सुट्टीतले शिबीर संपल्यावर मुलांना घरी घेऊन येणारी बस वाटेत बिघडली, त्यामुळे सगळय़ा मुलांना घरी पोचायला मध्यरात्र झाली. सगळे जण अर्धवट झोपेत पेंगतच आपापल्या आईबाबांबरोबर घरी पोचले. जयचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. घरी पोचताक्षणी तो आईशी जेमतेम दोन शब्द बोलला आणि बूट काढून त्याने पलंगावर स्वत:ला झोकून दिलं. चार दिवसांची कॅम्पमधली धावपळ आणि रात्रीचं जागरण यामुळे स्वारी गाढ झोपी गेली होती. उन्हं तोंडावर आली तरी त्याची उठायची चिन्हं दिसत नव्हती. आजचा दिवस खरं तर त्याच्यासाठी खासम खास होता. आज त्याचा आठवा वाढदिवस होता. त्याचं शिबिरात अचानक जायचं ठरलं, त्यामुळे वाढदिवसासाठीची खरेदी वगैरे प्रकार झालेच नाहीत. जयच्या आईबाबांनी मात्र त्याच्या गैरहजेरीत जयसाठी एक वेगळाच सरप्राइज बेत करायचा ठरवलं. त्यानुसार वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : बालमैफल: चतुर लिओ

