सोनल चितळे

Libra Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: नवीन वर्ष २०२४ ला सुरुवात झाली असून अनेकांना नवे वर्ष कसे जाईल हा प्रश्न पडतो. गेले काही दिवस आपण एका राशीचं वार्षिक राशीभविष्य पाहात आहोत. आज आपण तुळ राशीसाठी नवीन वर्ष कसे जाणार, जाणून घेणार आहोत. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कलेचा, प्रेमाचा, कोमलतेचा कारक ग्रह आहे. तूळ राशीच्या व्यक्ती कलेचा आस्वाद घेणाऱ्या, प्रेमळ भाष्य करणाऱ्या, आपलेपणा निर्माण करणाऱ्या अशा असतात. तूळ ही बुद्धिवादी आणि बुद्धीजीवी रास आहे. त्यांना ज्ञानलालसा असते. नवनवीन गोष्टी शिकण्याची, त्यांचा उपयोग करण्याची त्यांना आवड असते. त्या प्रपंच आणि परमार्थाचा अत्यंत उत्तमरित्या समतोल साधत असतात. शिस्तीच्या वेळी शिस्त आणि आनंदाच्या वेळी मनसोक्त निखळ आनंद उपभोगणारी अशी ही तूळ रास. या राशीच्या व्यक्तींना हे २०२४ हे वर्ष कसे जाईल, हे पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा संपूर्ण वर्षभर पंचमातील कुंभ राशीतून शनी भ्रमण करेल. शैक्षणिक प्रगती, सखोल अभ्यास यासाठी शनीची
उत्तम साथ मिळेल. एप्रिल अखेरपर्यंत गुरू सप्तमातील मेष राशीतून भ्रमण करेल. या कालावधीत चांगले गुरुबल
असेल. महत्वाची कामे तोपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. १ मे रोजी गुरू अष्टमातील वृषभ राशीत प्रवेश करेल.
तेव्हापासून गुरुबल कमजोर झाल्याने अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागेल. मेअखेरी पर्यंत हर्षल
सप्तमातील मेष राशीत भ्रमण करेल. आणि १ जूनला अष्टमतील वृषभ राशीत प्रवेश करेल. वैचारिक स्थैर्य कमी
होईल. महत्वाचे निर्णय घेताना मन द्विधा होईल. चतुर्थतील मकर राशीतून प्लूटो वर्षभर भ्रमण करेल.
त्याच्याबरोबर इतर ग्रह येतील त्याप्रमाणे त्याचे संमिश्र फळ मिळेल. राहू आणि नेपच्यून षष्ठ स्थानातील मीन
राशीत पूर्ण वर्ष असतील. स्पर्धा परिक्षांमध्ये उतरायचे असल्यास या राहुची मदत होईल. व्यय स्थानातील कन्या
राशीत केतू वर्षभर असल्याने आध्यात्मिक प्रगतीला पूरक ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवेल. या महत्वाच्या ग्रह
बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार आणि अभ्यास करता २०२४ या वर्षाचे तूळ राशीच्या व्यक्तींना कसे
ग्रहफल मिळेल हे पाहूया…

तुळ वार्षिक राशिभविष्य (Libra Yearly Horoscope 2024)

जानेवारी (January Horoscope)

गुरुबल चांगले असल्याने वर्षाची सुरुवात जोरदार होईल. इतरांसाठी काहीतरी करावे या विचारांनी पुढे जाल,
आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात, सरावात आणि लहानमोठ्या परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल.
नोकरी व्यवसायात नवी संधी आपणास खुणावेल. बढती किंवा बदलीची शक्यता आहे. विवाहोत्सुक मंडळींना
एप्रिलपर्यंत चांगले योग आहेत. विवाहीत मंडळींनी जोडीदारासह मोकळेपणाने संवाद साधावा. गुंतवणूकदारांना
त्यांच्या पैशाचा चांगला परतावा मिळेल. पण खबरदारी घेऊनच अशी गुंतवणूक करावी. घर, मालमत्ता
यासंबंधीचे काम धीम्या गतीने पुढे जाईल. प्रकृतीच्या बारीकसारीक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रगतीसह
प्रकृतीदेखील तितकीच महत्वाची आहे!

