शहरांसह ग्रामीण भागात बंद पाईपलाईनने पुरवठय़ाची लवकरच घोषणा; बाहेरून २३ टीएमसी पाणी येणार

टँकरवाडा अशी मराठवाडय़ाची ओळख पुसता यावी, असे प्रयत्न सुरू झाले असून मराठवाडय़ातील महापालिका व शहरांसह ग्रामीण भागास बंद पाईपलाईनने पाणीपुरवठा अपेक्षित आहे. या पाणी ग्रीडसाठी मराठवाडा बाहेरील धरणातून अंदाजे २३ टीएमसी पाणी लागणार असून त्या अनुषंगाने शुक्रवारी घोषणा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी मराठवाडय़ाच्या पाणीग्रीड उभारणीच्या कामाला वेग दिला आहे. जालना जिल्हय़ातील परतूर तालुक्यात लोणीकर यांनी स्वत:च्या मतदारसंघात पाणी पुरवठय़ासाठी सौरऊर्जेच्या आधारे पाणीपुरवठा योजना करण्याचे ठरविले आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण विभागासाठी योजना आखता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. या योजनेचा प्राथमिक अहवाल नुकताच तयार झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत मराठवाडय़ात पडणारा पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नानाप्रकारचे प्रयोग करण्यात आले. शेवटी सर्व भिस्त टँकरवर अवलंबून असे. यावर पाणी ग्रीड उपाय ठरू शकेल, असा दावा केला जात आहे.

अभ्यास सुरू

मराठवाडय़ात पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे ४ हजार २०० हून अधिक टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागला . यावर उपाय करण्यासाठी बंद पाईपद्वारे पाणी देता येईल का, याचा अभ्यास केला जात आहे.  टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठय़ासाठी अधिक खर्च होत असल्याने संपूर्ण मराठवाडय़ातील स्रोत लक्षात घेऊन ग्रीड तयार करण्याबाबत विचार सुरू होते.

अशा प्रकारच्या योजनांची मराठवाडय़ास गरज असल्याने यावर अभ्यास सुरू आहे. देशभरात ग्रीडद्वारे पाणीपुरवठा कोठे सुरू आहे, याचा अभ्यास केला जात होता. गुजरातचे मॉडेल डोळय़ासमोर ठेवून ही योजना आखली जात आहे.