आईनं त्याच्या कानाशी ‘हॅप्पी बर्थडे जय’ म्हटल्यावर मात्र जयची झोप उडाली. आळोखेपिळोखे देत डोळे उघडून आईबाबांकडे पाहून गोड हसला. अंगातला आळस अजूनही जात नसल्यानं त्यानं पुन्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिची ओढणी तोंडावर घेतली. ‘‘आज एका मुलाचा वाढदिवस आहे ना? त्याच्यासाठी आम्ही काही तरी गंमत आणलीय. बघायची नाही का?’’ बाबानं असं म्हटल्यावर मात्र झटक्यात उठून त्यानं काय गंमत आहे विचारलं. आईनं त्याच्या उशीकडे बोट दाखवून ती उचलायला सांगितली. उशीखाली कसली गंमत असेल विचार करत त्यानं ती उचलली, तर खाली एका कागदावर काही तरी लिहिलेलं दिसलं. काहीच न समजून त्यानं कागद हाती घेऊन वाचला. त्यावर १ आकडय़ाखाली ‘‘गुड मॉर्निग जय.. तुझी गंमत ना बेसिनपाशी दात घासायला गेलास की मिळेल बघ!’’ त्याबरोबर जय झटक्यात गंमत बघायला बेसिनशी पोचला.. पण तिथल्या कपाटाशीही अशाच एका चिठ्ठीवर २ आकडय़ाखाली- ‘‘तुझ्या नेहमीच्या दुधाच्या ग्लासच्या खाली गंमत असेल.’’ .. वाचल्याबरोबर तो दात न घासताच ग्लासच्या स्टॅंडजवळ पोचला. तिथंही ३ आकडय़ाखाली ‘‘दुधाबरोबर रोज काय खातोस?’’ .. लगेच त्याने बिस्किटाच्या डब्याकडे पाहिलं. तर डब्याखालच्या चिठ्ठीवर ४ आकडय़ाखाली ‘‘तू पेरलेल्या धन्यांतून छान कोथिंबीर उगवलेली पाहिलीस का?’’ त्याबरोबर जयचा मोर्चा बाल्कनीतल्या झाडांकडे वळला. कुंडीजवळच त्याला आणखी एक चिठ्ठी सापडली- ज्यात ५ आकडय़ाखाली ‘‘आपल्या फिशटॅंकमधल्या गोल्ड फिशला छोटी पिल्लं झालेली पाहिलीस का?’’ हे वाचल्यावर जय धावतच ती बघायला गेला, कारण बरोब्बर गेल्याच वर्षी त्याच्या वाढदिवसाला त्याच्या हौसेपायी आईबाबांनी घरात छोटा फिशटॅंक आणला होता. जयसुद्धा माशांना वेळेवर खाऊ घालण्याचं काम नेमानं करत असे. टॅंकमधल्या छोटय़ाशा पिलांकडे क्षणभर पाहिलं. पण त्याक्षणी गंमत शोधण्याची उत्सुकता होती म्हणून त्यांचं निरीक्षण करायला थांबला नाही. फिशटॅंकच्या बाजूलाच एक चिठ्ठी त्याला खुणावत होती. ६ आकडा असलेल्या त्या चिठ्ठीत ‘‘अरे आता शाळा सुरू होणार, पण युनिफॉर्म धुऊन इस्त्री करून आलेत का पाहा बरं.’’ तेव्हा जय मान हलवत त्याच्या कपडय़ांच्या कपाटापाशी गेला. आईबाबांनी नवीन कपडे आणून ठेवले असावेत अशा अंदाजाने त्यानं कपाट उघडलं, पण तिथं मात्र त्याला काहीच दिसेना. ना नवीन कपडय़ांची पिशवी, ना कुठली चिठ्ठी. गोंधळून त्यानं त्याच्या मागेमागे फिरणाऱ्या आईकडे पाहिलं तर ‘‘शोध तूच.. नीट शोध,’’ म्हणत आई मिश्कील हसत होती. जयनं आधीच अस्ताव्यस्त असलेले कपडे वरखाली केले. यापुढे आई नेहमी सांगते त्याप्रमाणे कपडे नीट ठेवायचा प्रयत्न करायचा असं त्यानं मनाशी ठरवून टाकलं. तोच त्याला कपाटाच्या दाराच्या तळाशी अडकवलेली चिठ्ठी दिसली. आता तरी या चिठ्ठीतून आपली गंमत समजणार अशी त्याला खात्री होती, पण ७ आकडा असलेल्या चिठ्ठीत ‘‘तुझ्या दिवाळीच्या किल्ल्यावरचे मावळे बघ कसे आराम करतायत. त्यांना जरा दक्ष उभं राहायला सांग की.’’ अर्थातच जयची स्वारी त्याच्या खेळण्यांच्या कपाटाशी गेली. दिवाळी संपल्यावर जय आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या किल्ल्यावरचे आपापले मावळे घरी नेले. घरी आणल्यावर जयनं ते कपाटात नुसतेच आडवेतिडवे ठेवून दिले होते. पण जयकडे आता त्यांना शिस्तीत उभं करण्याएवढा धीर नव्हता. एव्हाना या शोधाशोधीसाठीचा त्याचा संयम एकीकडे संपतही आला होता, पण दुसरीकडे उत्सुकताही वाढली होती. इथंतिथं हात फिरवल्यावर कोपऱ्यात चिठ्ठी सापडली, जिच्यावर ८ नंबरखाली मोठय़ा अक्षरात प्रश्न विचारला होता- जयची सगळय़ात जास्त आवडती गोष्ट कोणती बरं? त्यानं एक मिनिट डोकं खाजवत आईबाबांकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी त्यानं त्याच्या पुस्तकांच्या कपाटाकडे धाव घेतली. कपाट उघडून पाहतो तर काय.. समोरच्या खणात छानपैकी चंदेरी कागदात लाल रिबिनीनं बांधलेला एक गठ्ठा दिसला.. घाईघाईनं त्यानं तो गठ्ठा टेबलावर ठेवून उघडला आणि प्रचंड खूश होऊन त्यानं टुणकन् उडीच मारली. कारण त्यात एक सोडून चक्क गोष्टींची आठ पुस्तकं दिसत होती. भराभरा त्यानं हातात धरून चाळली. त्याच्यासाठी फक्त एक पुस्तक मात्र नवीन होतं- जे तो प्रथमच बघत होता- श्यामची आई. त्याच्यावर असलेल्या आई आणि मुलाच्या चित्राकडे तो एकटक बघतच राहिला. ‘‘काय मग कसा होता खजिन्याचा शोध? ट्रेझर हंट?’’.. बाबानं हसत विचारल्यावर त्यानं पटकन बाबाला मिठीच मारली. ‘‘अरे आता तुला आठ वर्ष पूर्ण झाली म्हणून तुला आवडतील अशी आठ पुस्तकं आम्ही विकत आणली. पण ती भेट देताना काही तरी गंमत करू या म्हणून ही खजिन्याच्या शोधाची आयडिया केली. मजा वाटली की नाही शोधताना?’’

हेही वाचा : बालमैफल: आनंद द्यावा नि घ्यावा!

‘‘हो. खूप खूप मज्जा वाटली, पण हे श्यामची आई पुस्तक?’’ जय किंचित अडखळला. ‘‘अरे आम्ही लहानपणी साने गुरुजींच्या या पुस्तकाची किती तरी वेळा पारायणं केली आहेत. आता आपण दोघं मिळून वाचू या हे पुस्तक. तुलाही आवडेल. त्याच्यावर खूप वर्षांपूर्वी सिनेमा आला होता आणि आतासुद्धा नव्याने या नावाचा सिनेमा आलाय.’’ ‘‘आई, आपण बघायचा का तो सिनेमा?’’ त्यावर बाबानं नक्की म्हणत त्याला कडेवर उचललं आणि आईबाबा दोघांनी पुन्हा एकदा हॅप्पी बर्थ डे म्हटलं.

alaknanda263 @yahoo.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifal finding a treasure css
First published on: 04-02-2024 at 00:10 IST