे, जेणेकरून तुम्हाला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)