(हेही वाचा : Aries Yearly Horoscope 2024: मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन यंदा कोणत्या महिन्यात? धनलाभ ते आरोग्य, कसं असेल वर्ष?)

फेब्रुवारी (February Horoscope)

चतुर्थ स्थानातील मंगळाचा उच्च राशीतील प्रवेश एकंदरीतच लाभकारक ठरेल. सभेत मुद्दे मांडताना
आत्मविश्वासपूर्वक बोलाल. विद्यार्थी वर्गदेखील तोंडी परीक्षेत अग्रेसर ठरेल. लेखी परीक्षाही उत्तमरीत्या पार
पडेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळींचे पाठबळ मिळेल. करियरमध्ये आगेकूच कराल. मुलामुलींना अनुरूप
जोडीदार मिळेल. विवाहित मंडळी आपल्या सहजीवनाचा आनंद घेतील. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम पत्करू
नये. घर, प्रॉपर्टी, मालमत्ता या संबंधात कोर्टाचा निर्णय आपल्या हिताचा असेल. नातेवाईकांच्या सांगण्यावरून
एखाद्या बद्दलची आपली मते ठाम करू नका. अचानक थंडी तापाचा त्रास होईल.

मार्च (March Horoscope)

बुद्धीला चालना मिळेल अशा घटना घडतील. बुद्धी लढवून प्रश्नांची उकल करणे आपल्याला आवडतेच. विद्यार्थी
वर्गाला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. गुरुबल चांगले असल्याने एकेका गोष्टींचा साकल्याने विचार
करून मार्गी लावाल. नोकरी व्यवसायात आपली मते, विचार सर्वांसमोर निर्धारपूर्वक मांडाल. इतरांवर आपला
प्रभाव पडेल. विवाहोत्सुक मुलामुलींना मनपसंत जोडीदार शोधण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. विवाहित
मंडळींनी एकमेकांच्या सुखाचा विचार केल्याने त्यांचे सूर उत्तम जुळतील. घर, वाहन यांच्या खरेदीसाठी चांगला
कालावधी आहे. गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूकीवर मर्यादित परतावा मिळेल. जास्त नुकसान झालेले नाही
यातच समाधान मानावे.

एप्रिल (April Horoscope)

शनी, मंगळ ,शुक्र यांच्या सहकार्याने मोठया जबाबदाऱ्या हिमतीने पेलाल. आपल्या कर्तृत्वाची दाद मिळेल.
कौतुक होईल. विद्यार्थ्यांना रवी, गुरूच्या साथीने अभ्यासात आणि परीक्षेत उत्तम यश मिळेल. नोकरी व्यवसायात
सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळाल्याने कामे वेगाने पुढे सरकतील. विवाहोत्सुक मंडळींनी हा महिनाभर
अधिक मेहनत घ्यावी. विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या हुशारीची, व्यवहारज्ञानाची छान प्रचिती येईल.
घराच्या कामाचे व्यवहार रखडतील. गुंतवणूकदारांनी घाई करून नुकसान करून घेऊ नये. शांत डोक्यानेच
व्यवहार करावेत. हातापायांची व डोळ्यांची जळजळ होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागेल.

मे (May Horoscope)

१ मे रोजी गुरू अष्टम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. सुरळीत चालू असलेली कामे
विनाकारण रखडतील, रेंगाळतील. विद्यार्थी वर्गाला शनीचे सहाय्य मिळेल. भरपूर मेहनत घेतल्यास शनी चांगले
फळ नक्की देईल. अभ्यासावरची पकड ढिली होऊ देऊ नका. नोकरी व्यवसायात गाडी धीम्या गतीने चालत
राहील. मुद्दाम एखाद्याच्या विरोधात जाऊ नका. विषयाची संपूर्ण माहिती आधी मिळवा. मगच आपले मत
मांडावे. विवाहोत्सुक मंडळींना गुरुबल कमजोर असल्याने थोडे धीराने घ्यावे लागेल. विवाहितांनी एकमेकांच्या
भावनांचा आदर करावा. गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा मिळेल. सावध राहा. त्वचेचे विकार बळावतील.

