लोकशाही जिवंत राहायला हवी या विषयावर परखड भाष्य करणाऱ्या ‘ती तगायला हवी..’ या अग्रलेखावर तितक्याच रोखठोखपणे भूमिका मांडणारा पुण्यातील ‘संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थे’चा अभिषेक माळी ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाची विजेती ठरली आहे. तर, या स्पर्धेत पुण्याच्या ‘परशुरामभाऊ’ महाविद्यालयाचा सुरज मदान याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘ती तगायला हवी..’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या वर्षां आणि रोशन यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’स्पर्धेत बाजी मारली आहे. अभिषेकला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर सुरज यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विचारी वृत्तीला चालना देत उत्तम लेखन केले. गोविंद गुत्ते या विद्यार्थ्यांनेही मांडलेल्या विचारात सत्तासंतुलन का हवे यावर भर देताना शीतयुद्धोत्तर अमेरिकेच्या जागतिक पोलिसगीरीचे उदाहरण चपखलपणे दिले आहे.  या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

विजेत्यांना पत्रकारितेची संधी

‘लोकसत्ता’मधील विविध अग्रलेखांवर उत्तम रीतीने मतप्रदर्शन करून ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांमधील सजगतेला व लेखनगुणांना अधिक वाव मिळावा यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे त्यांना ‘प्रशिक्षणार्थी पत्रकार’ म्हणून संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी पत्रकार पदासाठी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा. अर्ज loksatta@expressindia.com या मेल आयडीवर पाठवावा.