जून (June Horoscope)

१ जूनला मंगळ सप्तमातील मेष राशीत प्रवेश करेल. धैर्य वाढेल, अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. विद्यार्थी वर्गाला
अभ्यासातील महत्वाचे टप्पे पार करताना विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. १ जूनला हर्षल अष्टमातील वृषभ
राशीत प्रवेश करेल, चालू कामात अडथळे येतील. नोकरी व्यवसायातील असे अडथळे दूर करता करता दमछाक
होईल. पण टक्कर देण्याची हिंमत मंगळाकडून मिळेल. विवाहोत्सुक मंडळींनी घाईघाईने निर्णय घेऊ नये. सबुरीने घ्यावे. विवाहित मंडळींनी जोडीदारासह थोडे जुळवून घ्यावे. शब्दाने शब्द वाढवण्यात हशील नाही.
गुंतवणूकदारांच्या मदतीला भाग्यातील बुध आणि शुक्र असल्याने तोटा होण्यापासून बचाव होईल. एकंदरीत
तणावपूर्ण वातावरणाचा तब्येतीवर परिणाम दिसेल.

जुलै (July Horoscope)

गुरुबल कमजोर आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि जपून टाकावे. शनी, मंगळ आणि शुक्राच्या साथीने
परिस्थिती सावरून धरता येईल. विद्यार्थी वर्गाने प्रयत्नात अजिबात कसूर ठेऊ नये. शैक्षणिक वर्षाच्या
सुरुवातीपासूनच भरपूर मेहनत घ्यायची तयारी ठेवल्यास, एकाग्रता राखल्यास यशस्वी व्हाल. नोकरी
व्यवसायातील राजकारण डोईजड होऊ देऊ नका. अलिप्त राहून प्रत्येकाला आपली जागा दाखवून द्याल.
विवाहित दाम्पत्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या विभागून घ्याव्यात. गुंतवणूक करताना डोळसपणे करावी.
दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक असेल. घराचे कामकाज मार्गी लागण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची मदत
घ्यावी लागेल. उत्सर्जन संस्थेचे आजार उद् भवतील. पोट बिघडण्याची शक्यता.

ऑगस्ट (August Horoscope)

नातेवाईकांच्या मदतीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. नैतिक जबाबदारीने वागाल. विद्यार्थी वर्गाला योग्य
मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा उत्कर्ष चांगला होईल. अधल्यामधल्या परीक्षेत, सराव परीक्षेत अपेक्षित यश
मिळवाल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे जाणून प्रगतीच्या मार्गावरील प्रवासाची विशेष तयारी करावी.
खचून जाऊ नका. विवाहोत्सुक मुलामुलींना थोडे थांबावे लागेल. विवाहित मंडळींनी वादाचा पवित्रा थोडा दूरच
ठेवावा. समजूतदारपणा उपयोगी पडेल. घर, प्रॉपर्टी यांच्या संबंधीत कामात तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
घाईगडबडीत व्यवहार कदापि करू नये. दूषित पाण्यामुळे पोटाचे आरोग्य सांभाळावे लागेल. शरीरांतर्गत
उष्णतेचा समतोल बिघडेल.

सप्टेंबर (September Horoscope)

महिन्याचा पूर्वार्ध नेटाने, जोमाने पार कराल. उत्तरार्धात मन विचलित होईल. रोजच्या गोष्टीतील रस, रुची
कमी होईल. पण तुळ राशीत शुक्राच्या प्रवेशानंतर उमेद वाढेल. शनी, मंगळाचे साहाय्य लाभेल. विद्यार्थी
वर्गाकडून अधिक मेहनत करून घ्यावी लागेल. प्रलोभनांपासून सावध राहावे. मुळात आपली अभ्यासू वृत्ती आहे
याचा विसर पडू देऊ नका. नोकरी व्यवसायातही सभा संमेलनात अभ्यासपूर्वक भाषणे द्याल. इतरांवर प्रभाव
पाडाल. आर्थिक स्थिती कायम राखाल. गुंतवणूकदारांनी आपल्या अभ्यासानुसार आणि अनुभवाच्या शिदोरीवर
योग्य निकष बांधावेत. ओटीपोटाचे दुखणे बळावल्यास औषधोपचार घ्यावे लागतील.

(हेही वाचा : मिथुन राशीच्या लोकांसाठी कसे जाईल वर्ष २०२४? विवाहोत्सुक मंडळींसाठी अच्छे दिन कोणत्या महिन्यात येणार?)

ऑक्टोबर (October Horoscope)

शुक्र आणि बुधाच्या साथीने कलात्मक दृष्टीला व्यावहारिक विचारांची जोड मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल.
नवनिर्मितीचा आनंद मिळेल. विद्यार्थी वर्गाला देखील आपल्यातील कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल.
आखीवरेखीव, नियोजनपूर्ण कामाची नोकरीच्या ठिकाणी वाखाणणी होईल. मनाला उभारी मिळेल. वैवाहिक
जीवनात एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्याने अनेक प्रश्न सोडवता येतील. अहंकाराला थारा देऊ नका.
गुंतवणूकदारांनी पळत्यापाठी धावू नये, हातातील लाभही निसटून जाईल. संमिश्र हवामानामुळे घसा,
डोळे आणि फुप्फुसे यांचे आरोग्य बाधित होईल.

नोव्हेंबर (November Horoscope)

उमेद, उत्साह, चैतन्य देणारे ग्रहमान नसले तरी मित्रमंडळींच्या सान्निध्यात आशेचे किरण दिसतील. सामाजिक
कार्यात मन रमेल. आपल्यातील कलागुणांचा उपयोग इतरांसाठी योग्य पद्धतीने कराल. विद्यार्थी वर्गाने आता
कंबर कसून अभ्यास करावा. त्यांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी शनी साहाय्यकरी ठरेल. नोकरी व्यवसायात
नव्या संकल्पना मांडू नका, जी पद्धती चालू आहे तीच नेटाने पुढे चालवावी. मोठे बदल सध्या नकोत. विवाहित
मंडळींनी कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी वेळ खर्च करावा. आत्ताच सांधलेत तर जुळून राहील. अन्यथा
नात्यातील दरी वाढायला वेळ लागणार नाही. दीर्घकालीन शाश्वत गुंतवणूक हितावह ठरेल.

डिसेंबर (December Horoscope)

१५ डिसेंबरला रवी धनु राशीत प्रवेश करेल, लाभकारक घटना घडतील. अडचणींची मालिका संपेल. विद्यार्थी
वर्गाला एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाचे चांगले फळ मिळेल. यामध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. नोकरी
व्यवसायातील प्रश्न सुटतील. धाडसी निर्णय न घेता परिस्थितीचा सर्वांगीण विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
अहंकाराने कामे बिघडतील. त्यामुळे ‘मी-माझे’ दूर सारा. १३ डिसेंबरला हर्षल वक्र गतीने सप्तमातील मेष राशीत
प्रवेश करेल. नवे करार करताना सावधगिरी बाळगावी. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. निम्मे प्रश्न
सुटतील. गुंतवणूकदारांना वर्षाच्या अखेरीस अधिक सावधगिरी बाळगायला हवी. हवामानातील बदलाचा आणि
रक्तातील घटकांचा रोगप्रतिकारशक्तीवर परिमाण होईल.

एकंदरीत एप्रिलपर्यंत बलवान गुरुबल असताना गोष्टी सुरळीत चालतील तर मेपासून गुरुबल कमजोर होईल
त्यानंतर बऱ्याच गोष्टी रेंगाळतील. या कालावधीत विवाहोत्सुक मुलामुलींनी थोडे धीराने घ्यावे. घराबाबतचे
निर्णय एकांगी असू नयेत. गुंतवणूकदारांच्या अभ्यासाला आणि अनुभवाला खूप महत्व आहे. डोळसपणे पैसे
गुंतवावेत. कमीतकमी नुकसान होईल याची काळजी घ्यावी. अशा या २०२४ सालात तुळ राशीला संमिश्र ग्रहमान
असल्याने शिस्त, सातत्य आणि अभ्यासपूर्वक मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Libra yearly horoscope 2024 when will ma lakshmi bless money in kundali astrology marathi pdb
First published on: 27-01-2024 at 17:32 IST